समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणारी सावित्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2022   
Total Views |

ujwala
 
 
 
 
विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच सर्वार्थाने माणूस म्हणून घडविण्यासाठी अविरत प्रयत्नशील असलेल्या लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, नाट्यकर्मी डॉ. उज्ज्वला करंडे यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा कटाक्ष...
 
 
 
उज्ज्वला या मूळच्या पुण्याच्या. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील कन्याशाळेत झाले. १९७५ च्या दहावी मॅट्रिकच्या पहिल्या बॅचच्या त्या विद्यार्थिनी. पुढे त्यांनी पुण्याच्याच नामांकित सर परशुराम महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. सुरुवातीपासूनच त्यांचा भाषा आणि मानसशास्त्र या दोन्ही विषयांकडे विशेष ओढा होता. परंतु, कसदार साहित्याच्या वाचनाने भाषिक विषयांत उत्तम गती साधता येईल, या विचाराने त्यांनी पदवीसाठी मानसशास्त्राची निवड केली. पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या डॉ. उज्ज्वला यांचे पदव्युत्तर शिक्षण मात्र इंग्रजी माध्यमातून झाले. यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक इंग्रजी भाषेवर प्रावीण्य मिळवत मानसशास्त्र विषयातील पदवी संपादन केली. पुढे मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर परीक्षेतही त्यांनी सर्वोच्च गुणांचा विक्रम करत सुवर्णपदक संपादन केले.
 
 
या परीक्षेसाठी त्यांना एका अग्निदिव्यातून जावे लागले. ‘प्रॅक्टिकल’ परीक्षेच्या तारखा उशिरा जाहीर झाल्यामुळे एक गडबड झाली. त्यांची लग्नाची तारीख आणि ‘प्रॅक्टिकल’च्या परीक्षेची तारीख नेमकी एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षेला बसता येईल की नाही, या विचाराने त्या व्याकूळ झाल्या. परंतु, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून प्राध्यापकांच्या मदतीने त्यांना त्यांचा हुकलेला पेपर विद्यापीठातून देण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे पुण्यात लग्न पार पाडून त्या रात्री डोंबिवलीला आल्या आणि गृहप्रवेश व अन्य विधी आटोपून त्या रातोरात पुन्हा पुण्याला परतल्या आणि सकाळी स. प. महाविद्यालयात एक पेपर आणि दुपारी विद्यापीठात एक पेपर देऊन त्याच दिवशी त्या पुन्हा डोंबिवलीमध्ये दुसर्‍या दिवशीच्या स्वागत समारंभासाठी हजर झाल्या. वस्तुतः त्यांच्या सासरची मंडळी त्यांना रात्री पुण्याला पाठवायला राजी नव्हती. परंतु, त्यांचे पती भालचंद्र करंडे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्या ‘एमए’च्या परीक्षेचे अग्निदिव्य पार पाडू शकल्या.
 
 
 
उज्ज्वला यांचे आई-वडील दोघेही शिक्षक. त्यांनी तुटपुंज्या पगारातही आपल्या चारही मुलांचे शिक्षण उत्तमरित्या पार पाडले. उज्ज्वला यांचे तीनही भाऊ उच्चशिक्षित आहेत. पण आई-वडिलांच्या शिक्षकी पेशाचा वारसा मात्र केवळ उज्ज्वला यांनीच पुढे चालवला.सुरुवातीला नोकरी करायची फारशी तयारी नसलेल्या उज्ज्वला यांना लग्नानंतर लगेचच १९८२ साली डोंबिवलीच्या पेंढरकर महाविद्यालयात अध्यापनाची संधी चालून आली. पुढील ३८ वर्षे त्यांनी पेंढरकर महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. या प्रदीर्घ काळात अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले. विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्या दोन-तीन पिढ्यांमधून त्यांना बदलत जाणार्‍या मूल्यांचेही अगदी जवळून दर्शन झाले. सुरुवातीची संवेदनशीलता जाऊन त्या जागी रुक्ष, स्वार्थी होत जाणारा विद्यार्थीवर्ग त्यांना पाहायला मिळाला. पण, शिक्षकाच्या प्रेमळ जवळीकतेतून उत्तम माणूस घडू शकतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
 
 
 
पाठ्यपुस्तक शिकवत असतानाच वर्गातल्या छोट्या खिडकीतून बाहेरचे विस्तीर्ण आकाश दाखवत त्यात भरारी घ्यायची जिद्द आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे काम त्या मनोभावे करत होत्या. मानसशास्त्र विषय शिकवतानाच आपले विद्यार्थी बाहेरच्या जीवनसंग्रामात कसे सरस ठरतील, याचाच ध्यास त्यांनी सतत बाळगला. पुस्तकी शिक्षण सगळेच देतात. परंतु, जीवन हेच एक मोठे विद्यापीठ आहे, अशी त्यांची धारणा असल्यामुळे जीवनात येणार्‍या चढ-उतारांना भिडण्यासाठी बळ देण्याचे काम त्यांनी निष्ठापूर्वक केले आहे. त्याचेच फळ म्हणून त्यांच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी एक जंगी कार्यक्रम घडवून आणला. सलग सहा तास चालू असलेल्या या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणांमधून त्यांच्यावर स्तुतीचा वर्षाव तर होत होताच, पण अखेरीस साश्रुनयनांनी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या बाईंना निरोप दिला. डॉ. उज्ज्वला यांच्या मते, “विद्यार्थ्याचे निर्मळ प्रेम हीच त्यांची आजवरच्या जीवनातली खरी पुंजी होय.”
 
 
 
पेंढारकर महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत असतानाच त्यांनी सामाजिक भान जपणार्‍या ‘भारतीय स्त्री शक्ती’ संघटनेचे काम करायला सुरुवात केली. जवळपास दहा वर्षे त्या संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. या माध्यमातून त्यांनी स्त्री सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. निरनिराळ्या कार्यशाळा, अभ्यास वर्ग, कौटुंबिक समुपदेशन, वाचकमंच याचबरोबर व्याख्याने, लेख यांमध्ये त्या सतत व्यग्र राहिल्या. याच सक्रियतेमुळे त्यांच्या मनात स्त्रीविषयक संशोधनाचे बीज रुजले आणि त्यांनी स्त्री-आत्मचरित्रांवर सखोल संशोधन केले. याचीच फलश्रुती म्हणजे २००८ साली ‘एसएनडीटी’ विद्यापीठाकडून त्यांना पीएच.डी प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी एका लोकप्रिय दैनिकात स्त्री-आत्मचरित्रांवर एक वर्षभर सदर चालवले. यामध्ये २६ लेखांमधून निरनिराळ्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या ४५ लेखांचे परीक्षण केले. पुढे या लेखाचे ’‘ ती’चे मनोगत’ हे पुस्तक तयार झाले, ज्याला ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांची प्रस्तावना लाभली असून त्याचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. आज हे पुस्तक रसिकांच्या पसंतीला उतरत असून नुकताच त्याला सन्माननीय ‘डॉ. हे. वि. इनामदार प्रबंध एकादशी पुरस्कार’ लाभला आहे. याखेरीज डॉ. उज्ज्वला या ’व्हय मी सावित्री’ या एकपात्री प्रयोगाचेही सादरीकरण करतात. आजवर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अनेक मान्यवर संस्थांद्वारे त्याचे ७५ हून अधिक प्रयोग झाले आहेत.
 
 
 
उज्ज्वला यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २००८ साली राष्ट्रीय स्तरावरील ’प्राईड ऑफ नेशन’ हा पुरस्कार हैदराबाद येथे देण्यात आला. याखेरीज ’आदर्श डोंबिवलीकर’, ‘प्राध्यापक गौरव पुरस्कार’, ’विशेष भाषा पुरस्कार’ आणि राज्य सरकारकडून त्यांच्या सेवेसाठी विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. अशा अष्टपैलू, हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@