मुंबई : एकीकडे विधान परिषद निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच, महाराष्ट्राचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाने परब यांना दुसर्यांना समन्स बजावले आहेत. अनिल परब यांना मंगळवार, दि. २१ जून रोजी ‘ईडी’ कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश समन्सद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे, निकाल लागण्यापूर्वीच शिवसेनेला धक्का बसला आहे.
अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने पहिले समन्स १४ जून रोजी बजावले होते. यानुसार, १५ जून रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, परब शिर्डीला असल्याने ते पोहोचले नव्हते. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने आपण चौकशीला जाणार नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले होते. तसेच, ‘ईडी’च्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर आता मंगळवारी अनिल परब ‘ईडी’ कार्यालयात हजार राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अनिल परब यांच्या दोन निवासस्थानांसह सुमारे सात ठिकाणी ‘ईडी’ने छापा टाकला होता. त्यांना दापोली येथील रिसॉर्टशी संबंधित ‘मनी लॉण्ड्रिंग’ प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान, अनिल परब यांच्या शासकीय तसेच, खासगी निवासस्थाने, कार्यालयांसह मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमध्ये सात ठिकाणी यापूर्वी छापे टाकण्यात आले होते.