मुंबई : जगप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेच्या बाबतीत पुन्हा एकदा मोठी घडामोड घडताना दिसून येत आहे. मुकेश अंबानी यांना आज सकाळपासून धमकीचे फोन येत असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने तीन तासात अंबानी कुटुंबीयांना ठार करणार असल्याची धमकी दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयाच्या क्रमांकावर हा धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली असून या फोननंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, वर्ष २०२१ मध्ये देखील अंबानी यांच्या 'अँटिलीया' या निवासस्थानाच्या परिसरात ठेवण्यात आलेल्या स्फोटकांमुळे अंबानींना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मुकेश अंबानींना आलेल्या या धमकीची पोलिसांकडून दखल घेण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केल्याचेही वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
संशयिताला दहिसरमधून अटक
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दहिसरमध्ये ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपी ५७ वर्षीय असून मानसिक आजारी असल्याची माहिती आहे. आरोपी दहिसर पश्चिममधील एमएचबी पोलीस स्थानक परिसरातील रहिवासी असून या इसमाविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात पूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.