औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी औरंगाबादेत काळे झेंडे घरावर लावत निषेध आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारने अजूनही काही पर्यायी व्यवस्था उभी करण्याबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने नाईलाजाने आम्ही निषेध व्यक्त करतोय असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील म्हणाले.
विनोद पाटील माहिती देताना म्हणाले की, काळे झेंडे लावून करत असलेला हा निषेध न्यायालयाविरोधात नाही तर मराठा आरक्षणसाठी सरकारने अजूनही काही पर्यायी व्यवस्था केली नाही व त्याच्या हालचालीही दिसत नसल्याने नाईलाजाने आम्ही हा निषेध व्यक्त करतोय. समाजाच्या भावना या निमित्ताने मांडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. खरंतर समाज म्हणून मला अपेक्षा होती की राज्य सरकार आणि विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी मिळून आम्हाला काही तरी न्याय मिळवून देतील मात्र या दोघांकडूनही आमची निराशा झाल्याची भावना आज आमच्या मनात निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या महामारीमधे आम्ही रस्त्यावर उतरनार नाही एक एक प्राण आम्हाला महत्वाचा आहे. मराठा समाज व इतरांनी स्वतःच्या घरावर काळा झेंडा लावून निषेध व्यक्त करावा, असे आवाहनही त्यांनी केले.