
काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष
मुंबई : परमवीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राष्ट्रवादी आणि सरकारच्या पातळीवर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारची बाजू लावून धरताना दिसत आहेत. मात्र, काँग्रेस हवे तसे सक्रिय दिसत नाही. संबंधित प्रकरणात काँग्रेसमध्ये कुठेतरी नाराजी असल्याचे दिसते. काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडने महाराष्ट्रातील घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा म्हणून काँग्रेस शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेटदेखील घेणार आहे. त्यामुळे काँग्रेस आता यापुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडने महाराष्ट्रातील घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली आहे. परमवीर सिंह ‘लेटर बॉम्ब’ प्रकरणात काँग्रेस नाहक बदनाम होत असल्याची पक्षश्रेष्ठींची भावना आहे. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी आजच्या आज बैठक घेऊन अहवाल मागवला आहे. मुंबईतील बैठकीच्या अहवालावर स्वतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी निर्णय घेणार आहेत. परमवीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणात काँग्रेस नाहक बदनाम होत आहे, ही हायकमांडची भूमिका आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. या आमदारांच्या समर्थनाशिवाय ठाकरे सरकार टिकू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसची भूमिका ही सध्याच्या परिस्थितीत महत्त्वाची आहे.
दिल्लीत काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी रविवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील नेत्यांना या संदर्भात निर्देश दिले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. सोमवारपासून अनिल देशमुख प्रकरणी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नमती प्रतिक्रिया देत असले, तरी कालच्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या बैठकीनंतर आता ते या सगळ्यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.