जपानमधील टोकियो येथे सुरू असलेल्या ‘पॅरालिम्पिक’ स्पर्धेत भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत. दोन दिवसांत भारताने जवळपास सात पदकांची कमाई केली आहे. यामध्ये दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य, अशी सात पदकं देशाला मिळवून देत भारतीय खेळाडूंनी जगभरात देशाची मान उंचावण्यात यश मिळवले आहे. ५ सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार असून, भारताला मिळणार्या पदकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताला या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकं मिळण्याचा हा विक्रम ठरणार आहे. भारताला याआधी २०१६ साली झालेल्या ‘रिओ पॅरालिम्पिक’ स्पर्धेत चार पदकं मिळाली होती. मात्र, यंदा या स्पर्धेत जवळपास दुपटीने पदकं मिळाली असून, देशातील क्रीडाप्रेमींमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.
या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना एकामोगामाग एक पदकं मिळत असल्याने जल्लोषाचे वातावरण असतानाच थाळीफेकपटू विनोद कुमार यांचे कांस्य पदक रद्द झाल्याचे वृत्त समोर आल्याने भारतातील क्रीडाप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले. विनोद कुमार यांनी १९.९१ मीटर लांब थाळी फेकत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मात्र, स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर काही देशांनी विनोद कुमार यांच्या पात्रतेला विरोध केला आणि आक्षेप नोंदवला. विनोद कुमार हे ‘एफ ५२’ गटाच्या विभागासाठी असलेल्या पात्रतेच्या नियमांमध्ये बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. यावर आयोजन समितीने विनोद कुमार यांचे पदक राखून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तपासामध्ये विनोद कुमार या कॅटिगरीसाठी पात्र ठरत नसल्याचा निकष ठरवत आयोजन समितीने त्यांचे पदक काढून घेण्याचा निर्णय घेतला. आयोजन समितीच्या या निर्णयाबाबत जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याचे कारणही तसेच आहे. याच स्पर्धेच्या आयोजकांनी २२ ऑगस्ट रोजी विनोद कुमार यांना या स्पर्धेत खेळण्यास पात्र ठरविले होते. मात्र, पदक जिंकताच ते अपात्र कसे काय ठरू शकतात? असा सवाल भारतातील क्रीडाप्रेमींकडून विचारला जात आहे. संपूर्ण स्पर्धा संपून निकाल आल्यानंतरही पात्रतेचे निकष ठरविण्याची वेळ जर आयोजन समितीवर येत असेल, तर हे उशिरा सुचणारे वेडेपण नाही का, असा प्रश्न क्रीडाप्रेमींमधून विचारण्यात येत आहे.
गरज येथेही लक्ष देण्याची
कोणत्याही स्पर्धेच्या पात्रतेचे नियम हे स्पर्धेआधीच ठरविले जाणे गरजेचे आहे. स्पर्धेदरम्यान किंवा स्पर्धेपश्चात हे नियम ठरवणे अयोग्य आहे, असे मत आता क्रीडा समीक्षकांकडूनही व्यक्त केले जात आहे. भारताचे थाळीफेकपटू विनोद कुमार यांचे पदक पुन्हा काढून घेण्यात आल्यानंतर स्पर्धेच्या पात्रतेचे निकष ठरविण्याचा मुद्दा हा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात आहे. याबाबत विविध स्तरावरून मतमतांतरे व्यक्त करण्यात येत आहे. पात्रतेच्या निकषात बसत असल्यानेच विनोद कुमार यांना जर खेळण्याची संधी मिळाली, तर मग ते स्पर्धेनंतर अपात्र कसे काय ठरवले जाऊ शकतात? कोणत्याही स्पर्धेची थेट अंतिम फेरी होत नाही. स्पर्धेतील काही टप्प्यानंतरच अंतिम निकाल ठरवण्यात येतो. ही स्पर्धा सुरू असताना विनोद कुमार यांच्याविरोधात कुणीही आक्षेप नोंदवला नाही. मात्र, ते पदक जिंकल्यानंतर काही देशांनी याविरोधात आक्षेप नोंदवला आणि आयोजन समितीने त्याची दखल घेत त्यांचे पदक पुन्हा परत घेतले. स्पर्धेच्या सुरुवातीच्या क्षणीच हा आक्षेप का नोंदवण्यात आला नव्हता?, असाही प्रश्न क्रीडा समीक्षकांकडून चर्चिला जात आहे. उदाहरण घ्यायचेच झाल्यास क्रिकेटच्या खेळामध्येही सामन्याआधी प्रत्येक खेळाडूला स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी ‘यो-यो टेस्ट’ द्यावी लागते. स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतरच खेळाडूंना प्रत्यक्ष सामन्यामध्ये खेळण्याची संधी दिली जाते. विनोद कुमार हे पात्र असल्याचा हिरवा कंदील मिळाल्यानंतरच त्यांना खेळण्याची संधी देण्यात आली होती. परंतु ते जिंकल्यानंतर काही देशांच्या खेळाडूंनी याविरोधात आक्षेप नोंदवला आणि मग त्यांचे पदक काढून घेण्यात आले. विनोद कुमार हे पात्रतेच्या निकषात बसत नव्हते, तर त्यांना खेळू का दिले? आणि एखाद्या खेळाडूने पदक जिंकल्यानंतरच इतर देशांचे खेळाडू याबाबत आक्षेप नोंदवतात, याचा विचार आता आयोजकांनी करण्याची वेळ आली आहे. आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला पदक मिळाल्याचे यश अनेकांना पाहवत नाही. प्रत्येक जण खिलाडूवृत्तीने हे यश पचवतोच असे नाही. प्रतिस्पर्ध्याचे यश हे अनेकांना पचत नाही. या बाबीकडेही आयोजक समितीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे क्रीडा समीक्षकांचे म्हणणे आहे.