‘ड्रोन’ची कबुली की, युद्धाची धमकी?

    28-Jun-2021
Total Views | 145

drone_1  H x W:
 
 
 
जगातील सहा शक्तिशाली देश व जो बायडन यांच्या पक्षातील सदस्य इराणवरील निर्बंध हटवण्यासाठीही विचारविमर्श करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्याकडे सात हजार किमीपर्यंत उड्डाण करू शकणारे ‘ड्रोन’ असल्याचे म्हटले, त्याकडे इशारा, धमकी म्हणूनच पाहावे लागते.
 
 
दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरची हिवाळी राजधानी जम्मूतील हवाईदलाच्या तळावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून ‘ड्रोन’द्वारे हल्ला करण्यात आला. त्यात भारताचे दोन सैनिक किरकोळ जखमी झाले. पण, यामुळे पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांना ‘ड्रोन’च्या रूपात नवे हत्यार गवसल्याचे दिसून आले. दरम्यान, आगामी काळात दोन किंवा अनेक देशांच्या युद्धात ‘ड्रोन’ सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे चालू घडामोडींवरून दिसते. त्याचा दाखला यंदाच्या अझरबैजान विरुद्ध आर्मेनियाच्या युद्धात अवघ्या जगाला पाहायलाही मिळाला. अझरबैजानने तुर्की व इस्रायलने दिलेल्या ‘ड्रोन’चा वापर करून आर्मेनियाला शरण यायला लावले व युद्ध जवळपास जिंकलेच. आता मात्र मध्य-पूर्वेतील तेलसंपन्न इस्लामी प्रजासत्ताक राष्ट्र-इराणने ‘ड्रोन’संदर्भात महत्त्वाचे विधान केले असून, त्यामुळे प्रादेशिक स्थैर्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच इराणच्या कबुलीमुळे अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांची चिंता वाढल्याचे म्हटले जाते. इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड’चे शीर्ष कमांडर हुसैन सलामी यांनी नुकताच, आपल्याकडे सात हजार किमीपर्यंत उड्डाण करू शकणारे ‘ड्रोन’ असल्याचा दावा केला. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमाने ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड’च्या शीर्ष कमांडरच्या हवाल्याने या घटनाक्रमाकडे अमेरिका स्वतःसाठीचा धोका म्हणून पाहत असल्याचे म्हटले आहे. कारण, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी. सी. तसेच इतरही अनेक शहरे इराणच्या सात हजार किमीपर्यंत उड्डाण करू शकणार्‍या ‘ड्रोन’च्या टप्प्यात येतात. सुरुवातीला उल्लेख केलेला जम्मूतील ‘ड्रोन’ हल्ला आणि अझरबैजानने युद्धात वापरलेल्या ‘ड्रोन’मुळे अनेक बाबी स्पष्ट होतात. ‘ड्रोन’चा आकार अगदी माशीपासून ते सामान्य विमानाइतकाही असू शकतो. कमी उंचीवरून उड्डाण करण्याच्या वैशिष्ट्यामुळे बर्‍याचदा रडार यंत्रणेला चकमा देऊनही ‘ड्रोन’ लक्ष्यभेद करू शकतात. आर्मेनियाकडे रशियाची ‘एस-300’ क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा असूनही अझरबैजानने ‘ड्रोन’ हल्ल्याने त्या देशाला जेरीस आणले होते, हे इथे लक्षात घेण्याजोगे. ‘ड्रोन’ तयार करण्यासाठी वा त्याचे संचालन करण्यासाठी किचकट, क्लिष्ट कृतीची वा फारशा विशेष कौशल्याची आवश्यकताही नसते. परिणामी, ‘ड्रोन’ शत्रूविरोधातील घातक शस्त्राची भूमिका बजावण्यात वरचढ ठरते आणि आताच्या इराणच्या आपल्याकडील सात हजार किमीपर्यंतच्या ‘ड्रोन’च्या कबुलीमुळे परिस्थिती चिंताजनक झाल्याचे दिसते.
 
दरम्यान, हुसैन सलामी यांच्या विधानाची वेळ महत्त्वाची आहे. नुकतीच इराणमध्ये कट्टर इस्लामी इब्राहीम रईसी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची भेट घेण्याचा आपला उद्देश नसल्याचे सांगत ‘बॅलेस्टिक मिसाईल’ विकसित करण्याच्या आपल्या कार्यक्रमाबाबत कसलीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट केले होते, तर तत्पूर्वी अमेरिकेने इराणबाबत नरमाईचे धोरण अवलंबल्याचे दिसून येत होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१५ सालचा इराणबरोबरील ‘अणू करार’ एकतर्फी असल्याचे म्हणत मोडला होता व इराणवर आणखी कठोर निर्बंध लादले होते. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पद कायम राखू शकले नाहीत व त्यांच्या जागी जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी आले. तेव्हापासूनच इराण-अमेरिका ‘अणू करारा’च्या पुनरुज्जीवनाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातूनच जगातील सहा शक्तिशाली देश व जो बायडन यांच्या पक्षातील सदस्य इराणवरील निर्बंध हटवण्यासाठीही विचारविमर्श करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्याकडे सात हजार किमीपर्यंत उड्डाण करू शकणारे ‘ड्रोन’ असल्याचे म्हटले, त्याकडे इशारा, धमकी म्हणूनच पाहावे लागते. तसेच, इराणबरोबरील अणू करार पुनरुज्जीवित करण्याची व निर्बंध हटवण्याची चर्चा होत असताना इराणचा या विधानाच्या माध्यमातून आपली सौदा शक्ती किंवा ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवण्याचाही हेतू असू शकतो. इराणची अणुबॉम्ब विकसित करण्याची प्रबळ इच्छा असून, त्यासाठी तो देश कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी सध्याची स्थिती आहे. अमेरिकेने अणू करार मोडल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लावल्यानंतर, त्यामुळे खनिज तेलाची विक्री रोडावल्यानंतर व उत्पन्नात घट झाल्यानंतरही इराणची आपला ‘अणुबॉम्ब’ विकसनाचा कार्यक्रम थांबवण्याची तयारी नाही, तर अमेरिका व पाश्चात्त्य शक्तींची इराणने अणुबॉम्ब विकसित करू नये, अशी मनीषा आहे. तेव्हा या देशांनी आपल्याला अण्वस्त्रसंपन्न होण्यात आडकाठी आणू नये व लादलेले निर्बंधदेखील हटवावे, या फायद्यासाठी इराणने आपल्याकडे लांबपल्ल्याचे ‘ड्रोन’ असल्याचे म्हटले असावे. जेणेकरून अमेरिका व इतरांवरील दबाव वाढेल आणि ते इराणशी जुळवून घेतील.
 
दरम्यान, हुसैन सलामी यांच्या ‘ड्रोन’विषयक दाव्यानंतर पाश्चिमात्य विशेषज्ज्ञांनी इराण अनेकदा आपल्याकडील क्षमता फुगवून सांगतो, असे म्हटले. मात्र, तसे जरी असले तरी या विधानातून त्या देशाकडे आता नसेल. पण, भविष्यात सात हजार किंवा त्यापेक्षा अधिक किमीपर्यंत उड्डाण करू शकणारे ‘ड्रोन’ विकसित करण्याइतकी क्षमता असल्याचे दिसून येते. म्हणजे, ‘आज आमचे म्हणणे मान्य करा; अन्यथा आम्ही मानवी सैन्यशक्तीपेक्षाही घातक ‘ड्रोन’चा विकास करून युद्धाला तयार आहोत,’ असे इराणला सांगायचे आहे. जगातील अमेरिका, रशिया, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, चीन आणि भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया व इस्रायलप्रमाणे इराणही अणुबॉम्ब विकसित करेल आणि त्याला जगाने मान्यता दिली पाहिजे, असे इराणचे म्हणणे आहे. त्याला अर्थातच, इस्लामी वर्चस्ववादाचाही कोन आहेच. सुन्नी सौदी अरेबियाला शह देण्यासाठी शिया इराणला अण्वस्त्रसंपन्न व्हायचे आहे, तसेच आपल्या विरोधकांना दबावाखाली ठेवायचे आहे. मात्र, यामुळे मध्य पूर्वेतील प्रादेशिक स्थैर्यात नक्कीच अडथळे निर्माण होतील व त्याचा परिणाम खनिज तेलाच्या उत्पादनासह किमतीवर होईल. त्या पार्श्वभूमीवर आता इराणची आपल्या पदरात अधिकाधिक लाभदायी बाबी मिळवण्यासाठी दिलेली धमकी फळते की, त्याचा प्रवास युद्धासारख्या विनाशकारी घटनेपर्यंत होतो, हे येत्या काळात समजेलच.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121