एक कटी पतंग हैं...

    20-Mar-2022   
Total Views | 89
 
 
 

NCP 
 
 
 
त्या पतंगवाल्या ‘एमआयएम’वाल्यांनी माझ्या बाबांना दोस्ती करण्याचे आमंत्रण दिले. समविचारी लोकांनी एकत्र यायलाच हवे. ‘घड्याळ’ आणि ‘पतंग.’ महाविकास आघाडी आणि ‘एमआयएम.’ त्यातपण आमचा पक्ष आणि ‘एमआयएम.’ काटा तुटला की, घड्याळ्याचे चालणे बंद आणि मांजा तुटला की, पतंगाचे उडणे बंद. त्यामुळे पतंग आणि घड्याळ दोन्ही सख्खे भाऊच आहेत. धनुष्यबाण आणि पतंग कधी एक होऊ शकत नाहीत, असे वाटते. पण आगे आगे वहीं होगा जो सबको मालूम हैं... अरे हम सब एक हैं। तसेही बाबा म्हणाले आहेत की, त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही. घाबरू नका. पण खरे म्हटले, तर आम्हीच घाबरलोय. ज्या हातावर घड्याळ बांधले होते, तो हातच ‘शोले’तल्या ठाकूरच्या हातासारखा अदृश्य झाला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाबमधून तो ‘हात’ छाटला गेला. ‘हात’च नाही तर ‘घड्याळ’ कुठे बांधणार? आमच्या बाबांच्या मते आणि माझ्याही मते तेच पंतप्रधान होऊ शकतात बाकी सारा खेळ माकडांचा. आहेतच ते तसे. त्यामुळेच तर मी पण तशीच आहे ना? ते पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री. किती छान दिवस असेल तो! काय म्हणता, अशा भावी पंतप्रधान आणि भावी मुख्यमंत्र्यांच्या जोड्या तयार आहेत. असू देत माहिती आहे. आमच्या घरात पण एक आहे ना, दुसरे ते राऊत दादा. त्यांना पण वाटतं की, त्यांचे साहेब पंतप्रधान होणार आणि मग ते महाराष्ट्राचे... छेऽछे... मी का असा विचार करते! मुख्यमंत्री कुणी का असेना, पण ‘पावर’ कुणाची आहे हे सगळ्यांना माहिती आहे. असो, इतके दिवस ज्यांच्याशी युती करायचो, त्यांनी यापूर्वी आमचा पाणउताराच केला होता. आता कुठे समविचारी लोक आमच्यासोबत स्वत:हून यायला तयार आहेत. त्यांचेही मतदार तेच आहेत, जे आमचे आहेत. उगाच आपापसात फोडाफोडी कशाला? काय म्हणता? उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीनंतर ‘पतंग’वाले शून्य झाले म्हणून आमच्याकडे आले? काय म्हणता, शून्यात शून्य मिसळल्यावर शून्यच राहते? काय म्हणता, ‘पतंगा’शी सोबत केल्यावरसुद्धा आम्हाला हेच गाणे म्हणायचे आहे
ना काई उमंग हैं, ना कोई तरंग हैं
मेरी जिंदगी भी क्या, एक कटी पतंग हैं!
 
 
 ढासळत्या नीतिमत्तेचे काय?
शाळेमधल्या लहान मुलींना समुपदेशक ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ शिकवत असताना एका बालिकेने तिच्यासोबत घडत असलेले दुष्कृत्य सांगितले. तिचे आजोबा, वडील, भाऊ आणि मामा या सगळ्यांनी तिच्याशी दुर्वर्तन केले, हे स्पष्ट झाले. ही घटना आहे काल-परवाची पुण्यातली. दुसरीकडे इयत्ता सातवीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने तक्रार केली की, इयत्ता पाचवीत असताना तिची आई वारली. तेव्हापासून तिचा सख्खा बाप तिचे लैंगिक शोषण करत आहे. आता तर त्या नराधमाने इयत्ता पहिलीत शिकणार्‍या तिच्या छोट्या बहिणीवरही अत्याचार करायला सुरुवात केली. ही घटना आहे मनोरची. काय चालले आहे? नीतिमत्ता, नाते या सगळ्यांना काळिमा फासणार्‍या या घटना. या क्रूर आणि संतापजनक घटनांचा आलेख वाढतच चालला आहे.
या नीच नराधमांना त्यांचे पाप, दुष्कृत्य झाकले जाईल, असे का वाटते? जे करत आहोत, ते घृणास्पद आणि मानवतेचा खून आहे, असे या राक्षसांना का वाटत नसावे? थोडक्यात, या गुन्हेगारांना जगण्या-मरण्यातल्या पाप-पुण्याची भीती वाटत नाही. आता जातपंचायत, गावकी आणि भावकीच्या माध्यमातून ती कार्यरत आहे. गुन्हेगारांना या समाजरचनेच्या दंडाचीही भीती वाटत नाही याचे कारण काय? तर समाजाने गेले दोन-तीन वर्षे काय पाहिले? तर पूजा चव्हाणचा मृत्यू, दिशा सालियनची ‘डिलिट’ केलेली फाईल, करूणा शर्माचे काय झाले, हेसुद्धा या लोकांनी पाहिले. आता रघुनाथ कुचिकच्या घटनेतसुद्धा काय होत आहे, हे जनता पाहत आहे. होऊन होऊन काय होणार? या सगळ्या घटनक्रमात जो कोणी ज्ञात-अज्ञात गुन्हेगार आहे, तो पकडला गेला का? तो तर मजेत आहे. कदाचित दुसर्‍या-तिसर्‍या सावजाच्याही शोधात असेल. त्यांचे काही झाले नाही, मग आपले काय होणार? त्यांना समाजाने स्वीकारले, तर मग आपल्यालाही स्वीकारेल, असे चुकीचे गृहितक समाजात निर्माण होत आहे. त्यामुळेच गुन्हेगार मोकाट आहेत. त्यांना कुणाचीच भीती नाही. त्याचाच परिपाक म्हणजे सध्या महाराष्ट्रात घडणार्‍या या अशा अतिशय घृणास्पद आणि संतापजनक घटना. महाराष्ट्रातल्या मुली-महिलांच्या सुरक्षेचे काय? ढासळत्या नीतिमत्तेचे काय?
 
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121