मुंबई : शिवसेनेवर बंडाचे हत्यार उगारत १३ आमदारांसह सुरतला निघून गेलेले, राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. पक्षाकडून शिंदे यांना शिवसेनेना गटनेते पदापासून दूर करण्यात आले आहे. शिंदे यांच्या जागी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती पक्षाकडून शिवसेना गटनेते पदी करण्यात आली आहे.
शिवसेनेतील आमदार फुटीचे संकट लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकनाथ शिंदेंसह काही आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यास महाविकास आघाडी सरकार अस्थिर होऊ शकते. सरकार संकटात सापडल्यावर कोणती खबरदारी घ्यायची यावर काँग्रेसच्या गोटात चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे बंड शांत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर व आमदार रवींद्र फाटक हे शिंदेंना भेटायला गुजरातच्या दिशेने रवाना झालेले आहेत. थोड्यच वेळात नार्वेकर व फाटक शिंदे यांची भेट होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात यावर महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे.