औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर विरोधी पक्षाकडून टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटर द्वारे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
"तत्वांसाठी सत्तेवर लाथ मारणारे माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे, असो. आज संभाजीनगर मध्ये तोफ धडाडणार असं म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे." असे संदीप देशपांडे यांनी ट्विटर द्वारे म्हंटले आहे.
मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांशी संवाद साधला. दरम्यान, या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी कोणी कितीही काहीजरी प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत जाणारच, अशी प्रतिक्रिया दिली आहे.