कचरा हा शहर आणि ग्रामीण परिसराला भेडसावणारा मोठा प्रश्न बनत चालला आहे.असे असले तरी दिवसेंदिवस विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अनेक समस्यांची उत्तरे शोधत आहोत. कचर्याचे योग्य नियोजन करणे हे सरकार समोरचे मोठे आव्हान आहे. पण अशातच गोव्यातील साळीगावमध्ये कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक मोठा प्रकल्प उभा आहे. गोवा स्थापनादिना निमित्त या प्रकल्पाचा आढावा घेणारा हा लेख...
माणसाच्या मूलभूत गरजा म्हटल्या की, आपण म्हणतो अन्न, वस्त्र आणि निवारा! थोडे पुढे जाऊन विचार केला, तर असे वाटत श्वास घेण्यासाठी प्रदूषणविरहित स्वच्छ हवा ही तर सर्वात मूलभूत गरज आहे, जी निसर्गाने आपल्या सर्वांना फुकट आणि भरपूर दिली आहे. ती देणगी जोपासणे हे सर्वतोपरी आपल्याच हातात आहे, ही जबाबदारी पेलतोय का आपण सर्व?
कचर्यामुळे होणारे वायुप्रदूषण ही सर्व जगापुढे असलेली एक जटील समस्या आहे, कचर्याचे योग्य संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर व पुनरुत्पादन अशा सर्व पद्धतींचा वापर करुन या क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन व मदत घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २०१६ मध्ये साळीगावमध्ये एक अद्ययावत प्रकल्प सुरू केला.
‘गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन’चा हा प्रकल्प म्हणजे कचरा व्यवस्थापनासाठीचा एक उत्तम वस्तुपाठ! संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ, भरपूर वाढलेली झाडे, तर्हेतर्हेची डवरलेली फुलझाडे पाहून मन प्रसन्न होते. कार्यालयात प्रवेश करतानाच समोर विघ्नहर्ता गणेश विराजमान आहेत. या गणेशाला आवारातील ताज्या फुलांनी रोज छान सजवलेले असते. कार्यालयातील कर्मचारी हे सर्व आपापल्या कामात व्यस्त असतात. अतिशय शांततेत सर्व कार्यालयीन कामे चालू असतात. मुख्य प्रकल्प कार्यालयाच्या मागच्या बाजूला आहे. ओला व सुका कचरा यासाठी दोन वेगवेगळ्या शेड आहेत. सुक्या कचर्याचे यंत्राद्वारे वर्गीकरण होते व शेवटच्या टप्प्यात माणसांच्या त्या मदतीने त्याचे संकलन केले जाते.
सर्व यंत्रे संगणकाशी जोडलेली आहेत. संगणक कक्षातून थेट पाहणी होते व यंत्रांना आज्ञा दिल्या जातात. एक ट्रक ओला कचरा हा वाटेत कुठेही न सांडता थेट आतमध्ये टाकला जातो, जिथून तो अविरत आतमध्ये यंत्रात ढकलला जातो व पुढे त्यातील प्रचंड प्रमाणात तयार झालेल्या गॅसद्वारे जनित्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती होते, हीच वीज संपूर्ण प्रकल्पासाठी वापरली जाते, अतिरिक्त वीज अंमलात पुरवली जाते. संपूर्णपणे यंत्राच्या साहाय्याने काही तासांतच उरलेल्या कचर्याचे उत्तम प्रतीच्या खतात रुपांतर होते.
आपण टाकलेल्या कचर्यातून...
१. काही कारखान्यांसाठी वापरता येईल, असा कच्चा माल म्हणजेच पुनर्वापरासाठी वेगळा काढलेला सुका कचरा.
२. पुनर्वापरासाठी वापरता न येणारा कचरा (आरडीएफ) म्हणजेच सिमेंटच्या कारखान्यात इंधन म्हणून वापरला जातो.
३. ओल्या कचर्यापासून निर्माण झालेला वायू डोममध्ये साठवून ऊर्जानिर्मिती.
४. ओल्या कचर्याचे कंपोस्ट खत.
अशी उत्पादने मिळतात.
आवारात एक मोठा जलप्रक्रिया प्रकल्प आहे, याच्या मदतीने रोज लाखो लीटर पाणी पुनर्वापरासाठी सिद्ध होते, हा एवढा मोठा प्रकल्प चालवायला रोज लाखो लीटर पाणी लागेल, पण या जलक्रिया प्रकल्पामुळे अक्षरश: रोज दहा हजार लीटरपाणी वापरले जाते. आवारात सौरऊर्जेचे बोर्ड्स पण लावलेले आहेत. जवळजवळ रोज १५० टन कचर्याचे व्यवस्थापन होते. मी स्वत: सगळीकडे फिरून बघितले. कुठेही घाण, कचरा अथवा घाण वास येत नाही.
कारण, हा सुनियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे, ‘डम्पिंग डेपो’ नाही, आपण सगळ्यांनी हे समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या छोट्याशा गोवा या राज्यात एकूण लहान-मोठ्या १९० पंचायती आहेत. या प्रकल्पातून आसपासच्या २५ ते ३० पंचायतींच्या कचर्याचे व्यवस्थापन होते. सध्याच वाढलेल्या अजून एका डोममुळे क्षमता ५० पर्यंत जाऊ शकते, पण संपूर्ण गोव्यासाठी अजून असे तीन तरी प्रकल्प सुरू करावे लागतील. शासन आणि ‘जीडब्ल्यूएमसी’ यांची तरतूद आणि व्यवस्था करत आली. फक्त गरज आहे, सर्व गोवेकरांनी ही समस्या डोळसपणे समजून घेण्याची.
मे महिन्यात या प्रकल्पाची यशस्वी सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त हा प्रकल्प सर्वांना पाहायला खुला करण्याचा मानस तेथील प्रमुख दिग्विजय देसाई यांनी बोलून दाखवला. चहुबाजूला असलेली हिरवीगार झाडे, तर्हेतर्हेचे पक्षी, फुलपाखरे व समोरच जोपासलेला सुंदर बगीचा हे वातावरणच तुम्हाला तेथील स्वच्छ हवेची साक्ष देईल. पावसाचे पाणी साठवून केलेले मोठे जलाशय, त्यात विहरणारी बदके, आजूबाजूला ससेदेखील दिसतात. पावसात मोर येतात, हे सर्व बघता आपण एखाद्या रम्य ठिकाणी सहलीला तर नाही ना आलोत, असा भास व्हावा !
थोडक्यात काय, असे कचरा प्रक्रिया प्रकल्प आमच्या सोसायटीजवळ नको, शाळेजवळ नको म्हणून आंदोलन करण्यापेक्षा असे अजून प्रकल्प लवकरात लवकर कसे होतील, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. निसर्गसौंदर्य आणि मोठमोठे समुद्र किनारे लाभलेले आपले सुंदर गोवा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने नितळ गोंये करुया आणि लाखो पर्यटकांचे आवडते ठिकाण अजून सुंदर करुया .. Not in my backyard ऐवजी Why not in my backyard? असेही म्हणून पाहूया !
- स्नेहा कामत