‘कोरोना’चा प्रत्येक कोन उलगडणारे पुस्तक

    15-May-2021
Total Views |

the corona virus_1 &


‘दि कोरोना व्हायरस’ या पुस्तकाने कोरोनाचा इतिहास, स्वरूप, क्षमता, आजार, त्यावरचे उपाय, नेमके काय करावे याचे मार्गदर्शन योग्यरीतीने केले आहे. पुस्तक सर्वस्पर्शी झाले आहे. मुख्यत: पुस्तकाची भाषा साधी, सोपी असल्याने आकलन सोपे होते. इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे निवेदनात स्पष्टता आली आहे.


एक भयावह संकट, स्वरूप आणि निराकरण असे ‘दि करोना व्हायरस’ या पुस्तकाचे थोडक्यात वर्णन करता येईल. प्रस्तुत पुस्तक डॉ. राजेश पारिख यांनी लिहिले असून, मूळ पुस्तक इंग्रजी भाषेत आहे. त्याचा मराठीत अनुवाद केला आहे डॉ. मिलिंद शेजवळ यांनी. हा अनुवाद मूळ पुस्तकाइतकाच प्रभावी ठरला आहे. आजच्या जागतिक परिस्थितीत ‘कोरोना व्हायरस’संबंधी अपुरी किंवा चुकीची माहिती, अफवा, अज्ञान, गैरसमज, अंधश्रद्धा इत्यादी अनेक कारणांनी जनसामान्यांचा वैचारिक गोंधळ होतो आहे. त्यातच भरीला कोरोनासंसर्गामुळे होणारे मृतांचे आकडे पाहून छाती दडपून जाते. माणूस भांबावून जातो. परिणामत: काही लोक मूळ गावी परततात, काही व्रत-वैकल्ये, पूजा, उपास, साकडे घालणे, मांत्रिकाचा सल्ला घेणे, असे जे सुचेल ते करतात. या वेळी नेमके काय करायला हवे, ते का आणि कसे करावे, याचे मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकात करून या डॉक्टरद्वयींनी फार मोठी समाजसेवा केली आहे. याच वेळी समाजातील बेफिकीर लोकांनाही चांगली समज दिली आहे. वस्तुनिष्ठ भाषेत लिहिलेले हे पुस्तक त्यातील रंजक माहितीमुळे कुठेही रटाळ वाटत नाही. ‘ऑक्सिजन’, इंजेक्शने, औषधे इत्यादी उपचारांबरोबरच रुग्णाचे मनोबल वाढविण्याचे अत्यंत गरजेचे काम या पुस्तकाने केले आहे. रुग्णाच्या नातेवाइकांना वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन, ‘काळजी करू नका; पण काळजी घ्या’ असा फार मोलाचा सल्ला हे पुस्तक देते. समाजाचे अतिशय सोपेपणाने समुपदेशन करण्याचे उत्तम काम या पुस्तकाने साध्य केले आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पांढर्‍या रंगाच्या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ ही लाल रंगातील अक्षरे आणि त्याखाली कोरोना व्हायरसचे लाल रंगातील चित्र, हे शांतीपूर्ण जीवनावर आलेले महाभयानक संकट असल्याचे दर्शविते. मलपृष्ठावर अनेक मान्यवरांचे पुस्तकासंबंधीचे अभिप्राय आहेत. ‘संगणक प्रकाशन’ संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले असून, त्याचे साधे रूप मनाला भावते. डॉ. वैनलिआंग, डॉ. कार्लो अर्बानी आणि मानवतेच्या भावनेतून आपल्या प्राणांची पर्वा न करता, रुग्णसेवा करणार्‍या सर्व महान विभूतींना अत्यंत कृतज्ञतेने हे पुस्तक अर्पण केले आहे; ही गोष्ट उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहनजी भागवत यांची समर्पक प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. लेखकद्वयींचा परिचय, तसेच इंग्रजी व मराठी भाषांमधील या पुस्तकावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया नमूद केल्या आहेत. लेखक आणि अनुवादक दोघांचे मनोगतही वाचनीय आहे.


सुरुवातीला वैश्विक साथींविषयी विवेचन केले आहे. ‘इन्फ्लूएन्झा’, ‘स्पॅनिश फ्लू’, त्यातून उद्भवलेला ‘न्यूमोनिया’, पहिले महायुद्ध व फ्लू, १९५७-५८ची फ्लूची आशियातील साथ, १९६१ मधील कॉलर्‍याची साथ, १९६८मधील हाँगकाँग फ्लू, १९८१ पासून न संपलेली ‘एचआयव्ही’ची साथ, २००२-०३ मधील ‘सार्स’चा प्रादुर्भाव, २००९मधील ‘स्वाईन फ्लू’ची महामारी, २०१२ पासून चालू असलेली ‘मर्स’ची साथ, २०१३ ते २०१६ या काळातील ‘इबोला’ साथ, २०१५-१६मधील ‘झिका व्हायरस’ची साथ, २०१८ पासून सुरू असलेली ‘किवू इबोला’ साथ आणि अखेरीस ‘कोविड-१९’ ही सध्या जगात थैमान घालणारी साथ; या साथींना कारणीभूत असणारे विषाणू, साथींचा उगम, फैलाव, मृतांची संख्या इत्यादींचा सविस्तर तपशील पहिल्या प्रकरणात आहे. यातील जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका, साथ फैलावण्याची कारणे यांचा ऊहापोह केला आहे.

दुसर्‍या प्रकरणात वुहान या शहराची विस्तृत माहिती दिली आहे. २०१९मध्ये याच शहरात ‘कोविड-१९’ची सुरुवात झाली. ही माहिती गुप्त ठेवण्यात आली. जानेवारी २०२० मध्ये या नव्या व्हायरसने बाधितांची माहिती जगासमोर आली. सुरुवातीला प्राण्यांमधून माणसांपर्यंत आलेला आजार माणसांकडून माणसांकडे संक्रमित झाला. रुग्ण वाढल्यावर काय स्थिती झाली, साथ आटोक्यात आणण्यासाठीचे आटोकाट प्रयत्न कोणते व कसे करण्यात आले, याची सविस्तर माहिती ओघवत्या भाषेत सांगितली असल्याने कुठेही कंटाळा येत नाही. एका उत्सुकतेपोटी वाचक त्यात रममाण होतो. चीनमधील या रोगाची भीषणता, परिणाम, मृत्यू, पत्रकारांच्या शिक्षा, ‘लॉकडाऊन’ ही माहिती जगासमोर आली. त्याचवेळी या रोगाचा प्रसार २५हून अधिक देशांमध्ये होऊन तेथे मृत्यूचे थैमान सुरू झाले. परिणामत: जगाने चीनवर टीकेची झोड उठवली. चीनच्या साथीला प्रयत्नांती आळा बसला. पण, ही साथ आता जगभर पसरली अन् मृत्यूचे तांडव सुरू झाले.तिसर्‍या प्रकरणात कोरोना व्हायरसविषयीची माहिती आहे. तो दिसतो कसा, माणसावर हल्ला करतो कसा, श्वसनसंस्थेवर हल्ला करून अखेर माणसाच्या मृत्यूला कारण कसा ठरतो, या विषयीचे विस्तृत विवेचन केले आहे. या रोगाची लक्षणे आणि त्याचा एकूणच शरीरावर होणारा परिणाम सांगितला आहे.

चौथ्या प्रकरणात वरील आजारावरील उपचार आणि लसीकरण यावर चर्चा केली आहे. रोगनिदानासाठी कराव्या लागणार्‍या चाचण्या, औषधे, ‘स्टिरॉईड्ज’चा वापर, त्यातील धोके, ‘प्लाझ्मा थेरपी’, रक्ताच्या गुठळ्या, ‘ऑक्सिजन’चा उपयोग, पेशंटची पोझिशन, उत्तम ‘नर्सिंग केअर’ या सर्वच बाबींचा विचार मांडला आहे. पाचव्या प्रकरणात ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘युएससीडीई’सारख्या विश्वसनीय सूत्रांकडून उपलब्ध असलेली माहिती दिली आहे. त्यामुळे लोकांनी नेमके काय करावे आणि काय टाळावे, याचे मार्गदर्शन मिळते. तसेच लोकांनी कल्पित कथांवर विश्वास ठेवू नये, असेही नमूद केले आहे.सहाव्या प्रकरणात जगातील काही देशांमध्ये गैरसमज आणि अपुरी माहिती या कारणांमुळे उडालेला गोंधळ आणि घबराटीचे वातावरण वर्णिले आहे. काही सिनेमा, काही पुस्तके, काही अफवा यांची त्यात भर पडली.


‘डब्ल्यूएचओ’ने हस्तक्षेप करून हे थांबवले. प्रस्तुत पुस्तकाने याचीही दखल घेतली आहे.सातव्या प्रकरणात डॉ. ली यांच्या कार्याविषयीची माहिती आहे. ती अत्यंत वाचनीय आहे.सर्व जगाला वेठीला धरणार्‍या या रोगाचा फायदा घेऊन केलेल्या राजकारणाचा ऊहापोह आठव्या प्रकरणात केला आहे.कोरोनाची लागण, प्रसार, उपचार, मृत्यू आणि समाजमाध्यमे यांचे संबंध तसेच परिणाम यांचे उल्लेख नवव्या प्रकरणात आहेत. माध्यमांनी केलेला चुकीचा प्रसार ही नाण्याची दुसरी बाजूही हे पुस्तक निदर्शनास आणते. नवीन ‘सोशल मीडिया’चे कार्य आपल्याला नवव्या प्रकरणात कळते.जगाला व्यापणार्‍या या महामारीचे आर्थिक परिणाम दहाव्या प्रकरणात चर्चिले आहेत. आरोग्य सेवांचे तपशील, शेती आणि इतर व्यवसायांवर आलेले आर्थिक संकट यावर प्रकाश टाकला आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक पातळीवरचे परिणामही अधोरेखित केले आहेत.



अकराव्या अखेरच्या प्रकरणात भविष्यातील जगाचा मागोवा घेण्यात आला आहे. मानवाच्या मर्यादा, पोषण, आर्थिक असमानता, आपले सामर्थ्य, सर्जनशीलता, भूतदया, सहानुभूती, परमार्थ या गुणांचे दर्शन घडवले आहे. एका सूक्ष्म आणि अदृश्य विषाणूने मानवाला त्याची जागा दाखवून त्याच्या गर्वहरणाबरोबरच त्याच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे. संपूर्ण मानवजातीला धडा शिकवण्यात कोरोना यशस्वी ठरला आहे.‘दि कोरोना व्हायरस’ या पुस्तकाने कोरोनाचा इतिहास, स्वरूप, क्षमता, आजार, त्यावरचे उपाय, नेमके काय करावे याचे मार्गदर्शन योग्यरीतीने केले आहे. पुस्तक सर्वस्पर्शी झाले आहे. मुख्यत: पुस्तकाची भाषा साधी, सोपी असल्याने आकलन सोपे होते. इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे निवेदनात स्पष्टता आली आहे.आजच्या समाजाची नेमकी गरज ओळखून डॉ. राजेश पारिख आणि डॉ. मिलिंद शेजवळ यांनी हे उपयुक्त पुस्तक लिहून समाजसेवेचे मोठे कार्य केले आहे. पुस्तक माहितीपूर्ण, रंजक तर आहेच; परंतु वाचनीय आणि संग्राह्य आहे.
पुस्तकाचे नाव : दि करोना वायरस - महामारीवर प्रभुत्व मिळविणे


- डॉ. आशा श्रॉफ

लेखक : डॉ. राजेश पारिख
अनुवाद : डॉ. मिलिंद शेजवळ
प्रकाशक : संगणक प्रकाशन, अंबरनाथ
पृष्ठसंख्या : १६०
मूल्य : २०० रू.
(टीप - पुस्तक अ‍ॅमेझॉनवरही उपलब्ध असून पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी ९९८७६४२७९३या क्रमांकावर संपर्क करता येईल.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121