मुंबई : खार पोलीस स्टेशन मध्ये मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशावरून चुकीची एफआयआर दाखल करण्यात आली असा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या हे संजय पांडे यांच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी चुकीची एफआयआर दाखल झाली होती. ही एफआयआर रद्द करून नवीन एफआयआर दखल करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
ही मागणी पूर्ण न झाल्यास आपण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे दाद मागणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. आपल्या खोटयासहीनिशी ही एफआयआर दाखल करण्यात आली होती असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. खार पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जर हीच काळजी हल्ला झाला त्या दिवशी घेतली असती तर आज सोमय्या यांच्यावर हल्ला झाला नसता आणि आज ही वेळच आली नसती असे मत मुंबईच्या माजी उपमहापौर आणि भाजप नेत्या अलका केरकर यांनी नोंदवले.