सर्पिलाकार मंडलाकृतीच्या केंद्रस्थानी व्यक्ती, व्यक्तीशी संबंधित एक वर्तुळ कुटुंबाचे, कुटुंबाशी संबंधित एक वर्तुळ समाज, जात, नंतर राष्ट्र, विश्व आणि नंतर अनंत ब्रह्मांड व सर्वजण एकमेकांचे पूरक आणि सहकारी, कोणातही संघर्ष नाही, असे ‘एकात्म मानवदर्शन’ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी २२ ते २५ एप्रिल १९६५ दरम्यान मुंबईत दिलेल्या व्याख्यानांमध्ये प्रस्तुत केले. त्या पृष्ठभूमीवर ‘एकात्म मानवदर्शना’विषयीच्या लेखाचा आज दुसरा व अखेरचा भाग...
देशाची सध्याची स्थिती पाहता असे म्हणता येते की, सध्या भारत आपली ओळख विसरला आहे आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या मते राष्ट्र उभारणीसाठी राष्ट्राने स्वत:ला ओळखणे आवश्यक आहे. त्यांच्या मते स्वत:ची अशी ओळख असल्याशिवाय कुठलेही राष्ट्र उभारणे शक्य नाही व ही ओळख देशाच्या संस्कृतीतून मिळत असते. सध्या देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, अशा वेळी आतापर्यंत स्वीकारलेल्या सामाजिक-आर्थिक व राजकीय नीतिंची जशी समीक्षा आवश्यक आहे तसाच स्वातंत्र्यानंतर देशाने स्वीकारलेला ‘संस्थागत ढांचा’सुद्धा तपासणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य विचार-आचारावर आधारित भारतीय नीति व भारतीय संस्था या म्हणाव्या तेवढ्या उपयोगी ठरल्या नाहीत हे सत्य आहे. कारण, त्या भारतीय जनमानसात समरसतेची एकात्म भावना व राष्ट्रवादाची समान इच्छा निर्माण करू शकल्या नाहीत. हे खरे की, आर्थिक नीतित अर्धवट का होईना बदल केले गेले पण बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वगैरेत बदल करण्याचे धाडस स्वार्थी राज्यकर्त्यांना अजून जमले नाही. शासन व न्याय व्यवस्थाही ढासळत असल्याचे चित्र आहे व तेही बदलाच्या अपेक्षेत आहे. एकंदरीतच बदल आवश्यक आहेत व ‘एकात्म मानव दर्शन’ तेथे उपयोगी ठरू शकते, असे म्हणता येते. लेखाची मर्यादा लक्षात घेता आजच्या काहीच समस्या आणि त्यातील ‘एकात्म मानव दर्शन’ विचारांची उपयोगिता सारांश रूपाने येथे मांडली आहे.
१) ढासळत चाललेली भारतीय लोकशाही आणि निवडणुकींचे अतिरेकी राजकारण हा एक सद्यःस्थितीतील महत्त्वाचा प्रश्न आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या काळीच भारतीय राजनीति संधीसाधू व सिद्धांतहीन व्यक्तींचा आखाडा बनली होती. आता तर ती त्याहीपलीकडे जाऊन स्वार्थी व मतलबी झाली आहे. राष्ट्रहिताला बाधक अशा भूमिकाही घेताना हे राजकीय पक्ष व राजकारणी दिसत आहेत. त्यामुळे या राजकारणाने लोकशाहीचे भवितव्य धोक्यात आणले असल्याचे सध्याचे स्पष्ट चित्र आहे. पं. दीनदयाळ यांना भीती होती की, राजकारणातील ‘संधीसाधू वृत्ती’ सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास उडण्याला कारणीभूत होईल. निवडणुकीत कुणालाही मतदान न करणार्या मतदारांची संख्या वाढत आहे व ते हेच सांगत आहे. ‘एकात्म मानव दर्शन’ राजकारणातील व्यक्तींच्या निष्कलंक चारित्र्याचा आग्रह धरते व राजकारण स्वार्थ-रहित व देशहिताच्या भूमिकेतून असावे, असे सांगते. आजचे तत्त्वहीन राजकारण व नीती-हीन राजकारणी देशाला उपयोगी नाहीत हे समजून घेणे त्यामुळेच गरजेचे आहे व त्या दृष्टीने भारतीय निवडणूक पद्धती व निवडणूक आयोगासारख्यासंस्था या दोन्हीमध्ये बदल आवश्यक म्हणावे लागतील.
२) व्यक्ती आणि समाज यातील संघर्ष हा पाश्चिमात्य विचाराचा केंद्रबिंदू आहे व तोच आज भारतीय लोकशाहीचा आधार बनला आहे व त्यामुळे मोठ्या समस्याही उद्भवलेल्या आहेत. व्यक्तीस्वातंत्र्य हे मुख्य व समाजहित दुय्यम म्हणत व्यक्ती व समाजामध्ये संघर्ष निर्माण केला जात आहे व व्यक्तीस्वातंत्र्य हे आपल्यापुरते मर्यादित, टोकाचे स्वार्थी, एकांतिक व सामाजिकदृष्ट्या संकुचित होत असल्याचे चित्र आहे. पण लोकशाही एक सामाजिक व्यवस्था आहे व त्यात व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक अपेक्षित नाही. मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार समाजाला अराजकतेकडे घेऊन जाईल यातही दुमत असण्याचे कारण नाही. भारतीय विचार परंपरेत समाजहित व व्यक्तीहित वेगवेगळे नाही, तर ते एकमेकाला पूरक मानले जाते. ‘एकात्म मानव दर्शन’ व्यक्ती व समाजात संघर्ष मानत नाही, तर एकमेकांच्या हितासाठी दोघांनीही त्याग करत सर्वांगीण राष्ट्रहित साधण्याची अपेक्षा करते. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या मते व्यक्ती समाजातील प्रत्येक संस्थेचा अंग असते व अनेक नात्याने एकमेकांशी संबंधित असते. त्यामुळे व्यक्ती एकांगी असत नाही, तर ती बहुरंगी असते, असे असल्यानेच परस्पर सहयोग, समन्वय व पूरकता तसेच एकात्मतेने सर्वांबरोबरती राहू शकते. संघर्ष टाळणे हा व्यक्तिमत्व विकासाचा पाया झाला, तर हे शक्य होते व तेच ‘एकात्म मानव दर्शन’ सांगते. व्यक्ती विकासासाठीचे स्वातंत्र्य व समाजहिताला बाधक ठरणारे स्वातंत्र्य यात भेद करत जसा हा संघर्ष टाळावा लागेल तसाच न्यायव्यवस्थेला काही मार्गदर्शक सूचना पाळत हे साधावे लागेल.
३) राष्ट्रीयता आणि आंतरराष्ट्रीयता यात वाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न होत असून, राष्ट्रवादी म्हणजे दुसर्या राष्ट्राचा व मानव जातीचा विरोधक, असे रूप दिले जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाश्चिमात्य देशात उमजलेली ‘राष्ट्रवाद’ कल्पना ‘शोषणावर’ आधारित आहे व तीच गृहीत धरून हा विषय मांडला जातो. भारतीय राष्ट्रवादाची कल्पना सहकार्य व एकमेकांच्या पूर्णतेची पराकाष्ठा करत एकात्म साधण्यात आहे हे समजून घेतले, तर हा संघर्ष काल्पनिक म्हणावा लागेल. भारतीय ‘राष्ट्रवाद’ कुणाच्याही शोषणाचा व अरेरावीचा पुरस्कार करीत नाही, तर प्रत्येकाकडून इतरांचे सहअस्तित्व मान्य करून सर्वांकडून सर्वांच्या सन्मानाची अपेक्षा करतो. त्यामुळे ‘एकात्म मानव दर्शन’ राष्ट्रवादाला खर्या अर्थाने आंतरराष्ट्रीय रूप देते, असे म्हणावे लागते. तेच सध्या महत्त्वाचे आहे.
४) राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक समरसता हा प्रश्न भारतीय लोकशाहीतील महत्त्वाचा प्रश्न होऊन बसला आहे. हिंदू-मुस्लिमातील तेढ राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणत आहे, तर जातीयवादी निवडणूक राजकारण भारतीय समाजाला समरस होऊ देत नाही. हासुद्धा भारतीय विचार नाकारण्याचा व आपली ओळख विसरण्याचा परिणाम म्हणता येईल. भारतीय मुस्लीम मुळातील हिंदू होते हे एक सत्य आहे व जोर-जबरदस्तीने मुस्लीम झाल्यावरही कित्येक वर्ष भारतीय संस्कृती पाळतच ते आजचे मुस्लीम झाले आहेत हा इतिहास विसरून चालणार नाही. भारतातील निवडणूक राजकारण व आंतरराष्ट्रीय इस्लाम प्रसाराच्या कल्पना व त्यातून आलेला अतिरेक इथल्याही मुस्लिमांवर प्रभाव टाकत आहे व त्यांना भारतीय समाजाबरोबर समरस होऊ देत नाही. याला एकात्म मानव दर्शनाने दिलेले उत्तर एकच आहे ते म्हणजे राष्ट्रहित व भारतीय राष्ट्रवादाची समान इच्छा व धारणा भारतीय मुस्लिमांसहित सर्व भारतीय समाज घटकात निर्माण होणे. ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास’ हे भाजपचे धोरण सूत्र यातूनच आले आहे व ते योग्य म्हणावे लागेल. सर्व भारतीयांना सर्व कायदे समानतेने लागू करण्याने हे साधू शकेल.
५) आर्थिक विकास कल्पना ही वेगवेगळ्या वैचारिक आधारामुळे क्लिष्ट झाली आहे. आर्थिक विकासाची पाश्चिमात्य कल्पना भौतिक विकास व उपभोगवादाला प्राधान्य देणारी असल्याने निसर्ग वा पर्यावरण आणि प्राणी-वनस्पती जगत तसेच इतर मनुष्य गट यांच्या शोषणावर जोर देते व शोषणाशिवाय विकास अशक्य आहे असे मानते. तसेच, हे विकास मॉडेल केंद्रीकरणावर व मोठमोठ्या उद्योगावर जसे भर देते तसेच सर्व साधनावरच्या मालकीसाठी सरकार, व्यक्ती वा स्वतंत्र व्यक्तिसमूह संस्था याचीच निवड करते. भारतीय ‘एकात्म मानव दर्शन’ भोगवादी भौतिकवादाला अतिरेकी महत्त्व नाकारते व विकेंद्रीत पण लहान विकास केंद्रावर भर देते. मालकीबाबत सरकार वा व्यक्तिऐवजी सहकाराला व विश्वस्त कल्पनेला मानते. नैसर्गिक संसाधनांशी ताळमेळ व संतुलन करत भौतिक व आध्यात्मिक विकास साधने ‘एकात्म मानव दर्शना’ला अपेक्षित आहे. तसेच, स्वदेशी व स्वावलंबन राष्ट्राला आपली ओळख व सामर्थ्य देण्यास उपयुक्त आहे, असे मानते. आजच्या स्थितीत सर्वांगीण हितासाठी हाच योग्य मार्ग म्हणता येईल.
‘एकात्म मानव दर्शन’ आजही उपयुक्त
‘एकात्म मानव दर्शन’ पं. दीनदयाळ उपाध्या यांनी चार भाषणात मांडले. हे विचार मांडताना ते म्हणाले होते की, सामान्यत: तात्कालिक प्रश्नाचा विचार केला जातो. कधी आर्थिक प्रश्न, तर कधी राजकीय प्रश्न, तर कधी सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ही केला जातो. पण संपूर्ण जीवनाची रचनात्मक दृष्टी कुठली असावी याबाबत फार विचार केला जात नाही व त्यामुळे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. भारतीय राजकीय पक्ष व नेते संकुचित व निवडणुकीपुरत्या भूमिका घेताना दिसतात व त्यासाठी राष्ट्रीय हिताचा विचार न करता एकमेकांशी हातमिळवणी करताना दिसतात. भारतीय विचारवंतही प्रश्नावर तुकड्यांनी विचार करण्याच्या पाश्चात्यांच्या पद्धतीचा उपयोग करतात. पं. दीनदयाळ यांच्या मते तुकड्या-तुकड्यामध्ये प्रश्न सोडवणे अवघड होते. त्याचे कारण प्रश्न वेगवेगळे असले वा त्यात वरवर विविधता दिसत असली तरी त्यांच्यात जी एक एकात्मता असते ती शोधल्या जात नाही व प्रश्न कायम राहतात. भारतीय विचार दर्शन याच ‘एकात्मते’चा शोध घेते व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते व तीच आजची गरज आहे. ‘एकात्म मानव दर्शन’ विचार म्हणूनच आजच्या स्थितीतही उपयुक्त आहेत, असेच म्हणावे लागते.
- अनिल जवळेकर
(पं. दीनदयाळ उपाध्यायांचे ‘एकात्म मानववाद’ व दत्तोपंत ठेंगडींचे ‘एकात्म मानव दर्शन-एक अध्ययन’ तसेच एकात्म प्रबोध मंडळाचे ‘नॅशनल पॉलिसी स्टडीज इन द लाइट ऑफ एकात्म मानव दर्शन’ ही पुस्तके अभ्यासुंनी जरूर वाचावीत)