ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यातील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटना दरम्यान पाण्याची नौटंकी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच, शिवसेनेचे नाव न घेता, त्यांनी पाण्याचे वॉल बंद करून महिलांना त्रास देणाऱ्यांची हाडे मोडेन अशी धमकी दिली आहे. कळवा येथे वनविभागाच्या जागेत २० लाख लीटर पाण्याच्या टाकीचे लोकार्पण रविवारी आव्हाड यांच्याहस्ते पार पडले; त्यावेळी ते बोलत होते. मंत्री आव्हाडांच्या या वक्तव्याला शिवसेनेकडून कसे प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
"आम्हाला ज्या भागातून मतदान मिळत नाही त्या भागाचे पाणी आम्ही कापत नाही, पाण्यावर राजकारण करणे , हे माझं काम नाही. जर अशा गोष्टी माझ्याकडून झाल्या तर मी माझ्या आईवडिलांची औलाद नाही. पाणी बंद करून, शौचालयाचे दरवाजे बंद करून लोकांना त्रास द्यायचे राजकारण करू नये. लोक घाबरून तुम्हाला मतदान करतील परंतु त्यांचे पाप तुम्हाला आयुष्यभर लागेल. केवळ बॅनरबाजी करुन काम होत नाहीत, त्यासाठी काम करावे लागते. ", असा सल्ला आव्हाड यांनी नाव न घेता सत्ताधारी शिवसेनेला दिला. 'बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना' असा टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेला लगावला.