मुंबई : ‘संघमंत्राची अभिव्यक्ती’ या व्याख्यानमालेतील समारोपाचे आणि चौथे पुष्प अखिल भारतीय सहसंयोजक महिला समन्वयाच्या चंदाताई (भाग्यश्री) साठ्ये यांनी गुंफले. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोडीने राष्ट्र सेविका समितीचे काम सुरु आहे. संघस्थापनेपासून संघकार्यात महिलांचे योगदान दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही स्वरुपात चालू आहे. संघरुपी जनसागरात महिलांचे कार्य अनन्यसाधारण आहे. शिवशक्तीप्रमाणे संघकार्यात महिला आणि पुरुषांचे काम सुरु आहे. परस्परपूरक, परस्परावलंबी, परस्पर सहयोगी अशी धारणा ठेवूनच संघकाम आज अविरत चालू आहे.
समितीमध्ये मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गुणांना धरून महिलांचे कार्य चालू असते. राष्ट्र सेविका समितीच्या आद्य संस्थापिका वंदनीय लक्ष्मीबाई केळकरांची मुले संघशाखेत जात असत. त्यांच्यावर झालेले संघसंस्कार पाहून त्या प्रभावी झाल्या. एकूणच समाजाची स्थिती आणि महिलांची परिस्थिती पाहता महिला आणि युवतींनाही देशभक्तीपर संस्कार मिळाले पाहिजेत. त्यादृष्टीने डॉ. हेडगेवारांशी त्यांच्या भेटी आणि चर्चा सुरु झाल्या.
चर्चाअंती समितीच्या कार्यक्रमाची आखणी करताना संघाचे अनुकरण न करता महिलांचे स्वतंत्र संघटन उभारावे. कार्यक्रमांची आखणी करताना महिलांच्या स्वभावानुसार आणि गुणवैशिष्ट्यांनुसार त्यांची आखणी करावी. सुरुवातीपासूनच डॉ. हेडगेवारांचा समितीला संपूर्ण पाठिंबा होता. समितीच्या स्थापनेविषयीचे प्रेरणा चंदाताई यांनी नमूद केली.
“१९४८ आणि १९७५ साली संघबंदीत हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगवास झाला. तेव्हा ठिकठिकाणी सत्याग्रह करणे, सश्रम कारावास भोगणे, पत्रके वाटणे, स्वयंसेवकांच्या सुरक्षेसंबंधी काळजी घेणे इत्यादी कामे केली. आणीबाणी उठल्यानंतर मोठ्या प्रमाणात सेवाकार्ये सुरू झाली. या सेवाकार्यांत ५० टक्के महिलांचा सहभाग आहे. कर्नाटकमध्ये ‘हिंदू सेवा प्रतिष्ठान’तर्फे आतपर्यंत ५०० सेवाव्रती होऊन गेल्या.
महाराष्ट्रातील जनकल्याण समितीद्वारे तीन हजार सक्रिय कार्यकर्त्या आहेत. ‘सामाजिक चातुर्मास’ या एका उपक्रमात प्रत्येकी एक-एक रुपया अथवा ऐच्छिक निधी जमा करून तो एखाद्या सेवाकार्यास अर्पण करतात. ‘कोविड’ काळातही कार्यरत असणार्या ८० हजार महिला कार्यकर्त्या सक्रिय आणि ‘कोविड योद्धा’ म्हणून कार्यरत आहेत. सोशल मीडियातून प्रसिद्धीस आलेली वैष्णवी राठी या कार्यकर्तीचे सेवाकार्ये आपणा सर्वांना माहीतच आहे.
राष्ट्रजागरण अभियान, कारसेवा, शिलापूजन, विश्व मंगल गोग्राम यात्रा, एकात्म यात्रा यातील महिलांचे भरीव योगदान आहे. वनवासी भागातील काम, अमरनाथ आंदोलनातील महिलांचे काम, प्रचार विभागातील कार्य, राम मंदिर निधी सर्पणातील महिलांचे कार्य हे अतिशय भरीव आहे. संघातील सहा गतिविधीतूनही महिला सक्रिय कार्यरत आहेत. समाज उत्सावातदेखील आपल्या कुटुंबाप्रमाणे त्या कार्यरत असतात,” याचे अतिशय बारकाईने चंदाताई साठ्ये यांनी विवेचन केले.
मनामनातील दुवा साधण्याचे काम महिला कार्यकर्त्यांकडून होत आहेे. संघ स्थापनेपासून सुरु झालेले अदृश्य स्वरुपातील काम, समितीमार्फत दृश्य स्वरुपात साकारलेले काम, आता स्वयंसेवकांच्या जोडीने समितीतील सेविका कार्यरत आहेत. शिवशक्तीचा दृश्य अविष्कार या माध्यमातून होत आहे. समाजाकडे पुत्रवत बघण्याची दृष्टी वंदनीय लक्ष्मीबाई केळकर (मावशी) यांनी दिली. त्याचाच प्रत्यय येत असून प्रत्येक महिलांतील सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा, यांचे दर्शन होत आहे, असे प्रतिपादन व्याख्यानमालेत चंदाताई (भाग्यश्री) साठ्ये यांनी केले. ‘संघमंत्राची अभिव्यक्ती’ या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन सा. ‘विवेक’चे मुख्य उपसंपादक निमेश वहाळकर यांनी केले. व्याख्यानमालेदरम्यान पुणे येथील प्रसन्न खरे यांनी संघगीत सादर केले.