स्वामींनी मनाच्या श्लोकांतून या विषयाचा उपोद्घात केला आहे. त्यातून समर्थकालीन महंताचे, शिष्यांचे, कार्यकर्त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे सुधारले गेले असेल, याची कल्पना करता येते. समर्थांचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याने शिवरायांनाही त्यांच्याविषयी आदर होता, याला इतिहास साक्ष आहे. स्वामींनी हे सद्गुण सदाचार चारित्र आचरून दाखविले. स्वामी कधीही आत्मप्रचितीशिवाय बोलत नाही.
समर्थांनी मनाच्या श्लोकांतील पहिल्याच श्लोकात ‘राघवाच्या पंथा’चे प्रास्ताविक केले आहे, हे आपण पाहिले. पुढील सर्व श्लोकांतून स्वामींनी ‘राघवाच्या पंथा’चा विचार कायम समोर ठेवला आहे. त्यामुळे समर्थ हा भक्तिपंथ पुढे पुढे उलगडत नेतात, असे दिसून येते. ‘राघवाचा पंथ’ स्वीकारायचा, तर त्यासाठी आपले आचरण शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे, असे स्वामींचे सांगणे आहे. या पंथासाठी भक्तीने चारित्र्यसंपन्न, नीतिमान आयुष्य जगणे ही त्यासाठी महत्त्वाची अट मानली जाते. त्यानेच राघवाच्या भक्तिपंथाचा अर्थ समजून येईल, त्याची दुसरी बाजू म्हणजे भक्ताने लोभ, द्वेष, मत्सर, काम, क्रोध इत्यादी विकारांपासून दूर राहिले पाहिजे.
राघवाच्या पंथाचा पाठपुरावा करताना अर्थातच या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. त्यासाठी स्वामींनी प्रथम सदाचरणाचे महत्त्व सांगून मन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी दुष्ट विकारांना दूर ठेवले पाहिजे, असा विचार मांडला. सुरुवातीस हे स्वीकारायला मनाला वेळ लागेल. म्हणून मनाला हे सारे समजावताना समर्थ मोठ्या खुबीने मनाचा गौरव करून त्याला ‘मना सज्जना’ असे संबोधतात. तथापि मनाला सज्जन म्हटले, तरी प्रत्येकाच्या मनात थोड्या फार प्रमाणात विकार असणारच. तेव्हा त्या सज्जन मनाला विकारांची जाणीव करून द्यावी लागते आणि मनाला चिकटलेल्या विकारांपासून ‘तू जरा अंतर ठेवून राहा, दूर राहा’ असे सांगावे लागते. या स्वरूपाचा उपदेश पुढील श्लोकात पाहायला मिळतो.
मना वासना दुष्ट कामा नये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे।
मना धर्मता नीति सोडू नको हो।
मना अंतरी सार विचार राहो॥४॥
वासना या शब्दाचा अर्थ इच्छा अथवा मनाचा कल असाही आहे. सामान्य माणसाचे मन काही ना काहीतरी इच्छा करीतच असते. मनाने चांगली उपयोगी इच्छा केली आणि त्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न केले, तर त्यात स्वत:चे, कुटुंबाचे व समाजाचे भले करता येईल. परंतु, मनाने जर वाईट दुष्ट कामनामय इच्छा केली व त्याप्रमाणे ते वागू लागले, तर ते सार्यांना तापदायक अनिष्ट ठरणारे आहे. समर्थांनी मनाला सांगितले आहे की, अरे मना तुझ्या ठिकाणी दुष्ट वासना कामना असता कामा नये. आता या दुष्ट वासना येतात कुठून, याचा शोध घेतला, तर या दुष्ट वासना पापबुद्धीतून येतात, असे दिसते. यासाठी स्वामी पुढे सांगतात की, ‘पापबुद्धी नको रे.’ पापबुद्धी असणार्यांच्या मनात दुष्ट वासना उगम पावतात.
स्वामी यानंतर सांगतात की, समाजहिताचा विचार करून आपल्या पूर्वजांनी विचारवंतांनी धर्मशास्त्रात काही नियम लावून दिले आहेत. त्याकडे केवळ धार्मिकतेने न पाहता त्या मागील उद्देश ध्यानात घेऊन विवेकाने त्यांचे पालन केले, तर त्यामागील उद्देश सफल होईल. समर्थांनी वरील श्लोकात याला ‘धर्मता’ म्हटले आहे. अशी ही ‘धर्मता’ सोडू नको, असे स्वामी सांगतात. तसेच नीतीने वागणे हेही आवश्यक आहे. यासाठी धर्माबरोबर नीती सोडू नको, असेही स्वामींनी सांगितले आहे. आजकाल सभोवार पाहिले, तर या संदर्भात मोठी चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाली आहे. अमुक कृत्य कर किंवा अमुक कृत्य करू नको, असे सांगितलेले काहीजणांना आवडत नाही. अशी माणसे ‘धर्मात’ आणि ‘नीती’ यांचे नियम पाळत नाहीत, ती त्यांना बंधने वाटतात.
एकंदरीने पाहता कोणतेही बंधनकारक नियम न पाळण्याकडे या लोकांचा कल असतो. आम्हाला कसलीही बंधने मान्य नाही, हे आयुष्य आमचे आहे ते आमच्या पद्धतीने आम्हाला जगू द्या, असा विचार करण्याची व तसे बिनधास्त बोलून दाखवण्याची आजकाल ‘फॅशन’ झाली आहे. विचारस्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य वागण्या-बोलण्याचेस्वातंत्र्य या कल्पनांच्या आहारी जाऊन हे लोक केव्हा स्वैराचाराकडे वळतात. हे त्यांचे त्यांनाही समजत नाही. स्वैराचाराचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात, पण त्यातून उगम पावलेल्या अपप्रवृती त्यांना व समाजालाही त्रासदायक ठरतात.
विवेकी माणसाला स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक समजतो. सदाचरण, सद्भाव, चारित्र्य व नीतिमत्ता यांच्या चौकटीत असलेली समाजहितकारक धर्मता विवेकी माणसे स्वखुशीने स्वीकारतात. त्यांना माहीत असते की, हे नियम पाळणे ही गुलामगिरी नसून ते समाजहितासाठी स्वीकारायचे आहे. मी कुठलेही बंधन मानत नाही. मला मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगायचे आहे, असे म्हणणारी व्यक्ती मी बंधन मानत नाही, या विधानाच्या बंधनात अडकलेली असते. बंधनाबाबतचे हे अविवेकी विधान स्वखंडित आहे. जो समाज सदाचाराचे, चारित्र्याचे नीतिमत्तेचे नियम पाळतो, त्या समाजातील लोक भ्रष्टाचारापासून दूर, सुखी-समाधानी व सुरक्षित असतात.
यासाठी स्वामींनी नीती व धर्माचरण सोडू नको, असा उपदेश केला आहे. चारित्र्यसंपन्न जीवन, सदाचाराचे पालन, विद्वान बलवान असूनही निगर्वी अशी जर एखाद्या व्यक्तीची वागणूक असेल, तर ती व्यक्ती सुंदर आहे, असे म्हणता येते, असे सौंदर्य आजकाल दुर्मीळ झाले आहे. नुसता बाह्यत: ठाकठीक पोशाख करून किंवा बोलताना हातवारे करून कुणी खर्या अर्थाने सुंदर होत नाही. कदाचित या बाह्यांगाने प्रथमदर्शनी ते व्यक्तिमत्त्व चांगले असल्याचा समज होईल. पण त्या व्यक्तीच्या वागण्याबोलण्यातून अपवित्र विचार दिसू लागले किंवा अहंकार डोकावू लागला, ती व्यक्ती बढाया मारू लागली, तर अशा व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कुणालाही आकर्षित करणार नाही. सज्जन माणसे अशा व्यक्तीपासून दूर राहतील.
चांगले व्यक्तिमत्त्व म्हणजे सदाचार, सद्विचार, चारित्र्यसंपन्नता, नीतिमानता इत्यादी गुणांनी युक्त असे व्यक्तित्त्व. हे आजच्या बदलत्या दिखाऊ परिस्थितीत पुन्हा सांगण्याची वेळ आली आहे. स्वामींनी हे पूर्वीच जाणले होते. म्हणून मनाच्या श्लोकांतील श्लोक क्र. ४ ते ९ यांत त्यांनी ते तपशीलासह सांगितले आहे. आज ‘व्यक्तिमत्त्व विकास’ हा अभ्यासाचा विषय असला, तरी आंतरिक गुणांवर फार बोलले जाते. स्वामींनी मनाच्या श्लोकांतून या विषयाचा उपोद्घात केला आहे. त्यातून समर्थकालीन महंताचे, शिष्यांचे, कार्यकर्त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे सुधारले गेले असेल, याची कल्पना करता येते. समर्थांचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याने शिवरायांनाही त्यांच्याविषयी आदर होता, याला इतिहास साक्ष आहे. स्वामींनी हे सद्गुण सदाचार चारित्र आचरून दाखविले. स्वामी कधीही आत्मप्रचितीशिवाय बोलत नाही.
हे प्रचितीचे बोलिलें।
आधी केलें मग सांगितलें।
मानेल तरी पाहिजे घेतलें।
कोणी येकें॥ (दा. ११.१०.२४ )
मनाने कोणती कृत्ये सोडून द्यावी आणि कोणती आदरपूर्वक करावी, हे पुढे स्वामींनी श्लोक क्र. ५ ते ९ यातून स्पष्ट केले आहे. मनाचे श्लोक काय किंवा दासबोध ग्रंथ ही पोथ्यापुराणे नाहीत. जीवाच्या उद्धारासाठी वर्णभेदाचा शिक्का मारताना दोनदा विचार करा, हे पुन्हा पुन्हा सांगावे लागते. स्वामींना लोकांच्या स्वभाव माहीत असल्याने तेही दासबोधात म्हणतात की, ‘बोलितेचि बोलणे पडिले।’ त्यामुळे दासबोधांतही काही विचार पुन्हा पुन्हा सांगितलेले दिसतात.
- सुरेश जाखडी