शून्यातून विश्व निर्माण करणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2021
Total Views |

Jaywant Rathod_1 &nb
 
कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना एखाद्या व्यवसायाची पायाभरणी करणे, हे तसे अवघड काम. मात्र, सफाळ्याच्या जयवंत राठोड यांनी हाताशी कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करत, विविधांगी व्यवसाय उभारले. त्यांच्या व्यवसाय भरारीमुळे अनेक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून पालघर जिल्ह्यातील एक कर्तृत्ववान उद्योजक म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
‘ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया...’ हे वाक्य आतापर्यंत आपण सर्वांनी अनेकांच्या तोंडून ऐकले असेल. उद्योग-व्यवसायाचे तर लक्ष्यच मुळी नफाप्राप्तीचे! पण, नफा कमावण्यासाठी या व्यवसायात भांडवलरुपी गुंतवणूक ही क्रमप्राप्तच. मात्र, आज जगभरात असेही काही उद्योजक आहेत की, ज्यांनी अगदी शून्यातून सुरुवात करत उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटविला. पालघरच्या सफाळ्यातील जयवंत राठोड हे त्यांपैकीच एक. ‘सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा ते यशस्वी उद्योजक’ असा जयवंत राठोड यांच्या आयुष्याचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला. कोणतेही आर्थिक भागभांडवल पाठीशी नसताना केवळ कष्टाच्या जोरावर पालघरसारख्या जिल्ह्यात पर्यटनासह विविध व्यवसाय उभारणारे जयवंत राठोड यांचे संपूर्ण जीवनच नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. राठोड यांच्या विविध व्यवसायांमुळे सफाळ्यामधील अनेक ग्रामस्थांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.
 
 
पालघर जिल्ह्यात ‘कर्तृत्ववान उद्योजक’ म्हणून ओळख असलेले जयवंत श्याम राठोड हे मूळचे बोर्डीचे रहिवासी. बोर्डीतील घोलवड गावात २३ जुलै, १९७५ रोजी त्यांचा जन्म झाला. घोलवडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मात्र, इयत्ता पाचवीत असताना राठोड कुटुंबीयांना मुंबईत स्थलांतर करावे लागले. जयवंत यांचे वडील श्याम राठोड हे मुंबईतील मफतलाल मिलमध्ये कामाला होते. वडिलांच्या नोकरीमुळे जयवंत यांनाही मुंबईत येणे भाग पडले. कांदिवली पश्चिम येथील चारकोपच्या डहाणूकरवाडी येथील चाळीत ते आपल्या कुटुंबासोबत राहत होते. येथील शेठ देवजी भीमजी हायस्कूलमधूनच त्यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. वडिलांच्या नोकरीमुळे जयवंत यांचे शिक्षण आधी सुरळीतपणे सुरू होते. मात्र, गिरण्या बंद पडल्यामुळे वडिलांची नोकरी सुटली आणि पुढे शिक्षण घेणे जयवंत यांना डोईजड होऊ लागले. त्यामुळे दहावीनंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्याऐवजी एखादी नोकरी पत्करुन आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतला. १९९२ साली दहावी झाल्यानंतर जयवंत यांनी विविध क्षेत्रांत काम केले. लग्न आणि विविध कार्यक्रमांदरम्यान केल्या जाणार्‍या विद्युत रोषणाईसाठी ‘वायरिंग’चे काम करणे, कधी रस्ता बनविण्याचे काम, कधी सर्कसमध्ये तंबू उभारणे, रिक्षा धुणे, ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ आदी सर्व प्रकारची अंगमेहनतीची कामे त्यांनी केली. जवळपास सात ते आठ वर्षं त्यांचा हा संघर्ष सुरूच होता. ही कामे सुरू असतानाही आपला एक स्वतंत्र व्यवसाय कसा सुरू करता येईल, याचाच ते नेहमी विचार करत असत. मात्र, आर्थिक पाठबळ नसल्याने ते शक्य होत नव्हते. अखेरीस घोलवड येथे आपल्या मूळ गावी येत त्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्येच आपला व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. राठोड कुटुंबाची घोलवड येथे दहा एकर जमीन. यापैकी काही एकर जमीन आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी देण्याची मागणी त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे केली. मात्र, त्यास कुटुंबातील काही सदस्यांकडून विरोध झाला. वडिलोपार्जित जमिनी व्यवसायासाठी उपलब्ध न झाल्याने ते निराश झाले. परंतु, अशा परिस्थितीतही खचून न जाता इतर मार्गांनी स्वबळावरच पैसे कमावून व्यवसाय उभारण्याचा त्यांनी मनोमन निर्धार केला.
 
 
 
जयवंत यांचे मूळ गाव बोर्डी समुद्रकिनार्‍यालगतचे असल्याने मत्स्यव्यवसायामध्ये जयवंत यांना आधीपासूनच रस होता. १९९८ साली वर्तमानपत्रातील निमखारी कोळंबी शेतीच्या प्रशिक्षण वर्गाबाबतची जाहिरात त्यांच्या दृष्टिक्षेपास पडली. त्यानुसार येथे अर्ज करत त्यांनी याबाबतचे रीतसर प्रशिक्षण घेतले आणि हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित जमिनीमध्ये हा व्यवसाय सुरू करता न आल्याने सफाळे येथे स्वमालकीची जमीन विकत घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी त्यांनी आपले राहते घरही विकले. यासोबतच बँकेकडून कर्ज घेत २००० साली सफाळे येथे त्यांनी दहा एकर जमीन घेतली. खाजण (खारफुटी) जमीन असलेल्या या जागेत निमखारी कोळंबी शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी जमिनीला तळ्याचे स्वरूप देत त्यांनी येथे निमखारी कोळंबी शेतीव्यवसाय सुरू केला. ‘निमखारी’ ही कोळंबीची एक विशिष्ट प्रजाती असून परदेशात याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोळंबीची ही प्रजाती समुद्रात फारशी आढळत नाही. दुर्मीळ प्रकार मानल्या जाणार्‍या या कोळंबीची प्रजाती वाढण्यासाठी शासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न केले जातात. पालघर पट्ट्यामध्ये ही ‘निमखारी कोळंबीची शेती’ म्हणून ही प्रसिद्ध आहे. खाजण जमीन म्हणवल्या जाणार्‍या जमिनीत एक विशिष्ट प्रकारचे तळे यासाठी निर्माण केले जाते. यात निमखारी कोळंबींना सोडले जाते. चार ते पाच महिन्यांत पूर्णपणे कोळंबी विक्रीसाठी तयार होते. किलोप्रमाणे याची विक्री होते. जवळपास सर्व उत्पादन परदेशातच पाठविले जाते. यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. शासनालाही मोठ्या प्रमाणात यातून महसूल प्राप्त होतो. शासनाच्या योजनेप्रमाणेच जयवंत यांनी हा व्यवसाय सुरू केला. मात्र का कुणास ठाऊक नियतीच्या मनात काय होते ते; या शेतीतून नफा मिळून ते स्थिरस्थावर होत नाही, तोच सफाळे ग्रामस्थांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली. संबंधित व्यावसायिक हा आपल्या गावातील नाही, तो बाहेरून आलेला आहे. त्याच्या या व्यवसायामुळे खाजण जमिनींची विल्हेवाट लागणार असून गावात भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते, असा अनाठायी कयास बांधत काही मूठभर राजकीय पुढार्‍यांनी ग्रामस्थांची माथी भडकविली. हा व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात येऊ लागली. जयवंत यांनी याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करत त्यांना समजाविण्याचादेखील प्रयत्न केला. काहीजणांची समजूत घालण्यात त्यांना यशही आले. मात्र, काहीजणांनी केवळ राजकीय पुढार्‍यांच्याच शब्दांवर विश्वास ठेवून आपला विरोध कायम ठेवला. निमखारी कोळंबी शेती व्यवस्थितरीत्या सुरू असल्याचे पाहवत नसल्याने अनेकांनी विविध पद्धतीने आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. जयवंत यांच्या शेतीच्या जागी वीज, पाण्याची सुविधा योग्यरीत्या न पुरविणे, त्यांच्या मत्यशेती प्रकल्पापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होऊ न देणे आदी प्रकारे त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थांच्या विरोधापायी त्यांना आपला व्यवसाय अखेर आवरता घ्यावा लागला.
 
 
 
व्यवसाय थांबताच बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे जयवंत यांना अशक्य झाले. अखेरीस दहापैकी सहा एकर जमीन त्यांना विकावी लागली. मोठे नुकसान झाले तरी ते खचले नाहीत. उर्वरित चार एकर जागेतच आपल्याला आणखी कुठले व्यवसाय सुरू करता येतील, हा विचार ते करू लागले. ज्या तलावात त्यांनी निमखारी कोळंबी मत्यशेती व्यवसाय सुरू केला, त्याच ठिकाणी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’चा प्रकल्प सुरू करत विविध रोपटी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. नारळ, आंबा, चिकू, फणस, सुरू, पेरू, गुलमोहर आदींची रोपटी विकण्यास सुरुवात केली. या तळ्यात त्यांनी काही गोड्या पाण्याचे मासेही सोडले. ‘रोहू’, ‘कटला’, ‘भिंगा’ आदी प्रकारच्या माशांची विक्री करण्यास सुरुवात करत आणखीन एक जोडधंदा जोपासला. येथे गोड्या पाण्यातील माशांची विक्री होत असल्याचे कळताच अनेकांनी जयवंत यांना उपाहारगृह सुरू करण्याची विनंती केली. लोकाग्रहानुसार आलेली विनंती स्वीकारत जयवंत यांनी एक छोटेखानी उपाहारगृह सुरू केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. घरगुती जेवणाच्या डब्यांचीही मागणी होऊ लागली.
 
 
 
हळूहळू व्यापाराचा पसारा वाढू लागला. उपाहारगृहात येणार्‍यांनी येथे पर्यटन व्यवसाय सुरू करण्याबाबत जयवंत यांना कल्पना दिली. कृत्रिम का होईना, मात्र तलावाचे सौंदर्य असणार्‍या या ठिकाणी राहण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होऊ लागली. लोकाग्रहानुसार त्यांनी पुन्हा एकदा येथे ग्राहकांना राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था उपलब्ध करून दिली. हा व्यवसायदेखील वाढू लागला. जयवंत यांच्या ‘फिशरमन रिसॉर्ट’ला आजच्या घडीला देश-विदेशातील पयर्टक भेट देतात. दर आठवड्याला येथे आगाऊ आरक्षण होत असून अनेकदा ‘फिशरमन रिसॉर्ट’ फुल्ल असल्याचे पाहायला मिळते. शून्यातून सुरुवात करत आपले रिसॉर्ट उभारणारे जयवंत आजही विविध कामे स्वतःच करतात. जयवंत यांनी स्वतःचे आयुष्य तर घडवलेच, मात्र अनेक ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देत इतरांच्या आयुष्याचाही उद्धार केला. या कर्तृत्ववान उद्योजकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
 
 
यशाचा मूलमंत्र
 
 
मेहनतीशिवाय पर्याय नाही. जीवनात संघर्ष हा असलाच पाहिजे, संघर्षातूनच माणूस आपले नवे विश्व निर्माण करू शकतो. कितीही अपयश आले तरी खचून न जाता, संकटांचा बिनधास्तपणे सामना केला पाहिजे, तरच माणूस जीवनात यशस्वी होतो.

- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@