बुआ-बबुआचे तू-तू मैैं-मैं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2022   
Total Views |

mayavati
 
 
 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत विजयश्री खेचून आणली. प्रचारादरम्यान, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुलडोझरची खिल्ली उडवली. मात्र, त्याच बुलडोझरने सर्वांना भुईसपाट केले. त्यात मायावतींच्या बसपाची धूळधाणच उडाली. सत्तेचा सोपान मिळेल या आशेवर असलेल्या अखिलेश यांना योगींनी धोबीपछाड दिला. मायावतींनी मात्र निवडणुकीत सक्रिय प्रचारच केला नाही. परिणामी, त्यांना केवळ एकच जागा मिळाली. कधीकाळी नरेंद्र मोदींविरोधात एल्गार पुकारून अखिलेश आणि मायावती एकत्र आले. मात्र, पुढे सुत काय जुळलं नाही. या बुआ-बबुआंना मोदींनी पराभवाची धूळ चारली. आताही योगींनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवून त्यांना आस्मान दाखवले. मात्र, सुधारतील ते अखिलेश भैय्या कसले. त्यांनी नुकतीच मायावतींवर त्यांच्या निवडणुकीत सक्रिय प्रचार न करण्यावर टीका केली. राष्ट्रपती होण्यासाठीच मायावतींनी ताकदीने निवडणूक लढवली नाही, त्याचा फायदा भाजपला झाल्याचे बडे बोल अखिलेश भैय्यांनी म्हटले. त्यावर मायावतींनी प्रत्युत्तर देत, “मागासवर्गीय आणि मुस्लीम एकत्र आले, तर मी युपीची मुख्यमंत्री किंवा देशाची पंतप्रधान बनू शकते, पण राष्ट्रपती बनण्याबाबत मी कधी विचार केला नाही,” असे म्हटले.
 
 
मुस्लिमांवरील अत्याचाराला सपा जबाबदार असल्याचा निशाणाही त्यांनी साधला. “सपा मी राष्ट्रपती बनण्याची स्वप्ने पाहत आहेत. कारण, अखिलेश यांच्या मुख्यमंत्रिपदातील अडथळा दूर होईल,” असेही त्या म्हणाल्या. एकूणच निवडणुकीत दणकून आपटूनही बुआ-बबुआंच्या या वैचारिक दिवाळखोरीने आणि बाष्कळ बडबडीने उत आणला आहे. एक आमदार जिंकूनही बुआंना अजूनही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाची आशा आहे. एकंदरीत बुआ-बबुआमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरीही योगी सरकार मात्र, राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यात यशस्वी झाले आहे. कोणताही गडबड गोंधळ न करता विविध धार्मिक स्थळांवरून सहा हजार भोंगे नुकतेच हटविण्यात आले असून, ३० हजार भोंग्यांचा आवाज नियमानुसार मर्यादित करण्यात आला आहे. हनुमान जयंतीलाही युपीत कुठेही हिंसाचार झाला नाही. त्यामुळे बुआ-बबुआंच्या या वैचारिक दिवाळखोरीत आणि तू-तू मैं-मैंमध्ये उत्तर प्रदेश मात्र, योगींच्या नेतृत्वात विकास वाटेवर जोरात धावत आहे.
 
 
पूर्वोत्तर विकासवाटेवर...
 
 
गुरूवारी आसाम दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील दीफू येथे ‘शांतता, एकता आणि विकास’ रॅलीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी सात नवीन कर्करोग रुग्णालये देशाला समर्पित केली. तसेच, ५०० कोटींच्या योजनांसह २९५० अमृत सरोवर योजनांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. आसाम कॅन्सर केअर फाऊंडेशन, आसाम सरकार आणि ‘टाटा ट्रस्ट’च्या संयुक्त उपक्रमांतर्गत दिब्रुगढमध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठे परवडणारे ‘कॅन्सर केअर नेटवर्क’ तयार केले जाणार आहे. यात एकूण १७ रुग्णालये बांधली जाणार आहे. त्यापैकीच सात रुग्णालयांचे एकाच दिवशी लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे, देशात एकाचवेळी सात रुग्णालयांच्या उद्घाटनाची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. या रॅलीमध्ये पंतप्रधानांनी जनकल्याण, जनसुविधा आणि जनभागिदारी या तीन मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
 
पूर्वीसारखे ईशान्येकडील राज्ये आता दुर्लक्षित नाही. उलटपक्षी देशाच्या विकासगंगेमध्ये या राज्यांचादेखील महत्त्वाचा वाटा आहे. त्यातही आसामचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. काँग्रेसच्या कालखंडात पूर्वोत्तर राज्यांमध्ये हिंसाचार, गोळीबार आणि सीमावाद पाहायला मिळत होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये ईशान्य भारतामध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये जवळपास ७५ टक्क्यांची घट झाली आहे. जाचक ठरणारा ‘आफ्स्पा’ कायदाही नागालँड आणि नंतर त्रिपुरातून हटविण्यात आला. आसामध्येही तो गेल्या ३० वर्षांपासून लागू होता. याआधीची सरकारे तो आणखी वाढवत राहिली. मात्र, आता तो २३ जिल्ह्यातून हटविण्यात आला आहे. तसेच, अन्य ठिकाणांहून देखील हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट करण्याबरोबरच त्या अधिक पारदर्शक करण्यासाठीही केंद्र सरकार गेल्या सातत्याने प्रयत्नशील आहे. ईशान्य भारतातील राज्यांचा विकास थांबण्यामागे आपसात असलेला सीमावाद हेदेखील मोठे कारण होते. त्यामुळे हिंसाचार, गोळीबाराच्या घटना घडत. मात्र, आता गेल्या कित्येक दशकांपासूनचे सीमावाद सौहार्दपूर्ण आणि चर्चेतून सोडवले जात आहेत. त्यामुळे ईशान्य भारत सशक्त होत असून विकासाच्या वाटेवर जात आहे, हे नक्की...
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@