गोष्ट शाळेची...

    30-Mar-2022
Total Views | 82
 

daitva 
 
 
मोज शाळेतील मुलांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. या सगळ्याबद्दल सांगायचे, तर मोज शाळेचीच गोष्ट सांगायला हवी. वाचलेल्या पुस्तकांवर स्वत: लिहिण्याची किमया या शाळेतील मुलांनी केली. त्यात त्यांच्या भावना उलगडलेल्या होत्या. मुलांच्याबद्दल आणि त्यांच्या लिखाणाबद्दल लिहायलाच हवे...
 
 
वाड्यातील मोज ही जिल्हा परिषदेची एक शाळा. तीन वर्षांपूर्वी या शाळेची आणि आमच्या ग्रुपची ओळख झाली. शैक्षणिक साहित्याचे वाटप या उपक्रमासाठी या शाळेत पहिल्यांदा गेल्याचे आजही आठवते. पहिली ते आठवीची शाळा. अत्यंत तळमळीने आणि आपलेपणाने शिकवणारे किशोर काठोले गुरुजी यांच्या संपर्कात आम्ही होतो. शाळेच्या पहिल्या भेटीपासूनच आम्ही शाळेशी आणि मुलांशी अगदी सहजपणे जोडले गेलो. ओंकारदादांशी तर मुलांची खास गट्टी जमली. ओंकारदादा दिसला की, सगळे त्याच्या भोवती गराडा घालून उभे. मग काय गप्पा रंगतात. मुलं हुशार आणि चुणचुणीत असल्याचे हळूहळू लक्षात यायला लागले. प्रत्येक भेटीत किशोर सरांचे नावीन्यपूर्ण उपक्रम आणि त्यास मुलांनी दिलेला भरभरून प्रतिसाद आम्ही अनुभवत होतो. या मुलांचं वाचनसुद्धा अफाट. पुस्तक फक्त वाचायचं नाही बरं का! तर त्यावर परीक्षण लिहिण्यासाठी एक वहीच केलेली. मग त्यात पुस्तकाचे नाव, लेखक/लेखिकेचे नाव, प्रकाशक, मूल्य आणि हे पुस्तक आवडले, तर का आवडले किंवा एखाद्या आवडत्या पात्रावर अभिप्राय. मोठ्यांनाही लाजवेल अशा प्रकारे त्याची टिपणी. कधी गाण्याचा कार्यक्रम, कधी खेळत खेळत शिका तर कधी चित्रकलेची कार्यशाळा... मोज शाळेतील मुलं सगळ्यात भारी, अर्थातच किशोर सरांचे त्यामागील कष्टही आम्ही पाहत होतो.
पण या वेळी तर मुलांनी भलतीच कमाल केली. फेब्रुवारी महिन्याच्या भेटीत मुलांशी गप्पा मारताना सहज विषय निघाला, “तुम्ही काय काय वाचत आहात सध्या? वाचलेल्या पुस्तकांचे लेखक किंवा लेखिका कोण?” मुलंही उत्साहाने उत्तरं देत होती. या शाळेत आपल्या शहरातील शाळांसारखं अत्याधुनिक ग्रंथालय नाही. एवढंच काय, पण पुस्तक ठेवण्यासाठी साधं कपाटही नाही. मग गुरुजींनी शक्कल लढवली आणि जमिनीवरच चटईवर ही पुस्तकं सुबकरित्या लावून त्याला कल्पकतेने नाव ही दिलंय - ‘अंथरलेले ग्रंथालय.’ अशा या ‘अंथरलेल्या ग्रंथालया’तील कुठली कुठली पुस्तक वाचली, हे मुलं भरभरून सांगत होती. बोलता बोलता एक कल्पना सुचली. मुलांना आम्ही सांगितलं की, मग तुम्ही का लिहीत नाही गोष्टींचं पुस्तक? त्याचे लेखक, चित्रकार सगळं काही तुम्हीच. काय भारी वाटेल ना ऐकताना या गोष्टीच्या पुस्तकाचे लेखक तुम्हीच असाल तेव्हा. मग कोण कोण लिहिणार बरं पुस्तक? असं विचारताच १७-१८ मुलांनी हात वर केले. मार्चमध्ये आम्ही परत येऊ तेव्हा त्याचं प्रकाशन करू आणि त्या विद्यार्थ्याला खास बक्षीसही मिळेल, असं ठरवलं गेलं.
“सर, किती मुलं गोष्टीचं पुस्तक लिहीत आहेत आता? संख्या वाढली का?” सहज चौकशी म्हणून किशोर सरांना आठ दिवसांनी फोन केला. सर म्हणाले, “हो तर... आता ३० मुलं गोष्टी लिहू लागली आहेत. भारीच उत्साह आहे सगळ्यांचा.” “अरे वा! खूपच मस्त.” मलाही ऐकून छान वाटले. आमचे स्नेही, देणगीदार, हितचिंतक नेहमीच विचारत असतात मुलांसाठी आम्ही काय करू शकतो. बोरिवलीच्या शुभदा चिटणीस यांना मी सांगितले की, ३० मुलं गोष्टींचं पुस्तक लिहीत आहेत. तुम्ही त्यांना बक्षीस म्हणून काही देऊ शकाल का? सांगायचीच खोटी! त्यांनी चित्रकलेची वही, रंगाचे साहित्य, पट्टी-पेन-पेन्सिल असे ३० किट बनवून सोनेरी वेष्टनांत ते बांधून माझ्याकडे पाठवूनच दिले.
थोड्या दिवसांनी किशोर सर म्हणाले की, “आता ५० मुलं गोष्टी लिहीत आहेत.” मग काय ‘क्रॉफर्ड मार्केट’ला जाऊन आमचे टीम मेंबर्स मिळालेल्या निधीतून आणखी काही सेट घेऊन आले. जसजसे मोजला परत जायचा दिवस जवळ येत होता, तसतसे आम्हीही उत्सुक होतो मुलांनी लिहिलेली गोष्ट वाचण्याकरिता. जाण्याचा दिवस अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आणि किशोर सर म्हणाले की, “मॅडम १०० मुलांनी गोष्टींची पुस्तके लिहिली आहेत.” आनंदाची बातमी होती, पण आता १०० बक्षीसं तयार करायची होती. मानसीने ही जबाबदारी स्वीकारली. लगबगीने सगळं साहित्य जमवलं आणि सोनेरी कागदाच्या वेष्टनात ते छान पॅक केलं.
जाण्याचा दिवस येऊन ठेपला. शाळेत त्या दिवशी भरगच्च कार्यक्रम होते. आनंद मेळा, महिला दिनाचा कार्यक्रम आणि गोष्ट-लेखन स्पर्धेचाबक्षीस समारंभ. सगळीकडे उत्साही वातावरण होतं. सरांनी १०० गोष्टींची पुस्तकं आणून आमच्या समोर ठेवली. त्यातून ३० उत्कृष्ट पुस्तकं निवडायची होती. मी, संपदा, मानसी एक-एक पुस्तक आम्ही चाळत होतो आणि अचंबित होत होतो. विषयांमधील वैविध्य, मराठीतच काय, पण हिंदीमध्येही गोष्ट लिहिली गेली होती. गोष्टीला साजेशी चित्र, त्याचं रंगकाम, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, पुस्तकाविषयी माहिती. अगदी ‘प्रोफेशनल’ पुस्तक असावं तसं! पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक, चित्रकार, मांडणी आणि मूल्य किती तेसुद्धा. एकदा गोष्ट लिहून झाल्यावर ती पुन्हा तपासून त्यात किशोर सरांचं मार्गदर्शन घेऊन, ‘एडिट’ करून ती पाहणं, मग लिहून काढण्याचे सोपस्कार करणं. बरं, याही पुढे जाऊन ही गोष्ट मला का लिहावीशी वाटली त्याबद्दल मनोगत... आमची पूर्ण टीम डोळे विस्फारून पाहत होती आणि वाचत होती. एवढी जाण या मुलांमध्ये आली तरी कुठून? अफाट कल्पनाशक्ती, वैचारिक पातळी, गोष्टींतून दिलेला मोलाचा संदेश. या सर्वांतून ३० गोष्टी निवडून काढणे खरंतर कठीणच होते.
त्यातून निवडलेल्या पहिल्या ३० गोष्टींना बक्षीस वाटप केले. त्या दिवशी शाळेत बर्‍याच मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. त्या सर्वांनीच या नवोदित लेखक आणि लेखिकांचे भरभरून कौतुक केले. या सर्वांमागे किशोर सरांची अफाट मेहनत दिसून येते. आम्ही फक्त एक कल्पना मांडली पण त्याला प्रत्यक्ष स्वरूपात आणण्याचे काम किशोर सरांनी आणि त्यांच्या विद्यार्थांनी करून दाखविले. फक्त मराठी भाषा दिनी मराठी भाषेवरचे प्रेम व्यक्त करणार्‍यांना हा मिळालेला एक धडाच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. डॉक्टर आणि इंजिनिअर जसे घडतात, तसे या शाळेतून भविष्यात लेखक आणि लेखिका उदयास येतील, यात वादच नाही. शहरातील मुलांना सर्व अद्ययावत सोईचे ग्रंथालय उपलब्ध असूनसुद्धा किती मुलं पुस्तक वाचत असतील, हा कळीचा मुद्दा आहे. स्वतःच पुस्तक लिहिणे, ही तर ‘दूर दूर की बात’ आहे. मोजसारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत कुठल्याच अद्ययावत सोईसुविधा नसताना १०० मुलं लिहिती झाली. गोष्टीची पुस्तक ही जर मुलांच्या साक्षरता शिक्षणाचा भाग बनली, तर ’मराठी भाषा दिन’ रोजच साजरा होईल. या शाळेतील मुलांसाठी ग्रंथालय आणि पुस्तक ही त्यांची वैचारिक आणि बौद्धिक भूक आहे, याची जाणीव गेल्या तीन वर्षांत आम्हाला झाली. त्यासाठी देणगीदार पुस्तकही देत आहेत. अशी ही मोज शाळेची गोष्ट. या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन नक्कीच बाकीच्या शाळेतील मुलंही लिहिती होतील आणि स्वतःची गोष्ट लिहितील...
 
- पूर्णिमा नार्वेकर
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121