डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्याच्या विकास निधीवरून शिवसेना आणि मनसे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद पेटला असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली पूव्रेतील मानपाडा रस्त्याच्या मंजूर निधीवरून हा वाद पेटला आहे. एकीकडे या रस्त्यांच्या विकासकामाचे श्रेय मनसे घेत आहे तर दुसरीकडे शिवसेना या कामाचे श्रेय घेत एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने त्यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलेला दिसून येत आहे.
कल्याण शीळ रस्त्याच्या पाहणीदरम्यान आमदार राजू पाटील यांनी आपण मंजूर केलेल्या रस्त्याचे श्रेय घेत असल्याचा आरोप नाव न घेता शिवसेनेवर केला होता. त्यावर शिवसेनेने आज पत्रकार परिषद घेत मानपाडा रस्त्याच्या मंजूर निधीवरून शिवसेनेने मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्यावर सडकून टिका केली आहे. तसेच राजू पाटील यांनी केलेले एक तरी विकासकाम दाखवावे अशी असे आवाहान ही केले आहे. यावेळी राजेश मोरे,दिपेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, रमेश म्हात्रे,सदानंद थरवळ, राजेश कदम उपस्थित होते.
शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्ते विकासासाठी 360 कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला आहे, त्यापैकी 111 कोटी निधी हा कल्याण ग्रामीणमधील रस्त्यांसाठी मंजूर झालेला आहे. त्याआधी डोंबिवली एमआयडीसी साठी 110 कोटी, डोंबिवली शहरासाठी 5 कोटी तर पीडब्ल्यूडीकडून मानपाडा रोडसाठी 27 कोटी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून आणला आहे. आता जरी या रस्त्याची परिस्थिती बिकट असली तरी संपूर्ण वर्षभरात त्यांचा कायापालट होणार आहे. विकासकामे तडीस नेण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागते. संबंधित शासकीय विभागांक डे पाठपुरावा करावा लागतो. केवळ एक पत्र देऊन कामे होत नसल्याचा टोला ही म्हात्रे यांनी दिला आहे.
रमेश म्हात्रे यांनी सांगितले, कल्याण डोंबिवलीतील रस्त्यासाठी विकासनिधी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजुर करून आणला आहे. या प्रकरणी मनसे आमदारांनी सोशल मिडीयावर पत्र फिरवले. त्यात मानपाडा रस्त्याच्या मंजूरी पत्रावर खासदारांचे नाव खोडून स्वत:च्याच नावाचा उल्लेख असलेले पत्र फिरवले आहे. मनसे आमदारांना शिवसेना आता केवळ इशारा देत आहे. पुढे असा प्रकार घडल्यास पोलिस ठाण्यात तक्रार करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघ शापित असल्याची चर्चा लोक करतात. या मतदारसंघाला निष्क्रिय आमदार लाभल्याची टीका केली आहे.
------------------------------
--------------------------------