कलेचा बहुआयामी जोपासक

    28-Aug-2022   
Total Views |

pavaskar
 
शिक्षण मिळाले नाही तर आपल्या आवडीच्या क्षेत्रातही उत्तम कारकीर्द घडवता येते आणि ते क्षेत्र कलेचे असेल तर आनंदाची अनुभूती येते, हे सांगणार्‍या विकास पावसकर यांच्याविषयी...
 
 
वडिलांकडून मिळालेला नाट्य आणि कलेचा वारसा जोपासत गेल्या ३७ वर्षांपासून नाटक, ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग आणि संगीत मैफिलीचे हजारो कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये आयोजित करणारे डोंबिवली पश्चिम येथे राहणारे विकास पांडुरंग पावसकर हे या क्षेत्रातील एक यशस्वी व्यक्ती म्हणून राज्यात प्रसिद्ध झाले आहेत.
 
विकास पावसकर यांचे मूळ गाव सावंतवाडी तालुक्यातील नेमळे. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांचे वडील पांडुरंग पावसकर हे महाराष्ट्र आणि गोव्यात नाटक आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करत असत. विकास यांना लहानपणापासून नाट्य क्षेत्राची आवड निर्माण झाली होती. वडिलांकडून मिळालेला हा वारसा जोपासत त्यांनी १९८५ साली डोंबिवलीमध्ये ‘मोरूची मावशी’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला. त्याच दरम्यान जादूगार विजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग त्यांनी कोकण आणि गोव्यात आयोजित करण्यास सुरुवात केली. १९९०साली मराठी-हिंदी गाण्यांच्या ऑर्केस्ट्राची प्रेक्षकांमध्ये मोठी ‘क्रेझ’ होती. हे ओळखून विकास यांनी १९८८ ते १९९६ या कालावधीत ‘सुप्रसिद्ध कलाकार’ ऑर्केस्ट्राचे शो विविध ठिकाणी आयोजित केले. याच कालावधीत त्यांची कलाकार म्हणून समाजात ओळख निर्माण झाली. आपण आयोजित करत असलेल्या कोणत्याही कार्यक्रमाची जाहिरात कशी असावी, याचे मार्गदर्शन आपल्याला जादूगार रघुवीर यांनी दिल्याचे ते आवर्जून सांगतात.
 
त्यांनी सुधीर भट यांच्या ‘सुयोग’ कंपनीची अनेक नाटके केली. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचे मुंबई, ठाणे, रायगड आणि तळ कोकणात आयोजित केलेले कार्यक्रम हे आपल्या ‘करिअर’मधील उल्लेखनीय क्षण असल्याचे पावसकर सांगतात. नाटक किंवा कार्यक्रम नावाजलेले असले, तरी ज्या गावात आयोजित केले आहे तिथे ते यशस्वी करण्यासाठी आयोजक म्हणून पावसकर जातीने मेहनत घेतात. आपल्या कार्यक्रमाची वृत्तपत्रात मोठी जाहिरात करणे, रिक्षा, जीपमधून ध्वनिक्षेपकावरून घोषणा करणे, भिंतीवर ‘पोस्टर्स’ लावणे ही कामे विकास स्वतः करतात. आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपणच केले पाहिजे, असा त्यांचा विश्वास आहे.
 
मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘सही रे सही’ हे नाटक विकास यांनी लता नार्वेकर, सुधीर भट आणि भरत जाधव या तिन्ही निर्मात्यांसोबत केले आहे. नाटकासोबत जादूचे प्रयोगदेखील त्यांना खूप आवडतात. युवा जादूगार सुहानीचे त्यांनी आतापर्यंत आठशेच्यावर प्रयोग यशस्वीपणे आयोजित केले आहेत. सध्या नाट्यनिर्माते नंदू कदम यांचे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे शो ते करत आहेत.नाटक, संगीत क्षेत्रात काम करत असताना विकास यांनी 1996 साली डोंबिवलीमध्ये गणपती मूर्तींचा व्यवसाय सुरू केला. पहिल्या वर्षी त्यांनी अवघ्या १०८ मूर्ती विकल्या. यंदा त्यांच्या चित्रशाळेत सुमारे ७५० मूर्ती आरक्षित झाल्या आहेत. पेणमधील शेखर समेळ, वैभव ठाकूर, आनंद दाभाडे, नितेश पाटील, किरण पाटील, योगेश पाटील, अमोल वासकर, कपिल सुतार, किरण मांजरेकर आणि अजित लांगी या सुप्रसिद्ध मूर्तिकारांकडून पावसकर गणपतीच्या मूर्ती मागावतात. दहा इंचापासून पाच फुटांपर्यंत या मूर्ती असतात. दरवर्षी येणार्‍या ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून ते स्वतः पेण येथे जाऊन मूर्तींची निवड करतात. या सर्व मूर्ती डोंबिवलीत आल्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार सजावट करून दिली जाते. फेटा, शेला, धोतर, दागिने अशी खास सजावट केली जाते. अभिनय कर्णिक, राजा गुरव, प्रथमेश हळदणकर, रिया पावसकर हे मदतनीस सजावटीच्या कामात मदत करतात.
 
‘कोविड’ काळात काही नियमित ग्राहकांना आर्थिक अडचण निर्माण झाली होती. ही समस्या ओळखून पावसकर यांनी त्यांच्या अनेक नियमित ग्राहकांची अडवणूक न करता सहकार्य केले. गणपती व्यवसायात सुजित नलावडे मित्रमंडळ आणि शालेय जीवनातील सहकारी पितळे बंधू यांचे मोलाचे सहकार्य मिळते, असे पावसकर आवर्जून सांगतात. गणपतीच्या व्यवसायात त्यांच्या पत्नी लीना आणि मुलगी रिया यांचे मोलाचे योगदान मिळत असते. प्रत्येक ग्राहकाने आरक्षित केलेली मूर्ती व्यवस्थितपणे स्वाधीन करण्याची जबाबदारी विकास यांची पत्नी लीना आणि सजावटीची प्रमुख जबाबदारी मुलगी रिया उचलते. नाट्यनिर्माती लता नार्वेकर यांनी गणपतीच्या व्यवसायास प्रोत्साहन दिले, हे त्यांनी आठवणीने सांगितले.
 
आपल्या वडिलांनी पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे कार्यक्रम केले. त्याच धर्तीवर गायक अजित कडकडे यांचे कार्यक्रम कोकणात आयोजित करण्याची पावसकर यांची इच्छा आहे.शिक्षण नाही म्हणून रडत न बसता नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न केल्याने आज एक यशस्वी उद्योजक होऊ शकलो, असे सांगत मराठी तरुणांनी हा मंत्र जपून आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय करावा, असा सल्ला विकास पावसकर यांनी दिला आहे. विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणार्‍या विकास पावसकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून हार्दिक शुभेच्छा...!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.