मुंबईमधल्या सेवावस्तीत अनेक समस्या आहेत. बालकांच्या संस्कारक्षम जडणघडणीची समस्या हा तर मोठा प्रश्न. तसेच महिला सक्षमीकरण हा मुद्दाही महत्त्वाचा. महिला आणि बालकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करणार्या ‘अस्मिता’ संस्थेच्या कार्याचा मागोवा या लेखात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
देश स्वतंत्र होऊन २८-२९ वर्षे झालेली असताना दि.१ मे, १९७६ रोजी जोगेश्वरी, मुंबई येथे ‘अस्मिता’ संस्थेची स्थापना झाली. तत्कालीन वातावरणात जोगेश्वरीची गरज लक्षात घेऊन बालवाडी सुरू करण्यात आली. अल्पावधीतच इतरत्र दहा ते १२ ठिकाणी बालवाडी सुरू झाल्या. त्यानंतर साहजिकच गरजेनुसार पहिली, दुसरी, तिसरी करत अनुक्रमे दहावीपर्यंत शाळा सुरू झाली. परिसरातील मुले कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील. विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचाही व्यक्तिमत्त्व विकास व्हावा म्हणून मग या बालवाडी आणि शाळेसोबतच ‘अस्मिता संस्थे’ने विविध उपक्रम सुरू केले. ‘वसंत व्याख्यानमाला’, वक्तृत्व स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास शिबिरे, रक्तदान शिबिरे असे अनेकानेक उपक्रम सुरू झाले. ‘आय. वाय. कॉलेज’च्या प्रशस्त मैदानावर नाट्यमहोत्सव होऊ लागले.
७० स्क्वे. फूट जागेत सुरू झालेली ‘अस्मिता’ बांद्रेकर वाडीतील शाळेच्या रूपाने स्थिरावली. या सर्व काळात संस्थेचे संस्थापक सदस्य दादा पटवर्धन, माधवराव कारले, दादा घैसास, डॉ. नाथानी, जगदीश सामंत, नाना बनसोडे या सर्वांनी व जोडल्या गेलेल्या अनेकानेक कार्यकर्त्यांनी अविरत मेहनत घेतली. इ. स. २०००च्या सुमारास ’अस्मिता भवन’ या वास्तूची निर्मिती झाली. समुपदेशन केंद्र, स्वास्थ्य सेवा केंद्र, गणित प्रयोगशाळा, ‘थिंकिंग लॅब’, संगीत कक्ष असे अनेकविध आयाम सुरू झाले.
२०१४ नंतर झालेल्या सत्तापालटात केंद्रात भाजप सरकार आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. कला, कौशल्य आणि स्वयंरोजगार या विषयावर सर्वंकष काम सुरू झाले.
अल्पशिक्षित किंवा परिस्थितीमुळे नोकरी न करू शकणार्या मात्र, अर्थार्जनाची गरज असणार्या मोठ्या समुदायाला स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षणाशी जोडण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन पुढे आले. तसेही तिच्यात एखादेही कला-कौशल्य नसेल, अशी जगात एकही व्यक्ती नसावी. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कौशल्य असते. त्या कौशल्याला प्रशिक्षणाच्या आत्मविश्वासाची साथ मिळाली, तर व्यक्तीचे जगणे बदलू शकते. या पार्श्वभूमीवर भारतीय महिलांच्या वृत्तीत आणि संस्कारातच कलाकौशल्याची जाण असते. दुर्गम भागातली भगिनीही उत्कृष्ट मेहंदी काढत असते. जुन्या कपड्यांपासून नवीन कपडे शिवणे, त्यातून उपयोगी वस्तू बनवणे, हे तिला कोणी सांगत नाही.
पण ती सहजगत्या हे सगळे करते. तिने घरात बनवलेल्या वस्तूंना मोल असते, पण तिच्या ते गावीही नसते. भगिनींच्या कलाकौशल्यांना वाव देणे. त्यांनाही स्वयंरोजगार प्राप्त होईल, असे प्रशिक्षण देणे हे गरजेचे असते. काळाची ही गरज ओळखून ‘अस्मिता’ संस्थेने महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणही सुरू केले. जोगेश्वरी आणि आसपासच्या परिसरात स्थिरावलेल्या समाजासाठी कौशल्य विकास कार्यकम राबविण्यास ‘अस्मिता’ने सुरुवात केली. कौशल्य विकास या प्रकल्पातून काळाच्या मागणीनुसार विविध क्षेत्रांतील व्यावसायिक शिक्षण देण्यास संस्थेने सुरुवात केली. आतापर्यंत अतिशय वाजवी दरात, देणगीदारांच्या मदतीने पुढील कोर्सेस घेण्यात आले.
‘अस्मिता’च्या माध्यमातून ‘ब्युटिशियन कोर्स’ केलेल्या २३८ जणींपैकी ७१ जणी घर सांभाळून हा व्यवसाय करत आहेत. या महिलांना ‘अस्मिता’तर्फे सर्वंकष उन्नतीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांशी संवाद, त्याचबरोबर कुटुंब प्रबोधन कार्यशाळा व रक्षाबंधनाचे कार्यक्रम घेतले जातात. सामाजिक भान ठेवून १५ ऑगस्टला धारिवली गाव वनवासी पाड्यावर ३० ‘ब्युटिशियन कोर्स’च्या प्रशिक्षणार्थींनी जाऊन नि:स्वार्थपणे ५५ महिलांवर सौंदर्योपचार केले, मेहंदी काढली.व्यावहारिक स्पर्धेच्या या युगात ‘ब्युटिशियन’चा हात ज्यांच्या चेहर्यावर अजूनपर्यंत एकदाही फिरला नसेल, त्यांना हा अविस्मरणीय अनुभव असेल, यात शंका नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या सहकार्य या क्षेत्रभेटीत लाभले.‘अस्मिता’चे अध्यक्ष चंद्रशेखर पारखी, ‘कौशल्य विकास’ प्रकल्प प्रमुख गौतम मुरकुंडे तसेच, रवी नाथानी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अस्मिता’च्या या प्रकल्पाचे मार्गक्रमण सुरू आहे.
कोरोनानंतर कित्येक घरांची आर्थिक घडी कोलमडली आहे. काहींचे वेतन ५० टक्क्यांवर आले, तर काहींच्या नोकर्याही गेल्या. अशावेळी अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करणे, हे महत्त्वाचे. त्यामुळे जोगेश्वरी परिसरातील भगिनींसाठी सौंदर्यासंबंधित प्रशिक्षण सुरू आहे, याचा आनंद वाटतो. कारण, हे प्रशिक्षण केल्याने भगिनी दिवसाचे दोन ते तीन तास ब्युटीपार्लर संबंधित व्यवसाय आपल्या घरातूनही करून अर्थार्जन करू शकते. आपल्या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या भगिनी आज स्वावलंबी आहेत आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यास सक्षम झाल्या आहेत. हे संस्थेचे यश आहे.
- अरविंद शिंदे
प्रमुख, ब्युटी प्रशिक्षण