मुंबई: शिवसेना जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड करू नये व महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, या मागण्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढे ठेवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलेलं आहे. "शिवसेना हा राखेतून भरारी घेणारा पक्ष असून, फार फार तर शिवसेनेची सत्ता जाईल" अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली. संजय राऊतांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता वाढली आहे.
एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी आहेत, ते आमच्या संपर्कात असून बाकीचे आमदार लवकरच परततील. आमच्यात जे गैरसमज आहेत ते दूर केले जातील असा विश्वास देखील राऊतांनी व्यक्त केला. दुसरीकडे संभाजी नगर येथे शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे शिवसेनेतील गोंधळ पुन्हा एकदा दिसून आला . भारतीय जनता पक्षाने आपल्या आमदारांना कुठेही बाहेर न जाण्याचे आदेश दिला आहे. लवकरच एकनाथ शिंदे व भाजप पक्षश्रेष्ठीं यांच्यात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण परिस्थिती पाहता राऊतांचे वक्तव्य खरे ठरणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.