मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओतून २० जिलेटीनच्या काड्या आढळल्या होत्या. त्या गाड्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेनेच खरेदी केल्या होत्या. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) याला दुजोरा दिला आहे. जिलेटीनच्या काड्या नेमक्या कुणी आणल्या त्याबद्दल तपास सुरू आहे. नागपूरच्या एका 'सोलर इंडस्ट्रीज कंपनी'मध्ये या काड्या बनल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
जिलेटीनच्या काड्यांचा तपास कसा केला जातो ?
जिलेटीनच्या काड्यांवर असलेल्या कंपनीचा शोध एनआयएने केला असून तिथल्या कर्मचाऱ्यांचीही तपासणी सुरू असणार आहे. यापूर्वी नागपूर पोलीसांनी कंपनीच्या मालकांचा जबाब नोंदविला आहे. जिलेटीन काड्यांवरील सीरिअल क्रमांक नव्हता. मात्र, काड्यांचा बॉक्स सापडल्यानंतर एनआयएनने कंपनीचा तपास केला. बॉक्सवर असलेल्या क्यूआर कोडवरुन आणखी तपास केला जाणार आहे.
आठवी कार घेतली ताब्यात
अँटीलिया प्रकरणात एनआयएने आठवी कार ताब्यात घेतली आहे. सचिन वाझे प्रकरणात नोंदणीकृत असलेली, ऑडी कार (MH04 FZ6561) शोधण्यासाठी महाराष्ट्र ATS आणि NIA प्रयत्नशील होते. मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणात काय वापर करण्यात आला, तसेच या गाडीचा वापर कधी करण्यात आला होता याचा तपास NIA करत आहे. मनसुख हीरेनच्या खुनापूर्वीच वाझेने या गाडीचा वापर केला होता, असा अंदाज आहे.
स्कोडाचा तपास
यापूर्वी ATS ने NIA ला सोपवण्यात आलेल्या अहवालात सचिन वाझे ऑडी कार वापरल्याचे सांगण्यात आले होते. NIA ला आता स्कोडाचा तपास करायचा आहे.
मिलिंद काथेंकडे CIU ची धुरा
मिलिंद काथे यांची बुधवार, दि. ३१ मार्च रोजी ‘मुंबई क्राईम इंटेलिजन्स युनिट’च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच गुन्हे शाखेतील ६५ जणांच्या बदलीनंतर गुन्हे शाखेला आणखी २४ नवीन अधिकारी मिळाले आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेमध्ये अनेक वर्षे कार्यरत असणार्या काही अधिकार्यांची तडकाफडकी बदली केली.
गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून मंगळवारी याबाबत आदेश काढून गुन्हे शाखेमध्ये नव्याने हजर झालेल्या २४ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक मिलिंद मधुकर काठे यांच्याकडे ‘सीआययु’ची जबाबदारी देण्यात आली.
याशिवाय कक्ष-तीनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणामध्ये ‘एनआयए’ने काठे यांचाही चौकशी जबाब नोंदविण्यात आला. ‘अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणा’चा तपास ज्या पथकाने केला, त्यामध्ये काठे यांचाही समावेश असल्याने तपास अधिकारी म्हणून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.