नवी दिल्ली: येत्या दि.१५ जुलैपासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा ‘प्रीकॉशन डोस’ मोफत मिळणार आहे. मोफत ‘प्रीकॉशन डोस’ दि. २७ सप्टेंबरपर्यंत दिला जाऊ शकतो. शासकीय रुग्णालयात ‘प्रीकॉशन डोस’ उपलब्ध असणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ‘प्रीकॉशन डोस’ घेण्याचा कालावधीदेखील कमी केला आहे. पहिल्या दोन मात्रा घेतल्यानंतर नऊ महिन्यांनंतरच एखाद्याला ‘प्रीकॉशन डोस’ मिळू शकत असे. परंतु, तो कालावधी आता सहा महिन्यांवर आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त अमृत महोत्सवाचा भाग म्हणून कोरोना प्रतिबंधात्मक मात्रा अधिकाधिक व्यक्तींना देण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत, १८-५९ वयोगटातील ७७ कोटी लोकसंख्येच्या एक टक्क्यांपेक्षा कमी लोकांना ‘प्रीकॉशन डोस’ मिळाला आहे. ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या १६ कोटी लोकसंख्येसह २६ टक्के आरोग्यसेवा आणि ‘फ्रंटलाईन’ कामगारांना ‘प्रीकॉशन डोस’ मिळाला आहे.