शेपूट आलं हत्ती बाकी...

    06-Nov-2022   
Total Views |
bmc
 
 
 
मराठी भाषेत ’हत्ती गेला पण शेपूट राहिलं’ असा एका वाक्प्रचार आहे. म्हणजे एखाद्या कामातील मोठा पल्ला गाठून झालेला आहे. फक्त त्याचा शेवट बाकी आहे, असा त्याचा अर्थ. या वाक्प्रचाराचा पुनरुच्चार करण्याचे कारण म्हणजे, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेतील एका अधिकार्याला नुकतेच ५० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. अंधेरीतील एका अनधिकृत बांधकामाला अधिकृत करण्यासाठी हे महाशय ५० लाख रुपयांची मांडवली करत असल्याचे समोर आले आहे. या अधिकार्याला झालेल्या अटकेमुळे आता महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
तसे पाहिले तर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची चर्चा झाली नाही किंवा त्याची बातमीच छापून आली नाही, असा एकही दिवस मुंबईच्या नशिबी अनेक वर्षांमध्ये आलेला नाही. मुळातच मुंबई महानगरपालिका आणि भ्रष्टाचार या दोन नावांना वेगळं करून काहीही साध्य होणार नाही. कटाक्षाने सांगायचे, तर काही मुंबईकरांच्या नशिबी राजयोग नसला, तरी भ्रष्टाचाराचा योग मात्र त्यांच्या पाचवीलाच पुजलेला.
 
म्हणूनच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या ‘कॅग’मार्फत चौकशीचे आदेश नुकतेच राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. कोरोनाकाळात झालेला खर्च आणि एकूण १२ हजार, ५०० कोटींच्या कथित भ्रष्टाचाराची ‘कॅग’ चौकशी होणार असल्यामुळे ४० हजार कोटींचे ‘बजेट’ असलेली ही अलिबाबाची गुहा कुणी आणि किती पोखरली, याचा अंदाज किंवा ठोकताळा न बांधलेलाच बरा! महापालिकेने शहरातील रस्त्यांवर २५ वर्षांत तब्बल २१ हजार कोटींचा खर्च केला. हे स्वतः प्रशासन मान्य करतंय, पण तरीही शहरातील रस्त्यांची दुरवस्था या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची आपबिती सांगण्यासाठी पुरेशी आहे.
 
 
माजी महापौर किशोरी पेडणेकर स्वतःच एका सदनिका घोटाळ्यात खोलात जात आहेत. दुसरीकडे स्थायी समितीचा कारभार हाकलले यशवंत जाधव सातत्याने तपास यंत्रणांच्या चौकशीला आणि कारवाईला सामोरे जाताना दिसत आहेत. त्यामुळे जाधव असोत, पेडणेकर असतो या अटक झालेला हा अधिकारी, ही मंडळी प्रातिनिधिक स्वरूपात हत्तीची शेपूट असून भ्रष्टाचाराचा खरा हत्ती अजून बाहेर मोकाट आहे, हे निर्विवाद सत्य! त्यामुळे हा हत्ती लवकरात लवकर पिंजर्यात जेरबंद होणे हेच मुंबईकरांच्या भवितव्यासाठी गरजेचे आहे.
 
सत्तालाभलोभाची ही मैत्री!
एखादा प्रियकर जेव्हा आपल्या प्रेयसीसोबत लग्न करतो, तेव्हा ते संबंध समाजमान्य आणि नैतिकतेला धरून असतात. परंतु, केवळ एका विशिष्ट कुहेतूने किंवा उद्दिष्टाने नैतिकतेचे नियम पायदळी तुडवून जेव्हा संबंध प्रस्थापित होतात, तेव्हा त्याच्या स्थैर्यावर आणि आयुष्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह स्वतःहून तयार होतं, नव्हे तर ते आपणच तयार करतो. सरतेशेवटी हेतू साध्य झाल्यानंतर होणार्या कटकटी आणि त्रासाला कंटाळून हे संबंध एकतर तुटतात किंवा असूनही त्यात रस उरत नाही आणि अखेरीस तो हेतू साध्य करण्यासाठी जोडलेल्या अनैतिक संबंधांची फळं दोन्ही बाजूंना भोगावी लागतात. अशीच काहीशी घुसमट आणि भावना सध्या महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली आहे, हे नाकारून चालत नाही.
 
 
सत्तेच्या कुहेतूने एकत्र आलेली मंडळी सत्ता गेल्यापासून मात्र रोज भांडत आहेत. आपला पक्ष फुटल्यानंतर (उबाठा) शिवसेना आणि ठाकरेंनी काही काँग्रेसच्या मंडळींना आपल्यात सामावून घेतलं आणि वाद वाढत गेले. हिंगोलीची काही नेतेमंडळी शिवसेनेत सहभागी झाल्याची घटना ताजीच आहे. नुकतेच ठाकरेसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील काँग्रेसला विनाकारण डिवचून फाटक्यात पाय घालण्याचा प्रयत्न केला आणि तेच धपकन तोंडावर आपटले. तत्पूर्वी काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील ठाकरेसेना आणि काँग्रेस हे नैसर्गिक मित्र नसून भविष्यातील युतीबाबत निश्चितता नसून नेतृत्वाशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत ठाकरेसेनेच्या धाकधुकीत भर पाडली आहे.
 
 
मुळातच ही आघाडी जन्माला येताना कुठला विचार किंवा भूमिका घेऊन आली नव्हती. तत्कालीन परिस्थितीत आपले जीव वाचवण्यासाठी आणि भाजपच्या वाढत्या प्रभावासमोर आपल्या जहागिर्या टिकवण्याच्या नामुष्कीतून हे समीकरण पवारांनी जन्माला घातलं होतं. त्यामुळे वैचारिक अधिष्ठान नसलेलं आणि सत्तेच्या तडजोडीतून जन्मलेलं हे अनैतिक नातं आणि त्याचे परिणाम काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेसेनेला भोगावेच लागणार, हे निर्विवाद आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.