पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांचा प्रपोगंडा अपयशी, देशात ऑगस्टअखेर ६५ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2021   
Total Views |
modi_1  H x W:

एका दिवसात १ कोटी ३० लाख ८४ हजार ३४४ नागरिकांना लस
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : देशात ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ६५ कोटी ४७ लाख ६३ हजार ७७२ नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले असून मंगळवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी एका दिवसात एक कोटींहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामुळे ऑगस्टपर्यंत ६० कोटी नागरिकांना लस देण्याच्या भारताच्या मोहिमेविरोधातील पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांचा प्रपोगंडा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे.
 
 
एका नामांकित अमेरिकी प्रसारमाध्यमाने १९ डिसेंबर, २०२० रोजी एका लेख प्रकाशित केला होता. त्यामध्ये मोदी सरकारने देशातील ६० कोटी नागरिकांचे लसीकरण ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य अतिमहत्त्वाकांक्षी असल्याचे म्हटले होते. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आरोग्य व्यवस्था भक्कम नाही, ग्रामीण भागापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कोरोना संसर्गाच्या दबावामध्ये काम करणार्या यंत्रणेस हे ध्येय साध्य करणे अशक्य असल्याचे म्हटले होते.
युनायटेड किंग्डममधील एका वैद्यकीय विषयांवरील जर्नलनेही भारताची लसीकरण मोहीम चुकीच्या पद्धतीने आखली आहे. त्यामुळे ती अपयशी ठरली असून, त्यामुळे दुसर्या लाटेमध्ये भारतात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे जाहीर केले होते.
 
 
जागतिक दर्जाच्या आणखी एका प्रसिद्ध माध्यमातील लेखामध्येही लसीकरण मोहीम अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा दावा केला होता. लेखामध्ये भारताने लसींची मागणी नोंदविण्यास विलंब केला, ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’स अधिक महत्त्व दिल्यामुळे देशात लसीकरणामध्ये अडथळा निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला. त्याचप्रमाणे लसीकरणासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोवीन’ या व्यवस्थेमुळेही लसीकरणासाठी नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा लेखात करण्यात आला होता.
अमेरिकी प्रसारमाध्यमाने ५ मे रोजी भारत जगातील सर्वात मोठा लसउत्पादक असतानाही लसतुटवड्याचा सामना करीत असल्याचे सांगणारा एक लेख प्रकाशित केला होता. त्यामध्ये देशातील लसतुटवड्यामुळे लसीकरण मोहीम अपयशी होईल, असे सांगण्यात आले होते.
 
 
देशातील ६० कोटी नागरिकांना ऑगस्टपर्यंत कोरोनाविरोधी लस देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यानंतर भारताच्या या लक्ष्याची खिल्ली उडविण्याचे काम अमेरिकेसह पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांनी केले होते. भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतरच परदेशी प्रसारमाध्यमांनी भारतविरोधी वार्तांकनास प्रारंभ केला होता. भारतात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, त्यामुळे लसीकरण मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाल्याचे दावेही करण्यात आले होते. अर्थात, यामध्ये परदेशी प्रसारमाध्यमांना काही भारतीय माध्यमसमूहांचीदेखील मोठी मदत झाली होती.
 
 
 
ऑगस्टपर्यंत ६० नव्हे, ६५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण ! 
 
केंद्र सरकारने ऑगस्टपर्यंत देशातील ६० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, आता ऑगस्टपर्यंत त्याहूनही जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी एका दिवसात १ कोटी ३० लाख ८४ हजार ३४४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यामुळे भारताने ऑगस्टअखेर एकूण ६५ कोटी ४७ लाख ६३ हजार ७७२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. हा आकडा देशातील अनेक पुढारलेल्या देशांच्या एकूण लोकसंख्येच्याही दुप्पट ते तिप्पट आहे.
@@AUTHORINFO_V1@@