
नवी दिल्ली : 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचा बहुचर्चित चित्रपटांच्या यादीत समावेश झाला असून या चित्रपटाचा सीक्वेलही येणार असल्याची माहिती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिली. रविवारी (दि. ५ जून) केलेल्या ट्विट मधून ही माहिती समोर आली असून यात दहशतवादी संघटना, पाकिस्तानी लोकं त्याचबरोबर काही राजकीय पक्षांना टोला लगावला आहे. यात काँग्रेस, आप आणि शिवसेनेचा उल्लेख केल्याचे दिसून येत आहे.
“खूप साऱ्या दहशतवादी संघटना, पाकिस्तानी लोक, कॉंग्रेस, आम आदमी पार्टी आणि आता शिवसेना तसेच अर्बन नक्षलवादी देखील मला ‘द काश्मिर फाईल्स २’ संदर्भात विचारत आहेत. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की मी कुणालाच निराश करणार नाही. फक्त तुम्ही आपली इम्युनिटी वाढवायला सुरुवात करा.” तसेच कोणत्याही पक्षांना, अतिरेकी संघटनांना डिवचत आपण त्यांना नाराज करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
बहुचर्चित चित्रपटांच्या यादीत समावेश
बहुचर्चित चित्रपटांच्या यादीमध्ये 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. १९९० रोजी काश्मीर मध्ये झालेल्या नरसंहारावर आधारित हा चित्रपट असून ह्या चित्रपटावर अनेक वादंगसुद्धा झाले. पण प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहेत.