नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कुठलाही निर्णय घेऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावली होती,त्या नोटिशीला शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्याच याचिकेवर होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या याचिकेची सुनावणी करणार आहे. हे खंडपीठ नेमण्यास वेळ लागणार असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
या याचिकेवरची सुनावणी सोमवारीच घेण्यात यावी याबद्दल शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला विनंती केली होती. पण न्यायालयाने ही सुनावणी १२ जुलै पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. जो पर्यंत न्यायालय याबाबत सुनावणी घेत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष याबद्दल सुनावणी घेतील असे सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून देताच, न्यायालयाने आपली सुनावणी होत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी याबाबत कुठलंही निर्णय देऊ नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत.