मुंबई : खासदार संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर आता शिवसेनेतील विविध नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. खासदार राऊतांच्या सुटकेवर टायगर इज बॅक, अशी सूचक प्रतिक्रीया सुषमा अंधारे यांनी केली आहे. खासदार संजय राऊत हे १०२ दिवस तुरुंगात राहिले हा आमच्यासाठी मोठा आदर्शपाठ आहे, असे कौतुगोद्गारही त्यांनी काढले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.
पत्राचाळ प्रकरणात गोरगरीबांची घरे लाटल्याचा आरोप असलेल्या राऊतांच्या सुटकेवर प्रतिक्रीया देताना अंधारे म्हणाल्या की, आमचा सेनापती परत आला त्यामुळे आमच्यामध्ये हजार हत्तींचं बळ पुन्हा आलं आहे. शिवसेनेची ताकद आता प्रचंड वाढली आहे. मला आनंद आहे. संजय राऊतांसारखं गुरुतुल्य व्यक्तीमत्व पुन्हा येत आहे. मला माहिती नाही, त्यांच्या अनुपस्थितीत मी किती काम करू शकले परंतू, त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करणार.", अशी प्रतिक्रीया अंधारेंनी दिली आहे.
कर नाही त्याला डर असल्याचे कारण नाही. राऊतांनी हिम्मत दाखविली. तुम्हाला काय करायचं ते करा. मी एकवेळ मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा परंतू, मी झुकणार नाही. स्वाभिमानी कसं रहावं हा माझ्यासाठी आदर्श वस्तुपाठ आहे. हे ४० जण जे गेले त्यांच्यापुढे हे आदर्शाचं उदाहरण आहे. तुम्ही काहीही केलं नसेल तर तुम्हाला भीण्याची गरज नाही, हे आज राऊतांनी दाखवून दिलेलं आहे. तुम्ही जर घाबरून गेलात तर तुम्ही कोण आहात, हे आज सिद्ध झालं. आज खऱ्या अर्थानं आज आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. दिवाळीचा क्षण आहे, असेही राऊत म्हणाले.