UPI ट्रान्झेक्शन फेल झाले तर ,RBI ची खास सोय जाणून घ्य़ा
मुंबई : बऱ्याचदा इंटरनेट कनेक्शन असो वा अन्य काही कारणास्तव गुगल-पे, पेटीएममध्ये 'युपीआय'द्वारे करण्यात आलेले व्यवहार रद्द होतात. पाठवणाऱ्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे कापले जातात. मात्र, ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत. त्यांना ते मिळत नाहीत. अशात ते पैसे कुठेतरी सिस्टिममध्ये अडकतात. त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक ने नवीन नियम बनविला आहे. याबद्दल वाचा सविस्तर... (What to do in case of 'Transaction Fail' while doing Google Pay PayTM)
'ट्रान्झेक्शन फेल' झाल्यावर काय करावे ?
जर तुमचे 'युपीआय व्यवहार रद्द झाला असेल आणि कापलेले पैसे ठरलेल्या वेळात परत आले नाहीत तर बँकेला तुम्हाला दररोज शंभर रुपये द्यावे लागतील. सप्टेंबर २०१९ मध्ये आरबीआयने फेल्ड ट्रान्झेक्शनबद्दल एक नवे सर्क्यूलर जाहीर केले आहे. यानुसार कापलेले पैसे परत करण्यासाठी एक वेळ निश्चित करण्यात आलीय. या वेळेत सेटलमेंट झाली नाही तर बँकेला त्या ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी लागते. यानंतर बँक दररोजचे शंभर रुपये ग्राहकाला देणार आहे.
'आरबीआय'नुसार फेल झालेल्या 'युपीआय ट्रान्झेक्शन'चे पैसे लाभार्थ्याला मिळाले नाहीत तर 'ऑटो रिव्हर्सल' तारखेपासून म्हणजेच T+1 दिवसांत पूर्ण व्हावे. इथे T म्हणजे 'ट्रान्झेक्शन' कधी केले याच्या तारखेचा उल्लेख आहे. म्हणजेच तिसऱ्या दिवशी ते पैसे परत मिळायला हवेत. अर्थात आपण Google Pay किंवा PayTM कुठल्याही मंचावरून हा व्यवहार करणार असू तरीही जे युपीआयशी संलग्न आहे, त्याच बँकेकडून हा परतावा मागू शकतो.
युपीआय म्हणजे काय ?
'यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस', जो आंतरबँक पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे. मोबाईल नंबर किंवा व्हर्च्युअल आयडीजद्वारे हे पैसे वळते करता येतात. 'एनपीसीआय'द्वारे ही सुविधा देण्यात येते. तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे याची तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला तुम्ही वापरत असलेल्या अॅपवरील रेझ डिस्प्यूटवर जावे लागेल. जर तुमची तक्रार योग्य असेल तर पैसे परत केले जातील.