मृत गोविंदांच्या कुटूंबियांना दहा लाख रुपयांची मदत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली मदत
23-Aug-2022
Total Views | 34
मुंबई : दहीहंडी उत्सवादरम्यान राज्यभर जे गोविंदा जखमी झाले त्यांना योग्य उपचार मिळावेत जेणेकरून कुणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी नियंत्रण पथकास निर्देश देण्यात आले होते. दुर्देवाने विलेपार्ले येथील २३ वर्षीय संदेश दळवी यांचा मृत्यू झाला असून, तातडीने कुटूंबियांना दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
#विधानसभाकामकाज दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांना उपचाराच्या योग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश. विलेपार्ले येथील मृत्युमुखी पडलेल्या संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना तातडीने दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मंगळवारी दि. २३ रोजी विधानभवनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी जखमी आणि मृत्यूमुखी गोविंदाबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना कालावधीत दोन वर्षे सण साजरे करता आले नाही. आता कोरोनाचे सावट कमी झाल्याने पारंपरिक सण साजरे करण्यात येत आहेत. नुकताच दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मृत गोविंदांच्या कुटूंबियांना १० लाख, दोन अवयव गमावल्यांना ७.५० लाख, जखमींना ५ लाख रुपये आणि सर्वांवर मोफत उपचाराची घोषणा केली होती.
या सणाच्यावेळी सर्व जखमी गोविंदावर योग्य उपचार व्हावेत, कुणाचाही मृत्यू होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सात अधिकाऱ्यांचे पथक नेमले होते. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यांशी संपर्क साधण्यात आला होता. याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना जखमी आणि मृत्यूमुखी गोविंदांना तत्काळ आर्थिक मदत देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.