मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आजपासून तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. यादरम्यान तौक्ते चक्रीवादळादरम्यान झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आज (बुधवार) रायगड, उद्या रत्नागिरी, तर परवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील.
दरम्यान माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले,"गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली आहे."
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौरा केला होता. तसेच नुकसानग्रस्त कोकणवासीयांना मदत जाहीर करण्याची मागणीही केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणाचा दौरा केला होता. तेव्हा ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली होती.