अपूर्वाच्या कामगिरीने रचला नवा इतिहास

    07-Aug-2022   
Total Views |
Manasa 
 
 
 
 
इंजिनिअरिंगनंतर नोकरीची संधी चालून आली तरी ती नाकारुन वेगळे काही करण्याच्या जिद्दीने अपूर्वा गीतेने नुकतीच सहकार्‍यांसमवेत उत्तर अरबी समुद्रातील देखरेख मोहीम पूर्ण केली. तिच्याविषयी...
 
 
पोरबंदर येथे वसलेल्या ‘इंडियन नेव्हल एअर एन्क्लेव्ह’च्या पाच महिला अधिकार्‍यांनी उत्तर अरबी समुद्रात संपूर्ण महिला सागरी शोध आणि देखरेख मोहीम यशस्वी पूर्ण करुन एक नवा इतिहास रचला. या मोहिमेत डोंबिवलीकर असलेल्या लेफ्टनंट अपूर्वा गीते यांचादेखील समावेश होता. भारतीय नौसेनात पायलट असलेल्या अपूर्वाचा जीवनप्रवास यानिमित्ताने जाणून घेऊया.
 
 
‘डॉर्नियर-२२८ विमानाच्या मदतीने ही मोहीम यशस्वी करण्यात आली. लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते. त्यांच्या संघात पाच महिलांचा समावेश होता. त्यापैकीच अपूर्वा एक आहेत. गुजरात राज्यातील पोरबंदर येथे ‘इंडियन नेव्ही एअर स्क्वॉड्रन’ वसलेली आहे. अत्याधुनिक ‘डॉर्नियर-२२८ यासागरी टेहाळणी विमानाचा या ‘स्क्वॉड्रन’मध्ये समावेश आहे. या महिला अधिकार्‍यांच्या चमूने बुधवारी आपली मोहीम यशस्वी केली.
 
 
कठोर प्रशिक्षण आणि प्रात्याक्षिकांचा या मोहिमेच्या पूर्व तयारीमध्ये समावेश होता. सशस्त्र दलामध्ये परिवर्तन घडवून आणण्यामध्ये भारतीय नौदल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून नौदलात महिलांचा समावेश करणे, महिला वैमानिकांची नियुक्ती करणे, महिला हवाई संचलन अधिकारी निवड, तसेच २०१८ मध्ये महिला नौकानयन यासारख्या अनेक कार्यक्रमातून भारतीय नौदलने दाखवून दिले आहे. उत्तर अरबी समुद्रातील सागरी शोध व टेहळणी हा अनोखा उपक्रम होता. ही मोहीम यशस्वी होणे हे सशस्त्र क्रांती दलासाठी एक क्रांतिकारी पाऊल आणि यश असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
 
 
अपूर्वाचा जन्म १२जुलै, १९९७ ला खोपोली येथे झाला. त्यावेळेस ते आंबिवली येथे राहण्यास होते. अपूर्वाच्या शिक्षणासाठी ते २००० साली आंबिवलीहून डोंबिवली येथे राहण्यास आले. अपूर्वाचे शालेय शिक्षण ‘ओंकार इंटरनॅशनल स्कूल’ येथे झाले. शालेय जीवनात ती सतत प्रथम क्रमांक मिळवत असे. लहानपणापासूनच तिची कठोर परिश्रम करण्याची तयारी होती. अभ्यासाबरोबरच ती कराटे, नृत्य, पोहणे तसेच सर्व खेळात सहभागी होत असे. तिने कराटेचे ‘ब्लॅक बेल्ट’पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तिने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विनायक गणेश वझे-केळकर महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पूर्ण केले.
 
 
तिने चांगल्या गुणांची परंपरा बारावीलादेखील कायम ठेवली होती. त्यानंतर तिने पदवीसाठी डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉम्प्युटर विषयात तिने बीईचे शिक्षण पूर्ण केले. सलग चार वर्षे संपूर्ण महाविद्यालयामधून ती प्रथम क्रमांक मिळवत असे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच तिने ‘एनसीसी वायुसेने’चे सलग तीन वर्षे प्रशिक्षण ‘जय हिंद कॉलेज, चर्चगेट’ या ठिकाणी घेतले. तिथे ती एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा ‘ए’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाली. महाविद्यालयाच्या तिसर्‍या वर्षाला असताना तिला ‘टीसीएस’ आणि ‘मॅजेस्का’ या दोन कंपन्यांमधून नोकरीची संधी चालून आली होती. पण तिला वेगळे काही करण्याची जिद्द होती. त्याच वेळी भारतीय नौदलाची जाहिरात तिच्या नजरेस पडली.
 
 
मग भारतीय नौसेनेची पायलट व्हायचे तिने ठरवले. मे २०१८ मध्ये तिने पायलट पदासाठी अर्ज केला. तिला नोव्हेंबर २०१८मध्ये मुलाखतीसाठीचे पत्र आले. ती १० फेब्रुवारी, २०१९ ला ‘एसएसबी सेंटर, बंगळुरू’ येथे गेली. त्या ठिकाणी सलग ११८ परीक्षा देऊन तिने उत्तम यश संपादन केले. २२जून, २०१९ या दिवशी भारतीय नौसेना दिल्ली येथून फोन आणि ई-मेलद्वारे ‘सिलेक्शन’ झाल्याचे तिला कळविण्यात आले. दि. २८जून, २०१९ ला अपूर्वा भारतीय नौसेना इझिमला केरळ या ठिकाणी प्रशिक्षणासाठी रवाना झाली. संपूर्ण एक वर्ष तिने खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि ‘सबलेफ्टनंट’ पदाचे कमिशन मिळवले. त्यानंतर वैमानिक प्रशिक्षणासाठी ‘भारतीय वायुसेना अकॅडमी, डुंडीगल’ याठिकाणी विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. तसेच विमान चालवण्याच्या ‘स्टेज-२’ प्रशिक्षणासाठी ती सहा महिन्यांसाठी बंगळुरूला गेली आणि प्रशिक्षण पूर्ण केले. नंतर आठ महिन्यांसाठी ती ‘ऑपरेशनल ट्रेनिंग’साठी कोचीन या ठिकाणी गेली व तेही पूर्ण केले. दोन वर्षांनंतर अपूर्वाचे ‘लेफ्टनंट’ पदावर प्रमोशन झाले. मार्च २०२२ मध्ये, लेफ्टनंट अपूर्वाचे पोरबंदर गुजरात या ठिकाणी पोस्टिंग झाले.
 
 
त्याठिकाणी ती ‘डॉर्नियर-२२८’ हे विमान चालवते. ही विमाने भारतीय नौसेनेची अत्याधुनिक विमाने आहेत. समुद्रावरील टेहळणी करणे म्हणजेच सागरी सुरक्षा करण्याचे काम करतात. हे काम करत असतानाच ३ ऑगस्ट या दिवशी पाच महिला अधिकार्‍यांनी उत्तर अरबी समुद्रात सागरी सुरक्षा करण्याचे काम केले. भारतीय इतिहासात अशा प्रकारची पहिलीच घटना म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या मोहिमेतून महिलांच्या चमुने ‘हम भी किसी से कम नहीं’ हे दाखवून दिले आहे. भारतीय नौसेनेच्या या उपक्रमामुळे महिला अधिकार्‍यांना जबाबदारी देऊन आव्हानात्मक भूमिका मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अपूर्वाचे वडील नारायण गीते चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, गिरगाव या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहे.
 
 
तर अपूर्वाची आई वैशाली गीते या विनायक गणेश वझे-केळकर कॉलेज, मुलुंड या ठिकाणी ज्युनियर कॉलेजला जीवशास्त्र विषय शिकवतात. अपूर्वाचे आई-वडील हे दोघेही पेशाने शिक्षक आहेत. अपूर्वाला अनुष्का ही लहान बहीण आहे. अनुष्का ही मिठीभाई कॉलेज, विलेपार्ले याठिकाणी बीएमएम दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहे. अपूर्वाच्या हातून उत्तमोत्तम देशसेवा घडावी, अशीच तिच्या आई-वडिलांची इच्छा आहे. अपूर्वाला तिच्या उत्तम कामगिरीबद्दल ‘डी. वाय. पाटील महाविद्यालया’तून दरवर्षी ५०हजार रुपये देऊन तिला सन्मानित करत असे. अशा व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.