ध्वनिशास्त्राचा युवा अभ्यासक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2022   
Total Views |

Shubham Joshi
 
 
‘साऊंड इंजिनिअरिंग’ अर्थात ‘ध्वनिशास्त्र’ या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे करिअरची वाट पत्करणार्‍या नाशिकच्या शुभम जोशीविषयी...
‘साऊंड इज द व्होकॅबलरी ऑफ नेचर.’ ध्वनीसाठीची ही इंग्रजीतील एक सुंदर व्याख्या... जेव्हा भावनांना स्वर प्राप्त होतो, तेव्हा तिथे संगीताची निर्मिती होते, हे एक सत्य. ‘साऊंड इंजिनिअरिंग’ या क्षेत्रात यशस्वी करिअर घडविणार्‍या नाशिकच्या शुभम जोशीने ही व्याख्या केवळ जाणूनच घेतली नाही, तर तिला आत्मसात करत मूर्त स्वरुपदेखील दिले.
 
वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून तबला शिकणार्‍या शुभमने त्यात ‘विशारद’ पूर्ण केले. स्पीकर केवळ एका आकाराचा दिसतो. पण मग त्यातून इतके वैविध्यपूर्ण संगीत कसे निर्माण होते, हा प्रश्न त्याच्या बालमनाला पडला. मग तबल्याचे शिक्षण घेताना आवाज निर्मितीच्या बारकाव्यांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. तबल्यावरची थाप बदलते, तेव्हा आवाजात होणारे सूक्ष्म बदल ऐकताना त्यामागचं शास्त्र समजून घेण्यातही शुभमला रस वाटायला लागला.
 
व्यावसायिक शिक्षणासाठी पुढे त्याने विज्ञानाची वाट निवडली व ‘मायक्रोबायोलॉजी’ या क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण घेत असतानाच एकीकडे ’साऊंड मिक्सिंग’चेधडे गिरवायला शुभमने सुरुवात केली. ‘मायक्रोबायोलॉजी’ नंतर प्रत्यक्ष आयुष्याची वाट निवडायच्या क्षणी त्याच्या शिक्षकांनी, ’तुला संगीत क्षेत्राची आवड व ध्यास आहे, त्यात तू भरीव योगदान द्यायला हवे,’ हा दिलेला सल्ला शुभमसाठी मोलाचा ठरला. संगीताचे रितसर शिक्षण घेतले नसले तरी आवड आणि अभ्यास असणार्‍या त्याच्या पालकांनी दिलेली साथही फार महत्त्वाची होती. मग ‘साऊंड इंजिनिअरिंग’चे शिक्षण मुंबईतील एका नामवंत संस्थेत शुभमने पूर्ण केले.
 
‘साऊंड इंजिनिअरिंग’ हे क्षेत्र तसे तुलनेने नवे. करिअर म्हणून अजूनही या क्षेत्राची फारशी निवड होत नाही. त्यामुळे उपलब्ध संधी आणि नवनिर्मितीला मिळणारा वाव शुभमला महत्त्वाचा वाटतो. कुठल्याही ध्वनीच्या निर्मितीमागची प्रक्रिया, त्यातले तांत्रिक बारकावे समजून घेणे अतिशय रंजक असते. शुभमची आवड व अभ्यासाची तयारी बघता, त्याच्या गुरूंकडून त्याला मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन वेळोवेळी मिळत गेले. ‘साऊंड डिझायनिंग’ हा त्याच्या आवडीचा भाग. लहान-मोठ्या वाद्यांतून निर्माण होणारे स्वर, पावसाचे थेंब, पाण्याचा आवाज, पुस्तकाची पाने उलटणे, रस्त्यांवरच्या गाड्यांचे आवाज ते अगदी अनाहताचा नाद हे सारंच संगीत आहे. याचा कलात्मकरीत्या कसा वापर करता येईल, हा विचार शुभमच्या मनात सतत रुंजी घालत असे. या प्रत्येक आवाजाची नोंद आपलं मन घेत असतं. मात्र, चिमणीच्या आवाजातील कंपनांमध्ये योग्य ते बदल करून ‘डायनासोर’चा आवाज निर्माण करणे, येथे तंत्रज्ञान येते, म्हणून अभ्यास महत्त्वाचा, असे शुभम सांगतो आणि हेच तो पुढे आपल्या विद्यार्थ्यांनादेखील शिकवत आहे. केवळ ‘माईक’ लावणे म्हणजे ‘साऊंड’ नव्हे, तर त्यासाठी आवाजाची पारख करणारे कान तयार हवेत, ‘फ्रिक्वेन्सी’ची भाषा समजायला हवी, असं शुभम आवर्जून शिकवतो.
 
मुंबई येथे शिक्षण घेताना शुभमला प्रकर्षाने जाणवले की, कुठल्याही ‘रेकॉर्डिंग’साठी नाशिकच्या कलाकारांना मुंबईतील ‘स्टुडिओ’ची वाट धरावी लागायची. उत्तम कलाकृती घडवण्याची इच्छा व गुणवत्ता असली तरी सातत्याने प्रगत तंत्रज्ञानाचा पाठपुरावा नाशिकमध्ये तितकासा केला जात नाही. याच विचारातून अद्ययावत तंत्रज्ञानाने संपूर्ण अशा ‘स्टुडिओ’ची उभारणी नाशिकमध्ये व्हावी, हे स्वप्न शुभमने पूर्ण केले. ‘ऑडिओ-व्हिडिओ प्रोडक्शन’साठी सुसज्ज असा ‘स्टुडिओ’ नाशिकमध्ये दिमाखात उभा राहिला. आज दर्जा आणि उत्तम कामाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून हा २६ वर्षांचा तरुण ‘साऊंड डिझायनिंग’ व ‘मिक्सिंग’चे नवेनवे प्रयोग नाशिकमध्येच करत असून त्यात तो यशस्वीही होत आहे. ‘बंदिश बँडिट’ या शास्त्रीय संगीतावर आधारित गाजलेल्या वेबसीरिजच्या संगीताचा काही भाग करण्याची संधी शुभमला मिळाली. ‘बॅकयार्ड’, ‘द सॉकर सिटी’सारख्या ‘फिल्मफेअर’ पुरस्कार प्राप्त प्रकल्पांसाठी शुभमने ध्वनिमिश्रण केले आहे. त्याचबरोबरीने काही लघुपटांसाठीही त्याने काम केलेले आहे. ‘स्टोरीटेल’सारख्या अ‍ॅप बरोबरीने पुस्तकांचे ‘रेकॉर्डिंग’, तर आगामी काही वेबसीरिजमध्ये पार्श्वसंगीत व मिक्सिंगदेखील तो करतो. कुठल्याही प्रकारच्या ‘रेकॉर्डिंग’साठी पुणे-मुंबईला जाण्याची आवश्यकता भासू नये, हा शुभमचा प्रयत्न.
 
आजवरच्या वाटचालीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत ध्वनिमुद्रण करण्याची संधी शुभमला मिळाली. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा सकारात्मकतेने केला, तर तो मार्ग आपल्यासाठीच नव्हे, तर पुढे येणार्‍यांसाठीदेखील वेगळेपण जपणारा ठरतो, असे त्याचे मत. आपला ‘स्टुडिओ’ तांत्रिकदृष्ट्या अजून सक्षम करणे तसेच अजय-अतुल व ए.आर रहमानसारख्या दिग्गज कलाकारांना नाशिकमध्ये आपल्या ‘स्टुडिओत रेकॉर्डिंग’साठीयावेसे वाटावे, असे स्वप्न मनाशी बाळगणार्‍या शुभमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 
@@AUTHORINFO_V1@@