नवी दिल्ली : दिल्लीच्या विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राज्यात काश्मीर फाईल्स करमुक्त करण्यावरून प्रश्न विचारला गेला. यावरून त्यांनी म्हंटले की, 'हा चित्रपट एक प्रोपोगंडा चित्रपट आहे. हा चित्रपट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर युट्युबवर टाका. तो करमुक्त करण्याची गरज नाही.' यावरून या चित्रपटाचे अभिनेते अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली. केजरीवालांची ही वक्तव्ये अनुपम खेर यांनी लज्जास्पद असल्याचे म्हंटले आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनी म्हंटले की, "तुम्हाला चित्रपट करमुक्त करायचा नाही , तर करू नका. पण, तुम्ही सर्वच चित्रपट युट्युबवर टाकायचे सल्ले देता का? गेली ३२ वर्षे ज्यांना न्याय मिळाला नाही, त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे हे मुख्यमंत्र्यांना शोभा देत नाही. भर विधानसभेत ते खिल्ली उडवत होते. त्यांच्या वक्तव्यांनी लोकांना हसवत होते. काश्मिरी पंडितांच्या दु:खावर आणि वेदनांवर हसून, नरसंहारातून गेलेल्या तुमच्या भारतीय लोकांवर हसत आहात, त्यांच्यावर हसून तुम्ही कसली संवेदनशीलता दाखवत आहात?" असा सवाल त्यांनी केला.
पुढे त्यांनी म्हंटले की, "मला वाटले होते की, पंजाबची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या स्वभावात थोडातरी नम्रपणा आला असेल. त्यांना राष्ट्रीय नेता बनण्याचा दर्जा मिळेल. पण, दुर्दैवाने ते कठोर आणि असंवेदनशील दिसले. तेथील काश्मिरी हिंदू घराबाहेर फेकले गेले, महिलांवर बलात्कार झाले, पुरुषांच्या हत्या झाल्या. विशेष म्हणजे केजरीवालांच्या वक्तव्यावेळी त्यांच्या मागे बसलेले लोक हसत होते. हे लाजीरवाणे आहे."