नव्या युगाच्या आकांक्षाचे प्रतीक भारत! पंतप्रधानांचे देशाला संबोधन

    15-Aug-2022
Total Views | 67

narendra
 
 
नवी दिल्ली : देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. भारताचे पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची पंतप्रधान मोदींची ही नववी खेप ठरली. भारताच्या समग्र विकासासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करण्यासाठी तयार असण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. स्वातंत्र्यलढ्याचे योगदान स्मरत करत त्यांचे योगदान लक्षात ठेवण्याची गरज आहे.
 
फक्त भारत वासियांच्याच नव्हे तर जगातील प्रत्येक जण ज्याला भारताबद्दल प्रेम आहे अशा सर्वांनाच अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पारतंत्र्याच्या काळात भारताच्या प्रत्येक भागातून या पारतंत्र्याच्या विरोधात संघर्ष चालू होता. त्या सर्वच भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे, लढ्याचे स्मरण केले पाहिजे. महात्मा गांधी, वीर सावरकर, डॉ. आंबेडकर, यांच्या सह, भगतसिंग, चाफेकर बंधू या सर्वांच्याच त्यागाचे स्मरण, पूजन भारतीयांनी आज केले पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या स्वातंत्र्यवीरांगना, ज्या लढल्या आणि बलिदान दिले या सर्वांनाच नमन केले पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षांचे, भारतीय संविधान सभेच्या प्रत्येकाचे स्मरण केले पाहिजे.
अनेक बाह्य शक्तींनी भारताच्या स्वातंत्र्याला नख लावण्याचे अनेक प्रयत्न केले पण भारताने सगळ्या आव्हानांचा सामना केला आणि त्यातून एक समर्थ भारत उभा राहीला. याचे एकाच कारण की भारताच्या नसानसांत लोकशाही भिनली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला पंतप्रधान आहे. २०१४ सालापासून भारतीयांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मी भारतीयांच्या आशीर्वादाने, साहाय्याने ही जबाबदारी यशस्वीपणे पेलण्याचा प्रयत्न केला. भारतीयांच्या मनात आज भारताच्या विकासासाठी योगदान देण्याची आकांक्षा आहे. भारतीयांच्या या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी सर्वच प्रशासन यंत्रणांना काम करणे भाग पडणार आहे. यासाठी हा दिवस एक नवी संधी घेऊन येत आहे. हर घर तिरंगाने देशातील चैतन्याचे, राष्ट्रीयत्वाच्या भावनांचे दर्शन घडवले आहे. आजचा भारत हा उद्याच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी तयार झाला आहे. आपल्याला ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.
 
 
भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही आजच्या भारतापुढील सर्वात मोठी आव्हाने आहेत. या दोन्ही गोष्टींनी भारत आज पोखरला गेला आहे .आज देशातील अनेक संस्था, घराणेशाहीने पोखरल्या गेल्या आहेत, त्यामुळे देशाचे खूप मोठे नुकसान होत आहे. ही भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी व्यवस्था बदलण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. या भ्रष्टाचार्यांना शिक्षा देण्याची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. जोपर्यंत ही मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत ही व्यवस्था बदलणे अशक्य आहे. यासाठी या अमृतमहोत्सवानिमित्त ही व्यवस्था नष्ट करण्याचा संकल्प करूया. असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले.
 
 
भारताने ७५ वर्षांत अनेक उत्तुंग आव्हानांचा सामना केला, ती आव्हाने पार करून दाखवली. अनेक क्षेत्रात प्रगतीची नवी शिखरे गाठली, अनेक मापदंड प्रस्थापित केले. या सर्वच गोष्टी भारतासाठी अभिमानाच्या आहेत आणि त्यांचा अभिमान प्रत्येक भारतीयांनी ठेवला पाहिजे. अजून अनेक आव्हाने आपल्याला सर करायची आहेत, या आव्हानानांसाठी भारतीयांनी तयार व्हावे, एकजूट, आत्मविश्वास, भारतासाठी योगदान देण्याची वृत्ती हीच देशाला पुढे नेईल. फक्त पुरुषच नव्हेत तर स्त्रियांनीही भारताच्या विकासात योगदान देणे गरजेचे आहे, खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. हीच भारताच्या उज्जवल भविष्याची गुरुकिल्ली असणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121