जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार असून, या ठिकाणी अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. भारतीय संघाचा मुख्य कर्णधार विराट कोहली, अनुभवी रोहित शर्मा, जसप्रित बुमराह यांसारखे अनेक महत्त्वाचे खेळाडू आगामी इंग्लंड दौर्याच्या तयारीसाठी परदेशातच वास्तव्य करणार आहेत. त्यामुळे श्रीलंका दौर्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सलामीवीर धडाकेबाज फलंदाज शिखर धवनजवळ देण्यात आली असून, प्रशिक्षकपदी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी श्रीलंका दौर्यादरम्यान भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्याच्या ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’च्या (बीसीसीआय) या निर्णयाने अनेक क्रिकेट समीक्षकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. राहुल द्रविड यांची श्रीलंका दौर्यादरम्यान मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती म्हणजे, सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासाठी धोक्याची घंटा तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित करण्यात येत आहे. कारण, भारतीय संघामध्ये सध्या मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासोबतच फलंदाजी-गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी स्वतंत्र विशेष प्रशिक्षक आहेत. या तिन्ही प्रकारासाठी आतापर्यंत अनेक माजी खेळाडूंची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशिक्षकांची काही भारताकडे कमी नाही. श्रीलंकेच्या केवळ एका दौर्यासाठी भारताला सध्याच्या संघात असलेल्या कोण्या एका प्रशिक्षकाला संधी देता आली असती. मात्र, ‘बीसीसीआय’ने राहुल द्रविड यांची नियुक्ती करत रवि शास्त्री यांना एक प्रकारे इशाराच दिल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. द्रविड यांच्यासारख्या सक्षम आणि प्रतिभावंत व्यक्तीला एका दौर्यासाठी संधी देत ‘बीसीसीआय’ आगामी काळासाठी चाचपणी करत असल्याच्या मुद्द्याकडेही समीक्षकांनी लक्ष वेधले आहे. हा तर केवळ एक प्रयोग असून आगामी काळात भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी द्रविड यांच्यासारखे उत्तम आणि अनुभवी व्यक्तींची नेमणूक झाल्यास त्याचा संघाला फायदाच होणार आहे. त्यामुळे भविष्यात जर असा बदल झाला, तर नवल वाटायला नको, असा मतप्रवाहही क्रिकेट समीक्षकांमध्ये आहे.
अति घाई नको
राहुल द्रविड यांचा क्रिकेटविश्वातील अनुभव फार दांडगा आहे. केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे, तर प्रशिक्षकपदाची त्यांची कामगिरीही उत्तम राहिली आहे. भारतीय पुरुषांच्या ‘अंडर-१९’ संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा राहुल द्रविड यांनी उत्तमरीत्या हाताळली आहे. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्या भारतीय पुरुषांच्या ‘अंडर-१९’ संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरण्यातही यश मिळवले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खेळणार्या भारतीय पुरुषांच्या ‘अंडर-१९’ संघाने दुसर्या वर्षी उपविजेतेपद पटकाविले. द्रविड यांची यानंतर भारतीय (अ) पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदीही नियुक्ती करण्यात आली. येथेही द्रविड यांच्या यशस्वी कामगिरीचा धडाका सुरूच राहिला. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घडले. या नवख्या खेळाडूंनी तर देशांतर्गत झालेल्या सामन्यांमध्ये कमालच घडवली. ‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) सामन्यांमध्ये या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. भारतीय ‘अ’ संघाच्या खेळाडूंच्या प्रदर्शनामुळे द्रविड यांचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यामुळे द्रविड यांच्यासारख्या व्यक्तींची भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड होणे ही नक्कीच चांगली बाब आहे, असे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. द्रविड यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना काही क्रिकेट समीक्षकांनी विद्यमान प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्याही कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे. रवि शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा भारताचा संघ सध्या जागतिक कसोटी क्रिकेटच्या अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीचा सामना खेळत आहे. रवि शास्त्री यांचीही प्रशिक्षकपदी कामगिरी उत्तम राहिली आहे. एकदिवसीय आणि ‘टी-२०’मध्येही भारतीय संघाने शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी केली आहे. म्हणून इतक्यातच संघाचे प्रशिक्षक बदलणे हे अतिघाईचे ठरेल, असेही निरीक्षण काही समीक्षक नोंदवत आहेत. शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेणे योग्य राहील, असा अभ्यासपूर्ण सल्ला समीक्षकांनी दिला आहे. शिवाय, कर्णधार विराट कोहली आणि रवि शास्त्री यांच्यात समन्वय असणे फार महत्त्वाचे असते. या दोघांमध्ये योग्य समन्वय नसल्यास याचा पूर्ण संघावर परिणाम होतो. म्हणूनच, रवि शास्त्री यांच्या जागी सध्या तरी नवे प्रशिक्षक नेमणे हे फार अतिघाईचे आणि जोखमीचे ठरेल, असे मत क्रिकेट समीक्षकांचे आहे.