‘आंतरराष्ट्रीय श्रम संघटना’ आणि ‘युनिसेफ’ यांनी बालमजुरीवर नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार कोरोना आपत्कालात ८.४ दशलक्ष बालके नव्याने मजुरीच्या क्षेत्रात ढकलली गेली आहेत. वय वर्षे पाच ते १७ वर्षांपर्यंतची मुलं धोकादायक क्षेत्रात काम करत आहेत. अशा ठिकाणी काम करत आहेत की, काम करताना त्यांना कोणतीही सुरक्षितता नाही आणि सवलतही नाही. कामाच्या ठिकाणाच्या प्रभावामुळे ते आजारी पडले किंवा अपघात झाला किंवा त्यांचा मृत्यू झाला तर त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा न्याय उपलब्ध होत नाही. ही मुलं जगाची उद्याची भविष्य आहेत. पण, ही भविष्य वर्तमानातच कुरतडली गेली आहेत, भाकरीच्या विंवचनेत. ना कोणती आशा, ना कोणता उत्साह. यांच्या जगण्याचे ध्येय एकच की, आताचा क्षण जगतोय तर त्या क्षणाला तरी पोटातल्या भुकेला भागवण्यासाठी काम करायलाच हवे. भुकेने होणारा मृत्यू टाळण्यासाठी ही बालकं जोखीम स्वीकारून अत्यंत कष्टाची कामं करतात. त्यांच्या इवल्याशा खांद्यावर घरातल्यांचेही ओझे असतेच. दुर्दैव आहे की, आज अशा कोट्यवधी बालकांना आपल्या बालपणाचा बळी देऊन जगावे लागत आहे. ते जगणे गुलामीचे आहे ते जगणे लाचारीचे आहे, ते जगणे नकोसे आहे. पण, तरीही या बालकांना जगावे लागते. नव्हे, त्यांना जगवले जाते. कारण त्यांच्या कष्टावरच स्वतःची पोळी भाजून घेणारे महाभागही जगात आहेतच.
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने २००२ साली १२ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालश्रमविरोधी दिवस म्हणून ठरवला. २०२१ साली बालश्रमविरोधी दिनाचे औचित्य साधत आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि ‘युनिसेफ’ यांनी बालमजुरीवर नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार कधी नव्हे ते बालकामगारांची संख्या १६ कोटी झाली आहे. २०१६ साली यात घट झाली होती. पण, कोरोनाकाळाच्या आसपास याच बालकामगारांमध्ये ८.४ दशलक्ष बालके नव्याने जोडली गेली आहेत. कोरोनाकाळात ज्यांचे हातावर पोट होते, त्यांचे कामधंदे, रोजंदारी बंद पडल्यावर अन्नाच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागले. या काळात अनेक बालके अनाथ झाली, तर कित्येक लोकांनी या बालकांकडून काम करवून घेऊन त्यांच्या पैशावर मजा मारायचा मार्ग स्वीकारला. कोरोनामध्ये पाच ते १७ वर्षांची ६५ लाख मुलं धोकादायक क्षेत्रात काम करायला लागली. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे महानिदेशक गाय रायडर या अहवालात म्हणतात की, “ही जगासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या या पुढच्या पिढीसाठी काम करणे गरजेचे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बालके जर मजुरी करत असतील तर ते समाजासाठी आणि भविष्यासाठीही धोकादायक आहे.” बालमजुरांबद्दल बोलताना ती तीन वर्षांपूर्वीची घटना आठवते. पावसाची रिपरिप सुरू होती. अमरमहल चेंबूर सिग्नलला मी ज्या रिक्षात होते, ती रिक्षा थांबली. इतक्यात एक मळलेले, नाकातोंडावर शेंबडाचा ओघळ पसरलेले, अंगात एक फाटकी विजार घातलेले बालक भूक लागली म्हणून हातवारे करू लागले. निस्तेज डोळ्यामध्ये तरळलेले अश्रू, खपाटीला गेलेले त्याचं पोट. माझ्याकडे केवळ सफरचंद होती. त्याला दोन सफरचंद दिली. बालक खूश झाले, उड्या मारत पुलाखाली रस्त्याला लागून बसलेल्या त्या दोघांकडे गेले. एक बाई आणि पुरुष होता. बालकाने सफरचंद त्या पुरुषाला दाखवले. पुरुषाने ती दोन्ही सफरचंद हिसकावून घेतली. बालक आशाळभूतपणे पाहतच राहिले. “काय घुरू राहलाय” म्हणत पुरुषाने त्या बालकाच्या कानशिलात लगावली आणि ते बालक परत सिग्नलच्या दिशेने रडत रडत धावत आले. एका मिनिटात इतके सगळे घडले. रिक्षातून उतरण्याच्या तयारीत असताना सिग्नल सुटला. बालश्रमाचे हे असेही रूप मी अनुभवले.
असो. बालश्रम निषेधदिनी बालकांच्या मानसिक, वैचारिक आणि शारीरिक गुलामगिरीचाही विरोध. ‘अॅक्शन रिटेक’ वगैरेच्या दुनियेत तोंडाला मेकअप फासून बालकलाकार म्हणून ओळखल्या जाणार्या, नृत्य आणि गायन ‘रिअॅलिटी शो’मध्ये सहभागी होणार्या बालकांच्या श्रमांचा आणि त्यांच्या सुरक्षिततेचाही विचार आज करणे गरजेचे आहे. बालकांची देहविक्रीसाठी होणारी तस्करी हासुद्धा भयंकर मुद्दा. ‘मुले देवाघरची फुले’ असे म्हणत असताना या फुलांचे अवेळी कोमेजणे थांबवणे, आज गरजचे आहे. बालश्रमाला विरोध करू या...