खा. संजय राऊत पुन्हा गोत्यात ?
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्यसभा निवडणुक आणि अपक्ष आमदारांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्यांमुळे संजय राऊतांच्या विरोधात आज केंद्रीय निवडणूक आयोगात जाण्याचा इशारा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
अपक्ष आमदारांवरील टिप्पणी भोवण्याची शक्यता
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत राऊतांचा झालेला निसटता विजय आणि दुसऱ्या उमेदवाराचा पराभव यावरून शिवसेना आणि शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या समर्थक अपक्ष आमदारांवर घोडेबाजाराचा आणि आपल्याला साथ न दिल्याचा आरोप करत प्रसारमाध्यमांच्या समोर काही आमदारांची नावे उघड केली होती. दरम्यान, संजय राऊत यांच्या या कृतीच्या विरोधात सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला असून राऊतांची निवडणूक देखील रद्द करण्यात यावी अशी विनंती आपण आयोगासमोर करणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.