मुंबई : ९४व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. यामध्ये सायफाय चित्रपट 'ड्यून'ला सर्वाधिक ११ नामांकन तर ६ पुरस्कार मिळाले. अभिनेता विल स्मिथला सर्वोत्तम अभिनेता तर जेसिका चेस्टेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर देण्यात आला. विशेष म्हणजे भारतीय माहितीपट ‘रायटिंग विथ फायर’देखील सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत होता. मात्र, पुरस्कार प्राप्त करता आले नाही. असे असले तरीही यंदाच्या ऑस्करमध्ये भारतीयांसाठी खास ठरला. त्याचे कारण म्हणजे सर्वाधिक पुरस्कार मिळवलेल्या 'ड्यून'चे भारताशी असलेल्या कनेक्शनमुळे.
'ड्यून'ला ‘सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग’, ‘सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर’, ‘सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन’, ‘सर्वोत्कृष्ट साउंड’, ‘सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट’, ‘सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी’ असे एकूण ६ पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्टचे काम बॉलीवूड चित्रपटाचे दिग्दर्शक नरेश मल्होत्रा यांच्या मुलाच्या कंपनीने केले आहे. त्यामुळे भारतीयांसाठी हा सोहळा खास ठरला.
या चित्रपटाच्या व्हीएफएक्सचे काम लंडनस्थित व्हिज्युअल इफेक्ट आणि अॅनिमेशन कंपनी 'डीएनईजी'द्वारे केले गेले. या कंपनीचे सीईओ भारतीय वंशाचे नमित मल्होत्रा आहेत. त्यांचे वडील नरेश मल्होत्रा हे हिंदू चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. या कंपनीने या चित्रपटाशिवाय द डार्क नाइट राइजेस, शेरलॉक होम्स, डंकर्क, अल्टेर्ड कार्बन, चर्नोबेल, लास्ट नाईट इन सोहो, फाउंडेशन यासारख्या चित्रपटांसाठी व्हीएफएक्स तयार केले आहेत.