संकटमोचक

    03-Feb-2022   
Total Views |

Santosh Kadam
 
 
दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून प्रत्येक आपत्तीचे निवारण करणारे ठाणे महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम नुकतेच निवृत्त झाले, त्यांच्याविषयी...
'डिझास्टर मॅनेजमेंट...इट्स माय पॅशन’ असा स्टेटस ठेवणारे संतोष कदम त्यांच्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीनंतरही २४ तास अविरत कार्यरत आहेत. नित्य नवनवीन आव्हाने स्वीकारून सतत अद्ययावत प्रशिक्षित राहात आपल्यातील कौशल्याचा, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी उपयोग करण्याचे उद्दिष्ट त्यांनी मनी कायम बाळगले. १९८६ साली ठाणे महापालिकेत स्वच्छता निरीक्षकपदी रुजू झालेल्या कदम यांनी, आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत एक-दोन नव्हे, तब्बल ११ वर्षे विविध आपत्तींशी यशस्वी सामना केला. या कालावधीत त्यांनी अनेक माणसांसह जीव-सजीव प्राणिमात्रांचेही प्राण वाचवल्याने त्यांना ‘संकटमोचक’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील असलेल्या संतोष कदम यांचे बालपण मुंबईच्या गिरणगावातील दहा बाय दहाच्या खोलीत तसे हलाखीतच गेले. आई-वडील, दोन भाऊ आणि दोन बहिणी अशा कुटुंबात वाढलेल्या संतोष यांनी आपल्याला काही मिळो अथवा न मिळो, त्यांनी आयुष्यात नेहमीच संतोष दर्शवला. मुंबई महापालिकेच्या शाळेत बालवाडी ते सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दादरच्या महाराष्ट्र विद्यालयातून शालांत परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून १९८४ साली ‘अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थे’तून ’स्वच्छता निरीक्षक’ ही पदविका मिळवली. त्यानंतर, ठाणे महापालिकेत रुजू झाल्यानंतर सन २००९ मध्ये ते मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाले.
 
महापालिकेतील प्रवास सुरु होऊन काही वर्षे उलटताच त्यांच्या कामाची पद्धत बघून त्यांना ‘उपमुख्य स्वच्छता निरीक्षक’ पदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी देखील ते नेटाने सांभाळत होते. दि. २६ जानेवारी, २००१च्या गुजरातमधील प्रलयकारी भूकंपामध्ये मदतसाठी ठाणे महानगरपालिकेचे पथक धावून गेले. या पथकामध्ये कदम यांनीही सहभाग घेतला होता. त्यानंतर काही काळ त्यांनी परवाना विभागातही काम केले. साहाय्यक परवाना निरीक्षकपदी असताना त्यांनी फटाके विक्री मोकळ्या मैदानात करण्याची संकल्पना सर्व अडथळे पार करून प्रत्यक्षात आणली, तर परवाना शुल्काच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत भरघोस महसूल जमा करण्याचा विक्रमही केला.
 
२०१० साली शहरातील दोस्ती विहार इमारतीची भिंत कोसळण्याची दुर्घटना घडली, त्यावेळी पालिकेच्या आपत्कालीन विभागाचा उडालेला बोजवारा माध्यमांनी उघड केला. ही आपत्ती कदम यांच्यासाठी मात्र इष्टापत्ती ठरली, तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी आपत्ती विभाग सक्षमपणे सांभाळू शकणार्‍या अधिकार्‍याचा शोध सुरु केला होता. तेव्हा कदम यांची कारकिर्द पाहून त्यांच्याकडे ठाणे मनपा प्रादेशिक आपत्ती कक्षाचा कार्यभार सोपवला. दरम्यानच्या काळात २०१० सालीच त्यांनी अनिरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अकादमीमधून आपत्ती व्यवस्थापनचा मूलभूत अभ्यासक्रम देखील उत्तीर्ण केलेला असल्याने दि. १० जानेवारी, २०११ पासून आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कक्ष प्रमुख पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली.
 
 
आपत्ती निवारणासाठी अहोरात्र झटणार्‍या या संकटमोचक अधिकार्‍याने घरावर तुळशीपत्र ठेवूनच कर्तव्याला वाहून घेतले होते. २०१३ मध्ये मुंब्रा शिळफाटा येथे झालेल्या लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेत तर त्यांच्या कर्तबगारीचा अक्षरशः कस लागला. ७४ बळी आणि ७२ जण या दुर्घटनेत जखमी झाले होते. तेव्हा, सलग तीन दिवस केवळ हाताशी ४० सफाई कर्मचारी घेऊन कदम यांनी येथील बचाव मोहीम पार पाडली होती. त्यानंतर या कर्मचार्‍यांना प्रथमोपचाराचे प्राथमिक धडे देऊन प्रशिक्षित करण्यात आले. त्यानंतर याच शिलेदारांच्या सोबतीने आपत्ती व्यवस्थापन पथकाने ठाणे शहरासह नजीकच्या भिवंडी, नारपोली, डोंबिवली-ठाकुर्ली येथील इमारत दुर्घटनेच्या वेळेस धाव घेऊन इमानेइतबारे बचावकार्य पार पाडले.
 
 
कदम यांच्या कार्यकुशलतेची ठळक बाब म्हणजे, २०१८ साली आपत्ती व्यवस्थापन कक्षांतर्गत ‘टीडीआरएफ’ दलाची स्थापना करण्यात आली. नुकतेच महाडच्या तळीये गावातल्या भूस्खलन दुर्घटनेत या दलाने अतुलनीय कामगिरी बजावली. २०२०च्या अतिवृष्टीत बदलापूर-वांगणी जवळ महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या ३५० प्रवाशांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्याचे मोठ्या जिकिरीचे काम केले. याचे श्रेय अर्थातच कदम यांचेच! याशिवाय शहरात व इतरत्र दैनंदिन घडणार्‍या दुर्घटना, अपघात तसेच आगीच्या घटना असो वा जलवाहिनी फुटण्याच्या घटना, कदम सदैव तत्पर असायचे. त्यांच्या याच कार्याची पोचपावती म्हणून त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले आहेत.
 
 
आपत्ती निवारण्यासाठी अग्रणी राहात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा अधिकारी कसा असावा, याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. युवापिढीला संदेश देताना ते सांगतात, “ज्या समाजात आपण राहातो, त्याचे आपण काही तरी देणे लागतो. तेव्हा या समाजासाठी काही तरी करण्याचे आवाहन करतात. अशा या आदर्श अधिकार्‍याला निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या आरोग्यदायी शुभेच्छा!
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.