स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी तसेच लोकसहभागातून लागणार वाहतुकीला शिस्त
ठाणे: ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेमार्फत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. ‘सोशल मीडिया’ची कास धरण्यासोबतच रस्ता ओलांडणार्या पादचार्यांना मदत करणार्या वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्राफिक वार्डन सोबतच आता वाहतूक स्वयंसेवक तैनात करण्याचा प्रारूप आराखडा वाहतूक शाखेने तयार केला जात असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवार, दि. ५ मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिली. प्रारंभी ठाणे शहरात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात राबवण्याचा मानसही पाटील यांनी व्यक्त केला.
आजकाल दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत असून, तुलनेत रस्त्यांची संख्या तुटपुंजी पडत आहे. मुख्य रस्त्यांना (लिंक) जोडरस्ते, (सर्व्हिस रोड) सेवा रस्ते उभारण्यासह उड्डाणपूल आणि सब-वे निर्माण केले जात आहेत. त्याचबरोबर मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचे पर्यायदेखील उपलब्ध करण्याचे प्रयत्न प्रगतिपथावर आहेत. इतक्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या, तरी वाहतूककोंडीचा त्रास होतच असतो. तेव्हा वाहतूक नियमन व रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी लोकसहभागातून वाहतूक स्वयंसेवक हा उपक्रम राबविणार आहेत.
सध्या वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी सुमारे ४५० ट्राफिक वॉर्डन तैनात आहेत. तरीही वर्दळीच्या वेळेत वाहतूक नियमन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आदीच्या लोकसहभागातून वाहतूक स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. सकाळी ८ ते ११ तसेच सायंकाळी वर्दळीच्या कालावधीत रस्त्यांवरील बिट मार्शलच्या मदतीसाठी हे स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. तसेच वाहतूक स्वयंसेवक संकल्पनेसाठी नागरिक आणि संस्थांना प्रोत्साहित केले जात असून स्वयंसेवकाने आठवड्यातून दोन तास शहर वाहतूक शाखेला मदत करायची आहे. इच्छुकांकडून अर्ज स्वीकारल्यानंतर मूलभूत प्रशिक्षण देऊन वाहतूक स्वयंसेवकांना किट दिले जाणार असल्याची माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.