नवी दिल्ली: भारताच्या सर्वोच्च पदावर असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा काँग्रेस नेता अधिर रंजन यांनी 'राष्ट्रपत्नी' असा उल्लेख केल्यामुळे संसदेत भाजप आक्रमक झाली. प्रसारमाध्यमांशी बोलताना रंजन यांनी हा शब्दप्रयोग केला होता. काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. दरम्यान, रंजन यांनी माफी मागितली असून जीभ घसरल्याची कबुलीही दिली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत सोनिया गांधींवर हल्लाबोल केला. “देशातील सर्वोच्च संवैधानिक पदावर असणाऱ्या महिलेचा अपमान करण्याची परवागनी सोनिया गांधींनी दिली. सोनिया गांधी आदिवासीविरोधी, दलितविरोधी आणि महिलाविरोधी आहेत. भारताच्या राष्ट्रपतींचा अशा प्रकारे उल्लेख करणे हे केवळ त्यांच्या घटनात्मक पदालाच नाही तर त्या ज्या समृद्ध आदिवासी वारशाचे प्रतिनिधित्व करत आहे, त्यालाही अपमानित करण्यासारखं असल्याची जाणीव काँँग्रेस नेत्यांना नाही आहे,” असंही इराणी म्हणाल्या.
यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनीही सोनिया गांधींवर सडकून टीका केली. हे सर्व जाणून बुजून केल्याचे त्या म्हणाल्या. पक्षाच्या वतीने सोनिया गांधी यांनी माफी मागावी, असा इशाराही त्यांनी ह्यावेळी दिला. “स्वत: एक महिला असूनही आपल्या नेत्याला अशाप्रकारे बोलण्याची परवानगी देणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी माफी मागावी अशी मी मागणी करते. सोनिया गांधींनी देशासमोर येऊन देशाच्या राष्ट्रपतींचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागावी,” असं निर्मला म्हणाल्या.
भाजपने संसदेत घेतलेल्या काँग्रेस विरोधी आक्रमक भूमिकेमुळे लोकसभेच्या कामाला १२ वाजेपर्यंत स्थगिती देण्यात आली होती.