मुंबई : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूडमधील ड्रग्जचे जाळे बाहेर आले. यानंतर 'एनसीबी'ने अनेक कलाकारांची चौकशी केली. तसेच, अनेक कलाकारांवर कारवाईदेखील केली. याचदरम्यान अभिनेता अर्जुन रामपाल याचीदेखील चौकशी करण्यात आली होती. आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अर्जुन रामपाल हा दक्षिण आफ्रिकेला पळून जाण्याच्या तयारीत होता. यामुळे 'एनसीबी'कडून रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिका कौन्सलेटला पत्र लिहिण्यात आले, असे 'एनसीबी'ने दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्ट केले आहे. अर्जुन रामपालची ची 'एनसीबी'कडून चौकशी करण्यात आली होती. पण, त्याला क्लीन चीट दिली नाही, असे 'एनसीबी'कडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात 'एनसीबी'कडून आरोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात ३३ आरोपी दाखवण्यात आलेले आहेत. जवळपास ५० हजार पानांचे आरोपपत्र आहे. यात अर्जुन रामपाल याच्या प्रेयसीचा भाऊ आगीसीलाओस याचेही नाव नमूद करण्यात आलेले आहे. याबरोबरच सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत याचेही नाव या आरोपपत्रामध्ये आहे.