नृत्याविष्काराचा ‘तुषार’ ठेका...

    17-Jun-2022
Total Views | 57
 
 
 
 
mansa article pic
 
 
 
 
बालपणापासूनच आपली संस्कृती-परंपरेची नृत्याच्या जोडीने जोपासना करणारे तुषार सावंत यांच्या नृत्याविष्काराचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
 
आजही नृत्य शिकायचे म्हटले की,मुलगी आणि वाद्य शिकायचे म्हटले की, मुलगा हे लिंगभेदी समीकरण का कोणास ठाऊक पण नजरेसमोर उभे राहते. परंतु, जर एखादा मुलगा नृत्य आणि त्यातही भारतीय नृत्य शिकत असेल, तर पटकन त्याचा स्वीकार केला जात नाही. परंतु, अशावेळी आपली कला, आपली कसोटीच पाहत असते हे समजणे रास्त. असेच एक व्यक्तिमत्त्व ज्याने कितीही कठीण प्रसंग आले तरी आपल्या कलेचे बोट मात्र सोडले नाही; तो म्हणजे तुषार सावंत!
 
 
 
सहसा कोणतीही हिंदी अथवा हलकीफुलकी गाणी कानी पडली की, आपल्या सर्वांचेच पाय थिरकतात. परंतु, तुषारचे पाय बालवयात ’लावणी’चा ठेका धरु लागले. लावणीची ढोलकी, घुंगरांचे नाद, गाण्याचे बोल कानी पडताच आपसुकच त्याचे पाय ती लय पकडायचे अन् मन डोलू लागायचे. त्याच्यातला नर्तकाचे दर्शन वयाच्या अवघ्या बाराव्या-तेराव्या वर्षीच झाले. तुषारच्या नर्तकाला त्याच्या आई-वडिलांनी पूर्ण पाठिंबाही दिला.परंतु, इतर नातेवाईक या गोष्टीचा स्वीकार करायला तयार नव्हते.
 
 
 
तुषारला महाराष्ट्राच्या लोकनृत्याचे एवढेच नाही, तर भारतीय संस्कृतीचे लहानपणापासूनच विलक्षण वेड. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपल्या रीतीभाती या सर्वांनी बालपणापासूनच त्याच्या बालमनावर भुरळ पाडली होती. त्यामुळे प्रथम त्याने आपले आपणच नृत्य बसवून ठिकठिकाणी लावणी नृत्यप्रकार सादर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे लोक तुषारकडे विचित्र नजरेने बघत, टोमणे मारत. परंतु, ’लोक’ या शब्दाला चेहरा नसतो. लोकं नावं ठेवतात म्हणजे नेमकं कोण? आणि ठेवतात तर ठेवू देत; ’कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है केहेना’ हे तुषार लहान असतानाच जाणून होता. त्याचे ध्येय एकच होते ते म्हणजे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे आणि आपली संस्कृती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे.
 
 
 
ही एवढी समज लहान असतानाच येणे, यात त्याच्या आई-वडिलांच्या संस्कारांचा किती मोठा भाग असेल, याचा प्रत्यय आल्या वाचून राहत नाही. आपल्याला आयुष्यात पुढे जायचे असेल, आपले अस्तित्व निर्माण करायचे असेल, तर नक्कीच तो मार्ग काही फुलांच्या पायघड्या घालून सजवला नसतो. त्यामुळे काट्याकुट्यांमधून मार्ग आपल्याला शोधावा लागतो. असे करताना सुरुवातीला अनेकदा आपल्याला अपयशही येऊ शकते, एकदा-दोनदा नव्हे, कदाचित अनेकदा. पण नंतर आपल्या मेहनतीतून या सर्वांना उत्तर देत यश मिळणार आहे, असा दुर्दम्य आत्मविश्वास त्याच्या आई-वडिलांनी तुषारला दिला. त्यामुळे पाय खेचणारे, तर पावलोपावली आहेतच, त्यांना आपल्या कामातून उत्तर देण्याचे तुषारने ठरवले.
 
 
 
तुषारचे ध्येय महाराष्ट्राच्या संस्कृतीबरोबर भारताची संस्कृतीदेखील पोहोचवणे हे झाले आणि म्हणून त्याची गाडी पश्चिमेकडून दक्षिणेकडे म्हणजेच लावणीकडून भरतनाट्यम् या नृत्यप्रकाराकडे वळली आणि स्वतः भरतनाट्यम्चे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. एवढेच नाही, तर त्याने त्यात महाविद्यालयीन पदवीदेखील मिळवली. आपले विचार जर लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील, तर त्याला टीमची आवश्यकता आहे आणि जर मी स्वतः शिकून इतरांनाही शिकवले आणि विशेषतः लहान मुलांना शिकवले, तर ते बालवयापासूनच त्यांच्या मनात हे बीज रुजेल आणि त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच त्याचा वृक्ष होईल, या विश्वासाने तुषारने ’शंभूनाथ नृत्यालय’ नृत्यसंस्थेची स्थापना केली आणि चार विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास जवळपास ८० विद्यार्थ्यांच्या घरात अवघ्या काहीच वर्षांत पोहोचला आहे.
 
 
 
संतांचा विचार मांडणारा आणि मराठी संस्कृतीचा सोहळा दाखवणारा विविध संतांच्या १४ अभंगांचा ’विठूचा गजर’ हा शुद्ध भरतनाट्यम् स्वरूपातील कार्यक्रम तुषारने बसवला आहे. मनुष्य आज हिंसा, क्रोध, अहं, स्वार्थ यातच गुंतला आहे. स्वतःपलीकडेदेखील जग आहे. जीवनात पैसा महत्त्वाचा आहेच, पण पैसा हेच जीवन नाही हे कळेपर्यंत वेळ निघून जाते आणि हे समजण्यासाठी ’संत’ समजण्याची आवश्यकता आहे आणि काहीशा अशाच विचाराने तुषारने आपल्या विद्यार्थ्यांबरोबर ’विठूचा गजर’ हा कार्यक्रम बसवला आहे.
 
 
 
‘माझे विचार, माझ्या मनातील भावना या सर्वात माझा वाटा काहीच नाही, हे सर्व नियतीने ठरविले आहे, मी फक्त निमित्त आहे आणि जे काही पुढे करायचे आहे, ते सर्व माझी कला माझ्याकडून करून घेणार आहे,’ ही श्रद्धा आणि या तरुण वयातल्याच तुषारच्या विचारांसाठी, कार्यासाठी, त्याच्यातल्या प्रयोगक्षम शिक्षकासाठी आणि नर्तकासाठी त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्याला ‘फॉरेव्हर स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ कडून ’ॠङजइअङ खउजछखउ ङएअऊएठ अथअठऊ’ तसेच, ‘होफ इंटरनॅशल वर्ल्ड रेकॉर्ड’कडून ‘चॅम्पियन ऑफ चेंजेस अवॉर्ड’ यांनी सन्मानित करण्यात आले आहे. आजच्या काळात भारतीय संस्कृती, परंपरेला धक्का पोहोचू नये, यासाठी स्वतःहून तुषारने ’नृत्यातून’ उचलेले पाऊल नक्कीच वाखाणण्याजोगे आहे!
 
 
 
 
 लेखिका: वेदश्री दवणे
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121