नवी दिल्ली : गेले काही दिवस प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृती संदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी, त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी आशा सोडून दिल्या आहेत असे सुत्रांद्वारे सांगण्यात आले होते. परंतु, राजू यांचा भाऊ दिपू श्रीवास्तव यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून या बातम्यांना केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की 'माझा भाऊ योद्धा आहे आणि तो लवकरच ही लढाई जिंकणार आहे.'
राजू श्रीवास्तव यांचे बंधू दीपू यांनी व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणत आहेत, “माझे मोठे भाऊ गजोधर भैया, तुमचे आवडते कॉमेडियन एम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये आहेत. संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि तुमच्या प्रार्थना काम करत आहेत. एम्स हे देशातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय आहे आणि त्याहूनही चांगले, देशातील सर्वोत्तम डॉक्टर आपले शंभर टक्के देत आहेत. त्यामुळे त्यांच्यात चांगली सुधारणा होत आहे."
दीपू श्रीवास्तव यांनी पुढं म्हटलं, “डॉक्टरांची संपूर्ण टीम अहोरात्र प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यात सुधारणादेखील होत आहे. त्यामुळे या अफवांकडे लक्ष देऊ नका. मी इतकंच म्हणेन की, तुम्ही प्रार्थना करत राहा. राजू एक योद्धा आहेत आणि हे युद्ध जिंकल्यानंतर ते लवकरच तुमच्या सर्वांसमोर येतील. ते पुन्हा एकदा आपल्या कॉमेडीने तुम्हाला खळखळून हसवतील'. त्यामुळे त्यांच्यासाठी असेच प्रार्थना करत राहा."
यापूर्वी राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर राजेश शर्मा यांनी सांगितले होते की, 'आधीच्या तुलनेत आज त्यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. आशेचा किरण दिसत आहे. त्यांचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत आहेत. इंजेक्शन आणि औषधांमुळे त्यांच्या ब्रेनवर सूज आली होती. त्यांचा ब्रेन डेड झालेला नाही, ही एक अफवा आहे. ते सध्या सेमी कोमाच्या स्टेजवर आहेत. ते ठीक आहेत. यामध्ये जे नवीन डॉक्टर सहभागी झाले आहेत. त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्यामुळे कृपया अफवांकडे लक्ष देऊ नका.'