मुंबई : फडणवीस-शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत पूर्ण होणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीत हा निर्णय ठरला. पावसाळी अधिवेशन सहा दिवस चालणार आहे. १७ ऑगस्ट रोजी पुरवणी मागण्या आणि अध्यादेश पटलावर ठेवले जाणार आहेत. इतर दिवशी पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान होणार आहे.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनातही शिंदे विरुद्ध ठाकरे, असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा कामगाज सल्लागार समितीत कॅबिनेट मंत्री दादा भूसे आणि उदय सामंतांचा सामावेश करण्यात आला. विधान परिषद सल्लागार समितीत माजी मंत्री अनिल परब आणि अंबादास दानवे यांचा सहभाग करण्यात आला. दरम्यान, सरकारला धारेवर धरण्याची रणनिती ठरविण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विरोधी पक्षांची बैठक बोलविण्यात आली आहे.
शिंदे गटातील आमदार ठाकरेंच्या सोबत?
आमचा कुठलाही नेता हा नाराज नाही. आमदार ठाकरेंकडे जातील हे दिवा स्वप्न आहे, अशी प्रतिक्रीया कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. बच्चू कडूंच्या नाराजीबद्दलही केसरकरांनी प्रतिक्रीया दिली. त्यांना चांगलं मंत्रीपद मिळणार असल्याची शाश्वती केसरकरांना दिली. लवकरच खातेवाटप पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.