उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद हिंदुत्वाच्या पायावर नव्हे, तर धर्मांधांचे लांगूलचालन करण्यावरच टिकलेले आहे. उद्धव ठाकरेंची सत्ता स्वबळावर नव्हे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्यांवरच टिकलेली आहे. धर्म बदलला की, असेच होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हाती घेतलेले हिंदुत्व गुंडाळून सोनिया-पवारांचे पाय धरणार्यांना दाढ्याच कुरवाळाव्या लागतात. उद्धव ठाकरे आणि शिवसेना तेच करत आहे.
मुंबईच्या मालाडमधील मालवणी येथील क्रीडा संकुलाला म्हैसूरचा धर्मांध शासक टिपू सुलतानचे नाव देण्याच्या हालचाली पालकमंत्री असलम शेख यांच्याकडून सुरु आहेत, तर भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना व सर्वसामान्य हिंदूंचा, मुंबईकरांचा टिपू सुलतानाच्या नावाला तीव्र विरोध आहे. कारण, टिपू सुलताननामक विकृतीने धर्माच्या आधारावर हिंदूंवर केलेला अमानुष अन्याय!
त्यावरुनच आता मुंबईसह राज्यात सत्ताधारी व विरोधकांत जोरदार वादावादी सुरु आहे. पण, या गदारोळात एकेकाळी स्वतःलाहिंदुत्वाचे पाईक म्हणवून घेणार्या शिवसेनेची दैन्यावस्था झाल्याचे दिसते. “सगळ्या काफरांना मुस्लीम केल्याशिवाय शांत बसणार नाही,” अशी भर दरबारात घोषणा करणार्या टिपू सुलतानासमोर कुर्निसात करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करणारी शिवसेना आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या टिपू सुलतानाच्या नावासाठी भांडताना दिसत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर रक्तातच मोहम्मद बिन कासीमपासून अल्लाउद्दीन खिलजी, बाबर, अकबर, औरंगजेबासह टिपू सुलतानापर्यंत प्रत्येक हिंदू विरोधकांची कवने गाण्याचा विचारप्रवाह वाहतो. पण, आता त्या इस्लामी कट्टरतेला शरण जाणारा विचारप्रवाह शिवसेनेचाही झाला आहे. म्हणूनच टिपू सुलतानाच्या नामकरणावरुन आंदोलनाचा इशारा देणार्या हिंदुत्वनिष्ठांनाच धमकावण्यापर्यंतची मजल शिवसेनेने मारली. तेही साहजिकच.
कारण, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद हिंदुत्वाच्या पायावर नव्हे, तर धर्मांधांचे लांगूलचालन करण्यावरच टिकलेले आहे. उद्धव ठाकरेंची सत्ता स्वबळावर नव्हे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्यांवरच टिकलेली आहे. धर्म बदलला की, असेच होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हाती घेतलेले हिंदुत्व गुंडाळून सोनिया-पवारांचे पाय धरणार्यांना दाढ्याच कुरवाळाव्या लागतात. उद्धव ठाकरे आणि शिवसेना तेच करत आहे.
दरम्यान, क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्यावरुन उद्भवलेल्या वादात, आम्हाला इतिहास कळतो, आम्हाला इतिहास सांगण्याची गरज नाही, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. पण, संजय राऊत यांची गेल्या दोन वर्षांतली कामगिरी शिवसेनेचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य पुसण्याचीच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तासंगासाठी संजय राऊतांनी मारलेले हेलपाटे सर्वांनाच माहिती आहेत. त्यातूनच शिवसेना राहिली नाही, तर ‘जनाबसेना’ होत थेट इस्लामी कट्टरतेसमोर झुकली.
म्हणूनच ‘स्वतःचाइतिहास विसरणार्यांनी टिपू सुलतानाचा इतिहास कळतो, इतिहास सांगण्याची गरज नाही’ वगैरे म्हणणेच हास्यास्पद! वस्तुतः ‘दक्षिणेचा औरंगजेब’ म्हणून ओळखल्या जाणार्या टिपू सुलतानाचा इतिहास हिंदूंसह बिगर मुस्लिमांना बाटवण्याचा नि संपवण्याचाच राहिला. त्याचे दाखले इतिहासातील पानापानांत आणि खुद्द टिपू सुलतानाच्या पत्रांतूनही मिळतात. “मी नुकताच मलबारवर मोठा विजय मिळवला असून, चार लाखांपेक्षा अधिक हिंदूंना मुसलमान धर्मात धर्मांतरित केले,” असे टिपू सुलतान बुरदूज जमाऊन खान याला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, तर सईद अब्दुल दुलाई आणि जमान खान यांना लिहिलेल्या पत्रात टिपू सुलतान, “पैगंबर मोहम्मद आणि अल्लाहच्या कृपेने कालिकतच्या सगळ्याच हिंदूंना मुसलमान केले आहे.
केवळ कोचीन प्रांताच्या सीमावर्ती भागांतल्या काही लोकांचे धर्मांतर अजूनही करू शकलो नाही. मी लवकरच यातही यशस्वी होईन,” अशी शाश्वती देताना दिसतो. इतकेच नव्हे, तर अहमदशहा अब्दालीचा पणतू अफगाणिस्तानचा शासक जमान शाहला भारतावर हल्ला करण्याचे निमंत्रणही टिपू सुलतानाने दिले होते. जमान शाहच्या आक्रमणाने भारतात इस्लामला प्रोत्साहन मिळेल, असा टिपू सुलतानाचा होरा होता, तर ‘फ्रीडम स्ट्रगल इन केरल’ पुस्तकात, “मला संपूर्ण जगाचे राज्य मिळाले तरी मी हिंदू मंदिरांना उद्ध्वस्त करण्यापासून थांबू शकत नाही,” असे टिपू सुलतानाचे शब्द वाचायला मिळतात.
अर्थात, टिपू सुलतानच्या इस्लामी कट्टरतेची, हिंदूंवरील सर्वप्रकारच्या हल्ल्याची आणि धर्मशत्रू म्हणजेच हिंदूंविरोधात छेडलेल्या धर्मयुद्धाची साक्ष देणारे चार-दोन नव्हे, तर शेकडो दस्तऐवज उपलब्ध आहेत. संजय राऊतांना वा शिवसेनेच्या कर्त्याधर्त्यांना टिपू सुलतानाचा हिंदूंबाबतचा असहिष्णू इतिहास माहिती नाही, असे नाही. त्यांना सारे काही ठावूक आहे, पण मुद्दा मुख्यमंत्रिपदाचा असून शिवसेनेसाठी मुख्यमंत्रिपदासमोर हिंदू, हिंदुत्व, राष्ट्रनिष्ठा शून्यवत आहे. म्हणूनच टिपू सुलतानाच्या नावाला शिवसेना विरोध करताना दिसत नाही.
शिवसेनेने टिपू सुलतानासमोर झुकण्यामागे दुरावलेला हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ मतदार आणि मोहवणारी एकगठ्ठा मुस्लीम मतपेढी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावल्याने पारंपरिक मतदार आपल्याला मतदान करणार नाही, अशी खात्री शिवसेनेला झाली आहे. त्या गमावणार्या मतांची बेगमी करण्यासाठी शिवसेना आता हिरव्या रंगात न्हाऊन निघत असल्याचे दिसून येते. अजान स्पर्धेपासून भायखळ्यातील प्रस्तावित उर्दू भाषा शिक्षण केंद्रापर्यंत मुस्लिमांचे सर्वप्रकारचे लाड करण्यासाठी शिवसेना हिरीरीने पुढाकार घेताना दिसते, ती यामुळेच. शिवसेनेला आता हिंदू आणि हिंदुत्वाची, राष्ट्रनिष्ठेची चिंता सतावत नाही.
त्यांचे हिंदुत्व आता फक्त फेसबुक लाईव्हमध्ये उसने आवसान आणून म्याव म्याव करण्यापुरते उरले आहे. त्यात वाघाच्या डरकाळीचा जोश नाही. शिवसेनेची केविलवाणी अवस्था त्यांचे सहकारी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच समजते. त्यातूनच त्यांच्याकडूनही क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्यासारखा प्रस्ताव ठेवला जातो नि शिवसेना सत्तेच्या तुकड्याकडे बघून फक्त शेपटी हलवण्याचे काम करते. ही शिवसेनेची दुर्गती आहे, नि त्याला कारणीभूत धर्म बदलण्याचा निर्णय आहे. हे एवढ्यावरच थांबणार नाही, तर धर्म बदलला की, काय काय होते, याची झलक भविष्यातही पाहायला मिळणार आहे. आज काँग्रेस नेते असलम शेख टिपू सुलतानाच्या नावासाठी आग्रही आहेत, तर नवाब मलिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्याला पाठिंबा आहे.
यापुढे या लोकांकडून मुंबई-महाराष्ट्रात मोहम्मद बिन कासिम, अल्लाउद्दीन खिलजी, बाबर, अकबर, औरंगजेबाच्या नावानेही वास्तू उभारल्या जातील, पुरस्कार दिले जातील नि सत्तेला हपापलेली शिवसेना औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा मुद्दा विसरुन या प्रकारालाही संमती देत जाईल. पण, कुठपर्यंत? तर जोपर्यंत सत्तेत आहे, तोपर्यंत. नंतर मात्र, टिपू सुलतान वा धर्मांध इस्लामी शासकांचा इतिहास विसरुन मतांसाठी, सत्तेसाठी इस्लामी कट्टरतेच्या पायाशी लोळण घेणारी, हिंदूंच्या भावना पायदळी तुडवणारी शिवसेनाही इतिहासजमा झाल्यावाचून राहाणार नाही. त्यासाठी हिंदूंनीही शिवसेनेकडून टिपू सुलतानासाठी वादावादी करण्याचा उद्योग मुस्लिमांच्या मतांसाठी सुरु असल्याचे समजून घेतले पाहिजे. इतकेच नव्हे, तर या सगळ्यात हिंदूंच्या भावनाचा विचार का केला जात नाही, हा प्रश्नही उपस्थित केला पाहिजे.